ब्रेनवॉश
त्या दिवशी बाजारात अचानक एक ओळखीची महिला समोर आली. मी ज्या अध्यात्मिक संस्थेत सत्संगाला जायचो तिथं ती माझ्यासोबतच सेवा द्यायला यायची. पांढरी शुभ्र साडी (त्या सत्संगातला ड्रेसकोड ) नेसूनच ती होती. आमची नजरानजर झाली परंतु तिनं माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. कारण मी आता सत्संगात जात नसल्याने आणि नास्तिकतेचा प्रचार करत असल्याने मला ते लोक पसंत करत नाहीत. माझा द्वेष करतात. मला समोर पाहताच ते अनकम्फर्टेबल होऊन जातात. मला आठवतं ती महिला त्या सत्संगात सेवा देणाऱ्या महिलांपैकी सर्वात जास्त समर्पित अनुयायी होती. माझ्यासारखंच तिनेही आपल्या करिअरची वाट लावून आपलं जीवन सत्संगासाठी समर्पित केलं होतं . मी तर बाहेर पडलो पण ती अजूनही तिथेच चिकटून आहे. तिला सिस्टर शिवानीसारखं व्हायचं होतं . खूप वर्षांनी ती दिसली. पेहराव नेहमीसारखाच होता. पण चेहऱ्यावर अत्यंत उद्विग्न अन चिंताग्रस्त भाव. एखाद्या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असल्यासारखा चेहरा झालेला होता. थकल्यासारखी खांदे पाडून ती रस्त्याच्या कडेकडेने चालत होती. मला तिची अवस्था दयनीय वाटली. असं असूनही मला पाहताच टाळण्याच्या कृतीतून तिचा अध्यात्मिक अहंकार स्पष्ट झळकत होता. वाटलं , थांबून तिला विचारावं , काय मॅडम कुठवर पोचला तुमचा अध्यात्मिक प्रवास ? झालं कि नाही आत्मज्ञान ? मिळाला कि नाही तेजआनंद? मिळाला का नाही मोक्ष ?
पण कशाला उगाच डिवचायचं म्हणून मी आपला चालता झालो.
तसंही ब्रेनवॉश झालेल्या व्यक्तींना जागं करणं सोपं नसतं हे मला ठाऊक आहे. आपल्याच डोक्याला शॉट लागतो. ह्या ब्रेनवॉशची प्रक्रिया अत्यंत "डीप" आणि कॉम्प्लेक्स असते. वर्षानुवर्षे अध्यात्मिक वाटचाल करून माणूस कुठंच पोचत नसतो. वरवर देखावा असतो. आतून सगळं ठणठण गोपाल!
कोणतंही अध्यात्मिक / धार्मिक / सामाजिक संगठन (कल्ट) उभं करण्यासाठी विश्वासु अन समर्पित अनुयायांची नितांत आवश्यकता असते. एक भरभक्कम कल्ट उभा करून तो सुरळीतपणे चालू ठेवायचा असेल तर खूप भरवशाची माणसं लागतात. तसेच ती आज्ञाधारी असणं ही पण एक महत्वाची अट असते. पण अशी आज्ञाधारी , भरवशाची माणसं आयती सापडत नसतात. ती घडवावी लागतात. कारण माणूस हा मुळात कामचुकार आणि धोकेबाज प्राणी आहे. स्वार्थी प्रवृत्ती माणसाच्या अंगात भिनलेली असतांना अश्या माणसांकडून कार्यसिद्धी करून घेणं हे सोपं काम नसतं. आपल्या आज्ञेत वागणारा माणूसही कधी आपलाच घात करेल ह्याची शाश्वती नसते. म्हणून काही माणसं तरी हाताशी असली पाहिजे ज्यांच्यावर आपण डोळे मिटून भरवसा करू शकू हे एका कल्ट लीडरला ठाऊक असतं . अध्यात्मिक गुरु ह्या कामात प्रवीण असतात. कारण ते उत्तम मॅनिप्युलेटर असतात.
अनुयायांच्या भल्या मोठ्या कळपाला मॅनिप्युलेट कसं करायचं , त्यांचा सर्वांचा एकसारखा ब्रेनवॉश कसा करायचा, एका विशिष्ट ध्येयासाठी भिन्न भिन्न प्रकृती प्रवृत्ती अन भिन्न स्वभावाच्या अनेक लोकांना एकत्र काम करण्यासाठी मानसिकरीत्या तयार करणं हे एक कौशल्य आहे. हे कौशल्य प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी धूर्त परंतु स्मार्ट मेंदू लागतो. अर्थातच तो अध्यात्मिक गुरुंपाशी असतो.
एका मोठ्या जनसमूहाला नियंत्रित करण्यासाठी काही मॅनिप्युलेशन टेक्निक्स वापरल्या जातात. ह्या टेक्निक्स तश्या फार सोप्या अन साध्याच असतात , परंतु त्या टेक्निक्स आपल्या मेंदूला नियंत्रित करून आपल्याला मानसिक गुलाम करण्यासाठी वापरल्या जात आहेत हे मॅनिप्युलेशनचं टार्गेट असलेल्या व्यक्तीला (अर्थात अनुयायांना) कळायला नको अशी खबरदारी घ्यावी लागते. जर हे व्यवस्थित जमलं तर मग कामच झालं समजा !
ह्या मॅनिप्युलेशन टेक्निक्स सहसा खालीलप्रमाणे असतात.
१) "आम्ही" विरुद्ध "ते" : कल्ट मधल्या लोकांना असं पटवून देण्यात येतं कि ते इतर लोकांपेक्षा विशेष कृपाप्राप्त व्यक्ती आहेत. त्यांची निवड एका दिव्य आणि ईश्वरीय उद्दिष्टपूर्तीसाठी झालेली असून हा ईश्वरी योजनेचा भाग आहे. आपल्या कल्टबाहेरील व्यक्ती ह्या अज्ञानी , पापी आणि श्रापित आहेत, अपवित्र आहेत, आणि त्या लोकांना आपल्यात शामिल करून घेत त्यांचा अध्यात्मिक उत्कर्ष करण्यास मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे.
२) कल्ट लीडर (त्या संगठनाचा म्होरक्या /गुरु) हा साधारण मनुष्य नसून तो जनकल्याणासाठी अवतरित झालेला महात्मा आहे :
अर्थातच गुरु हा सामान्य माणूस नसल्याने त्याच्यावर त्याच्या आज्ञांवर आणि त्याच्या कृतींवर यत्किंचितही शंका / प्रश्न उपस्थित करायचे नसतात . असं करणं म्हणजे त्यांचा अवमान तर आहेच शिवाय हे तुमच्या अध्यात्मिक अधःपतनाचे कारण ठरू शकते. असं अनुयायांच्या मनावर बिंबवलं जातं. गुरु अंतर्यामी असतो, त्याला आपल्या मनातल्या गोष्टी कळतात , अन तो क्रुद्ध झाला तर आपली अधोगती होईल अशी भीती अनुयायांच्या हृदयात निर्माण केली जाते.
३) टीकाकार / आलोचकांपासून अलिप्त राहण्यास सांगणे (isolation ) : जे लोकं आपल्यावर टीका करतात , आपल्याशी तर्काधिष्ठित वादविवाद करतात , आपल्याला तार्किक प्रश्न विचारतात अश्या लोकांशी नातं तोडणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे , त्यांना टाळणे अशी आज्ञा अनुयायांना दिली जाते.
४) भावनिक नियंत्रण (इमोशनल मॅनिप्युलेशन) : ह्यात तीन गोष्टी केल्या जातात -
अ ) लव्ह बॉम्बिंग : ईश्वर तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही शुद्ध पवित्र आत्मा आहात , तुम्ही परमात्मस्वरूप आहात , तुम्ही साधारण आत्मे नाहीत , तुमच्या जीवनात दिव्यप्रेमाचे आगमन होणार आहे असे प्रलोभन दाखवत अनुयायांना भावनिक केले जाते.
ब) गिल्ट ट्रीपिंग : तुम्ही अमुक केलं तर गुरु / देव नाराज होईल , तुम्ही तमुक नाही केलं तर पाप लागेल, कर्मबंधनात बांधले जाल , तुम्ही आज्ञांचे उल्लंघन केले तर गुरुचं मन दुखेल , त्यांना त्रास होईल असं सांगून सांगून अनुयायांना सतत अपराधीपणाच्या भावनेत ठेवल्या जाते.
क ) भयतंत्र (fear tactics ) : गुरुआज्ञेबाहेर वागाल तर पापाचे वाटेकरी व्हाल, नरकात जाल, निम्न योनीत जन्म घ्याल, मुक्तीस मुकाल अशी भीती अनुयायांच्या मनात तयार केली जाते.
ह्या सर्व टेक्निक्स वापरून अनुयायांचा पद्धतशीर ब्रेनवॉश झाला कि मग त्यांच्याकडून वाट्टेल ते करवून घेणं सोपं होऊन जातं . असे ब्रेनवॉश्ड अनुयायी मग आपल्या कल्ट-लीडर साठी एका इशाऱ्यावर मरण्या मारण्यासाठीही तयार होतात. ते काहीही करू शकतात.
पितृसत्ताक समाजात महिलांना बरेचदा तुच्छतेची वागणूक मिळत असते, तिला अवहेलना अन हेटाळणीला सामोरं जावं लागतं , बायकांना काय कळतं ? त्यांना अक्कल असते का? असं म्हणत त्यांना दुय्यम वागणूक देऊन कमी लेखल्या जातं . अश्या कुटुंबातल्या बायका ह्या कल्ट्सला सहज बळी पडतात असं माझं निरीक्षण आहे. कारण नवऱ्याकडून कुटुंबाकडून जे अटेन्शन आणि सन्मान तिला मिळाला नाही तो अश्या कल्ट्स (आश्रमात ) त्यांना दिला जातो. अटेन्शन आणि सन्मान मिळताना बघून त्या इमोशनल होतात अन मॅनिप्युलेशनला बळी पडतात. आणि म्हणूनच त्यांचं शोषण सुद्धा अधिक प्रमाणात सहज घडून येताना दिसतं .
अध्यात्मात लोकप्रियता आणि प्रसिद्धी लाभलेल्या महिलांना एक प्रकारचं glamour प्राप्त झालेलं असतं. अश्या गुरुपद प्राप्त झालेल्या महिला मग सामान्य बायकांच्या नजरेत आयकॉन होऊन जातात. त्यांना मिळालेली पावर , प्रसिद्धी आणि अध्यात्मिक ग्लॅमर साधारण महिलांना आकर्षित करतात. आपणही त्यांच्यासारखंच व्हावं हि ओढ मनात जागृत होते. ते प्राप्त करण्यासाठी मग गुरूंच्या गुडबुक्स मध्ये स्थान पटकवावं लागेल, आणि त्यासाठी तितकंच अधिक समर्पण आणि भक्ती करावी लागेल हे गणित ठरतं . हे करण्यासाठी मग आंधळा विश्वास अन स्वामीनिष्ठेची पराकाष्ठा गाठावी लागते. इथूनच समर्पण नावाची गुलामी सुरु होते. अन इथूनच सुरु होतं शोषण .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा