प्रेम , करुणा , परोपकार , मदतीची भावना ह्या मला आजकाल सदगुणविकृती आहेत कि काय असं वाटायला लागलं आहे. 

ह्या मूल्यांचं भारी कौतुक केलं जातं . कारण प्रत्येकाला ह्या गोष्टी हव्या असतात ,  प्रत्येकाला प्रेम हवं असतं , करूणा हवी असते , मदत हवी असते. पण ती स्वतःतला गुण म्हणून नाही तर इतरांकडून ते अपेक्षित असतं . आपण इतरांकडून जी अपेक्षा करतो ती आपणही इतरांना देण्यासाठी सक्षम आणि तत्पर असलो पाहिजे हे मात्र फार कमी लोकांना उमगतं. 

आम्हाला बालपणी घरी कोणतीही नैतिक मूल्ये असं बसवून उपदेश करून शिकवली गेली नाहीत.  बाबा प्राथमिक शाळेवर शिक्षक होते. तरीही त्यांनी कधीच आम्हाला मोठमोठे भारी शब्द वापरून उपदेश केले नाहीत. 

पण .. 

त्यांनी त्यांच्या आचरणातून वागण्याबोलण्यातून ती मूल्ये आमच्यात रुजवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही इतका सायलेंट होता कि ती मूल्ये आमच्यात "रुजायलाच" पाहिजेत असा आग्रह किंवा अशी अपेक्षा त्यांनी केली नाही. ७०-८० च्या दशकातला एका खेड्यातल्या प्राथमिक शाळेवर शिकवणाऱ्या मास्तरला तेव्हा पगारच किती असायचा ? जेमतेम आपलं अन आपल्या कुटुंबाचं पोट भरेल एवढीच मिळकत. त्यातही बाबांचा स्वभाव अत्यंत दयाळु , शाळेत कुण्या गरीबाच्या पोराची स्लेट फुटली तर त्याला स्वखर्चाने घेऊन देतील, गावात शेजारीपाजारी कुणाचं काही दुखलं खुपलं तर त्याचे औषधोपचार स्वखर्चाने करतील. लोकांनाही बाबांचा स्वभाव माहित झाला होता. म्हणून मग कुणालाही काही मदत लागली तर ते आमच्याघरीच धाव घ्यायचे. आईचा ह्या गोष्टीला विरोध होता. तोही जेनुईन होता म्हणा, आपल्याच घरी दारिद्र्य अन चालले दानशूर बनायला, असे टोमणे आई मारायची. 

आईला घाबरून मग गरजू माणसं बाबांना शाळेतच गाठायचे. अगदी त्यांचे दारुडे मित्र दारूसाठीही पैसे मागायचे. बाबांना स्वतः काही व्यसन नव्हतं. पण ते आपल्या गरीब बालमित्रांना दारूसाठी दोनचार रुपये देऊन द्यायचे. ह्या स्वभावामुळे बाबांवर कर्ज झालं. त्यात त्यांना सिव्हिअर डिप्रेशनने घेरलं. त्याकाळी त्याला डिप्रेशन असं म्हणतात हेही त्यांना ठाऊक नव्हतं. उपचार कुठले ?

त्यांच्या चाळीशीत मी लहान होतो, पण मला आठवतं त्यांना existential crisis चा भयंकर त्रास असावा. त्यांचं एक चांगलं फ्रेंड सर्कल होतं परंतु विनाकारण कुणाला आपलं दुःख सांगून त्रास देणं त्यांना पटत नसे. मनातल्या मनात ठेऊन आणखी गुदमरून जायचे. शेवटी आपण आता नोकरी करण्यास असमर्थ आहोत असं त्यांना वाटू लागलं . अन त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मित्रांनी मनाई केलती . तू फक्त शाळेत येऊन सही करून घरी जात जा, आम्ही सांभाळून घेऊ , पण नोकरी सोडू नकोस असं ते समजवायचे. पण बाबांनी ते ऐकलं नाही. मी फुकटचा पगार घेणार नाही, माझ्या तत्वात ते बसत नाही असं ते म्हणायचे. 

त्यांनी नोकरी सोडल्यावर आम्हाला भयंकर आर्थिक अडचणी आल्यात. अगदी प्राथमिक गरजा भागवणे अवघड झालं होतं . 

माझा स्वभाव हट्टी होता. एकदा मी पारले जी च्या बिस्किटांसाठी खूप हट्ट केला. पैसे नव्हते, आईनं मारमार मारलं . शेवटी तिलाच दया आली. शेजारच्या दुकानातून उधारीत पुडा आणून मला खाऊ घातला. 

आई मात्र अडाणी असून व्यावहारिक होती. तिनं पद्धतशीर मॅनेज केलं सगळं. 

बाबांचा तो स्वभाव सद्गुण म्हणावा ? कि सद्गुणविकृती माहित नाही. पण त्या स्वभावामुळे त्यांना आयुष्यभर अडचणी झेलाव्या लागल्यात. त्यांना स्वतःसाठी जराही जगता आलं नाही. 

मी डॉक्टर झालो. पण अनुवांशिकतेने म्हणा कि वारसा हक्काने म्हणा बाबांचा तो स्वभाव माझ्यात आला. त्यात भरीस भर म्हणून अध्यात्मात जुळलो. हा स्वभाव व्यवसायाच्या आड येत गेला. लोकांच्या आजारपणावर आपण पोट भरायचं असतं हे स्वीकार करणं मला कठीण गेलं. व्याव्हारिकपणा अंगी नव्हता. प्रोफेशनॅलिज्म कळत नव्हतं. ह्याचाही भुर्दंड मलाच पडला!

व्यवसायात तर सोडून द्या, व्यवहारातहि मला आपल्या वेळेची कौशल्याची अन ज्ञानाची किंमत ठरवता आली नाही. मुक्तहस्ते उधळत गेलो. कुणाचे काहीही प्रॉब्लम्स असो , मी त्यांची गाऱ्हाणी ऐकायला सदैव तत्पर असायचो. रात्री बेरात्री कुणाचाही फोन येवो , मी तो अटेन्ड करायचो. समोरच्या व्यक्तीला भावनिक सपोर्ट हवा आहे, त्याला आऊटलेट हवं आहे , ते मी पुरवायचो. माझ्या परीने. 

कुणाला वेळ देणे , अटेन्शन देणे , मार्गदर्शन अन सल्ला देणे हि फार मूल्यवान सेवा आहे हे मला कधी कळलंच नाही. त्या सेवेचे पैसेही मिळतात हेही मला ठाऊक नव्हतं. कुणाला आपल्याशी बोलून / बोलताना मार्ग सापडत असेल , तो योग्य निर्णय घेऊ शकत असेल तर त्याला आपली तेवढीच मदत , हा माझा भाव असायचा. आर्थिक नाही पण आपल्याला अध्यात्मिक मोबदला मिळेलच अशी श्रद्धाही असावी. मी कधीही कुणाही साठी उपलब्ध असायचो. "बापासारखाच भोळसट झालास" असे टोमणे मलाही आई मारायची.  

कालांतराने मला जाणवायला लागलं , कोणतीही गोष्ट अतिरेकी नको. मग मी माझी उपलब्धता कमी करत गेलो. पण तरीही काही विशेष जिवलग लोकांसाठी तसाच अव्हेलेबल होतो. त्यांच्याशी पाठ फिरवणं जमलं नाही. आपण देऊच काय शकतो ? आपल्यापाशी पैसे नाहीत कुणाला द्यायला. पण वेळ आहे , कान आहेत , मदतीचा भाव आहे . तोच द्यायचा. तोच देऊ शकतो. 

पण आताशा तेही नकोसं वाटू लागलं. कारण आपण दिलेला वेळ , अटेन्शन , मार्गदर्शन घेताना घेतात . पण अनेकजण नंतर कृतघ्न होतात. ते आपल्या आयुष्यात , नव्या लोकात असे रमतात कि त्यांना त्यांच्या त्या पडतीच्या काळाचा अन त्या काळात आपण त्यांच्यासाठी उपलब्ध होतो ह्या दोन्ही गोष्टींचा विसर पडतो. 

अगदी मृत्यूच्या काठावर उभे असलेले .. माझ्या योग्य वेळी योग्य मार्गदर्शनामुळे जीव वाचलेले .. तेही कृतघ्न झालेत. 

वेळ अटेन्शन सल्ला मार्गदर्शन आणि मॉरल सपोर्ट ह्या वस्तूंवर प्राईस टॅग नसतो. 

त्यामुळे त्याचा मोबदला द्यायचा असतो ह्याची जाणीवहि अनेकांना नसते. पैशांच्या रूपात तो मला हवाही नसतो. पण कधी आपण डाऊन फील करत असताना त्याच लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तुमच्यासाठी "अव्हेलेबल" नसतात.  ते आपलं करिअर , फॅमिली , रिलेशनशिप्स , नोकरीत बीजी असतात. 

म्हणून आता वाटतं आपल्या वेळेची आपण कदर करायला हवी. आपल्या प्रायव्हेसीची आपण कदर करायला हवी. आपल्या वेळेचं आपल्या अटेन्शनचं एक मूल्य ठरवायला हवं. कदाचित मला हे जमणार नाही. पण कमीत कमी माझा वेळ माझं अटेन्शन माझ्या कामी तर येईल ! 


✍डॉ. विजय रणदिवे 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.