माझे मृत्युपत्र.



एप्रिल 2021 मधे माझ्या आईचा मृत्यु झाला. मृत्यु गवर्नमेंटच्या को*विड वॉर्डात झाल्याने मृतदेह घरी घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. थेट स्मशान घाटात तेही सरकारी वाहनातून मृतदेह सामूहिकरित्या नेल्या जात होते. एप्रिल महिन्यात मृत्यूचा तांडव सुरु होता.. स्मशानातही रांगा लागल्या होत्या. कोणतेही अंत्यविधी करण्याची परवानगी नव्हती. पण माणुसकीच्या नात्याने तिथले कर्मचारी मृतदेहाला स्पर्श करु न देता जवळच्या दोन कुटुंबियांना पुष्प वगैरे अर्पण करुन अग्नी देण्याची मुभा देत होते. त्याआधी तर कित्येक मृतदेह सरकारी यंत्रणेमार्फतच दहन करण्यात आले होते. कुटुंबियांना अंतिम दर्शनसुद्धा घेता आले नाहीत. त्या अवधीत मरण पावलेल्या लोकांना कोणतेही पारंपारिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने उरकता आले नाहीत.
तिथून अकरा महिन्यांनी माझ्या भावाने अक्करमास वगैरे विधी पुरोहिताकडून करुन घेतलेत. मी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. परंतु आपल्या आईप्रति आदर आणि भाऊ बहिणीचं मन ठेवण्यासाठी म्हणून थोडा वेळ त्यांच्यात शामिल झालो. तिथंही बोलावण्यात आलेले दोन्ही पुरोहित पूजेच्या मधातच ब्रेक घेऊन परधर्मद्वेषयुक्त चर्चा उकरून काढत होते अन आम्हीही त्यांच्या बोलण्यात मान डोलवून दुजोरा द्यावा अशी अपेक्षा करत होते. मला ते बिलकुल आवडलं नाही. मी तिथून निघून वर माझ्या रूममध्ये येऊन बसलो. माझी ही प्रतिक्रिया त्या दोन्ही पुरोहितांना खटकली. पण माझ्या दोन्ही बहिणींनी त्यांना माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल कल्पना दिली आणि त्यांना प्रेमाने हेही बजावून सांगितलं की समाधान माना तो फक्त निघून गेला, अन्यथा त्यानं तुमच्याशी वाद घालून पार बेईज्जती केली असती.
आई गेल्यावर एक वर्षाने मे 2022 मधे माझे बाबाही गेलेत. पण त्यावेळी धार्मिक विधी करण्यासाठी बरीच सूट असल्याने लोक पुर्ववत अंत्यविधी करत होते. माझा भाऊ आणि माझ्या दोन बहिणी वगळता मी एकटाच पूर्णपणे नास्तिक आहे. त्यांना वाईट नको वाटायला म्हणून मी नाईलाजाने बाबांच्या अंत्यविधीत सहभागी झालो. पण तिथंही विधी करणारा पुरोहित दारु पिऊन होता. (नंतर कळलं की त्या घाटावरचे जवळपास 80 टक्के पुरोहित हे दिवसभर दारु ढोसून असतात ) दशक्रियाविधीच्या नावावर चालणारा गोरखधंदा मी निमूटपणे बघत होतो. माझ्या बापाने आयुष्यात दारु सिगरेट आणि मांस सेवन केलं नाही आणि त्यांचे अंत्यविधी करणारा पुरोहित स्वतः दारु ढोसून असल्याचं पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तिथं तमाशे करुन भावंडांचे मनं दुखवायचे नसल्याने सगळं सहन केलं. पण माझ्या बाबांचा धर्माच्या आडून अपमान केला जात आहे माझ्या लक्षात आलं. स्वतः दारु पिऊन विधी करणाऱ्या पुरोहिताच्या आज्ञा पाळून आपण त्या घाणेरड्या आणि प्रदूषित नदीच्या पाण्यात नखशिखान्त डुबकी मारायची ह्यापेक्षा मोठी गुलामी कोणती? असा विचार मनात आला. तो उद्वेग इतका तीव्र होता की तिथंच त्या पुरोहिताची ऐशीतैशी करुन टाकायची असं वाटलं.
पण परत तेच.. कुटुंबियांच्या भावनांचा आदर वगैरे वगैरे!
ते सगळं मी निमूटपणे सहन तर केलं परंतु त्याच क्षणी त्याच जागी माझ्या कुटुंबियांसमोर मी घोषणा केली, आजच्या नंतर मी कोणत्याही धार्मिक विधित (विशेषतः जिथं पुरोहितशाहीच्या नावाखाली पाखंड असेल ) सहभागी होणार नाही. अगदी तुमचं मन राखण्यासाठी मी गणपतीच्या आरतीतही तुमच्या सोबत उभा राहणार नाही. माझ्याकडून कोणत्याही धार्मिक आचरणाची अपेक्षा आजच्यानंतर कुणीही करु नये.
मी लग्न केलेलं नाही. त्यामुळे मी मेल्यावर कोणीही माझ्या मृतदेहाचे कोणतेही धार्मिक अंत्यविधी न करता माझ्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी. माझ्या अस्थिंची राख नदीत शिरवून नदीचं पाणी प्रदूषित आणि घाण करु नये. त्याऐवजी ती राख कुठंही लांब रानावनात नेऊन दफन करून तिथं एखाद्या वृक्षाची लागवड करावी अशी माझी अंतिम इच्छा मी माझ्या पुतण्या भाचा आणि भाचीला तिथंच व्यक्त करुन दाखवली.
आत्मा किंवा मृत्यु नंतरचं जीवन ह्या सारख्या भाकडकथावर माझा विश्वास नाही. शिवाय त्या कथा निव्वळ मनाच्या कल्पना असून त्यांना काहीच अर्थ नाही हे कळण्याईतकं विज्ञान मी शिकलो आहे. माझ्या आईसकट कोविडकाळात मेलेल्या लाखो लोकांचे धार्मिक अंत्यविधी झाले नाहीत म्हणून ते स्वर्गात गेले नसतील किंवा मुक्त झाले नसतील ह्या फालतू गोष्टीवर माझा विश्वास नाही. मी धर्म अध्यात्म ह्या विषयात विसेक वर्ष घालवली असून त्यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षणाअंती मी ह्या निष्कर्षाप्रत पोचलो असल्याने कुण्या शहाण्याने मला धर्म अध्यात्मावर अक्कल शिकवू नये.
हा लेख लिहिण्याचं प्रयोजन म्हणजे गेल्या काही दिवसात मला असे अनुभव आलेत ज्यामधे जवळच्या व्यक्तींना मी त्यांच्या काल्पनिक धार्मिक भावना जपण्यासाठी जिवंत लोकांशी गैरवर्तन करताना बघितलं.
जिवंत माणसं महत्वाची असून त्यांच्यावर प्रेम करा. दगडधोंड्यासाठी जिवंत माणसांची मनं दुखवू नका.
धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.
✍️ डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश