"How To Become A Cult Leader"

 "How To Become A Cult Leader" नेटफ्लिक्सवर 6 एपिसोड्सची ही डॉक्युमेंटरी सिरीज आहे. बघण्यासारखी आहे. जगातल्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त वादग्रस्त कल्ट्स बद्दल माहिती दिलेली आहे. Charles Manson, Jim Jones, Shoko Asahara, Jaime Gomez इत्यादी विदेशी कल्ट लीडर्स आणि रजनीश ओशो, नित्यानंद, इस्कॉन इत्यादी भारतीय कल्ट्स बद्दलही उहापोह करण्यात आला आहे.

कल्ट (Cult ) चा अर्थ होतो कसल्यातरी उदात्त भासणाऱ्या परंतु विचित्र आणि अतर्क्य अश्या उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या माणसांचा समूह. अश्या समूहाचा एक म्होरक्या (लीडर / गुरु ) असतो. ह्या म्होरक्याच्या प्रत्येक आदेशाचं अनुपालन करण्यासाठी हा समूह वचनबद्ध असतो. मग ते आदेश बुद्धीला न पटणारे, तर्कात न बसणारे अन बरेचदा तर विक्षिप्त असेही असले तरी ते पालन करण्यासाठी ते अनुयायी कटीबद्ध असतात.
कल्ट लीडरचा रोल असतो आपल्या अनुयायांना सतत निरनिराळ्या आज्ञा देऊन त्यांच्याकडून अनुपालन करवून घेणे. ह्या आज्ञा सहसा त्याच्या कल्टचा विस्तार करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासंबंधी असतात.
अनुयायांचा रोल असतो आपल्या लीडरने दिलेला आदेश सर्वतोपरी मानून तो पूर्णत्वास नेणे. मग त्यात कितीही अडचणी आल्यात, कितीही विरोध झाला तरी न जुमानता ते सोपवलेलं कार्य तडीस नेऊन आपल्या लीडर (गुरु ) ला प्रसन्न करुन त्याच्या good books मधे स्थान पटकावणे. लीडरला प्रसन्न करु शकलो तर मोबदल्यात आपल्याला पारितोषिक (रिवार्ड्स ) मिळेल हा भाव त्या सेवेमागं असतो.
काय असतात हे रिवार्ड्स?
हे कल्ट्स सहसा धार्मिक उद्देशाने प्रेरित असल्याने पुण्यार्जन , गुरुकृपा, कल्याण, स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती इत्यादी स्वरूपात पारितोषिक मिळतील असा समज असतो. अर्थातच हे रिवार्ड्स प्रत्यक्षात कुणालाही मिळत नसून त्याचं फक्त आश्वासन दिलं जातं. ते आपल्या खात्यात जमा होत आहेत असा आभास अनुयायांच्या मनात निर्माण केला जातो. किंबहुना अनुयायी स्वतःच तसे भ्रम आपल्या मनात पाळत असतात. हे भ्रम त्यांच्या मनाला दिलासा आणि धीर देत असतात. आपण म्हणजे ह्या महान कार्यासाठी निवडण्यात आलेले विशेष कृपापात्र पुण्यवान आत्मे आहोत असा समज मनातल्या मनात करुन घेतल्या जातो.
ह्या कल्ट्च्या सदस्यांची काही विशेष लक्षणे असतात. आणि ह्यांचं वर्तनही विशिष्ट असं साचेबद्ध असतं. ह्याला Cultish Behavior असं म्हणतात.
विशिष्ट प्रकारचा पेहराव (गणवेश ). विशिष्ट चिन्हे किंवा बिल्ले धारण करणे. विशिष्ट अभिवादन पद्धती आणि घोषवाक्ये. समोरच्याला चटकन दिसून पडतील अशी चिन्हे चेहऱ्यावर / कपाळावर किंवा आभूषण रुपात अंगावर धारण केलेली असतात जेणेकरून आम्ही अमुक संप्रदायाचे सदस्य आहोत हे इतरांना सहज लक्षात यावं. ह्यांच्या बोलीभाषेतही काही खास शब्दांचा अंतर्भाव असतो ज्यांचा वापर वारंवार केला जातो. (Lingo )
ह्यांच्या वर्तनातही अनेक साम्यस्थळे असतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्यांचा मनात सतत आपल्या कल्ट लीडरचं स्मरण चाललेलं असतं. ह्यांचं दैनंदिन कार्य, लोकांशी संवाद आणि ह्यांचे सामान्य निर्णय हे आपल्या कल्टने निर्धारित करुन दिलेल्या गाईडलाईन्सनी प्रभावित असतात. प्रत्येक कृती त्या निर्धारित साच्यात फिट बसणारी असते. म्हणजे नियमबद्ध असं वागणं ह्यांचं असतं.
बरं हे नियम काही खुपच तर्कसंगत न्यायसंगत वगैरे नसतात. ते केवळ यंत्रवत असतात. humanoid robots सारखं अगदी predictable असं वागणं असतं त्यांचं.
ह्यांची ही प्रोग्रॅमिंग म्हणा किंवा ब्रेनवॉश म्हणा हा इतका खोलवर आणि जबरदस्त असतो की त्यांच्या डोळ्यावर एक प्रकारची झापड लावलेली असते. त्यांना तेच दिसतं जे त्यांचा लीडर त्यांना दाखवू इच्छितो, त्यांना तेच ऐकू येतं जे त्यांच्या लीडरला त्यांना ऐकवायचं असतं.
कल्ट लीडरशी ते इतके जास्त वचनबद्ध असतात की ते त्याच्यासाठी मरायला आणि मारायलाही तयार असतात.
ह्या मानसिकतेमुळेच मग अश्या कल्ट्स मधे अपराध, गुन्हेगारी कृत्ये घडून येत असतात. हत्या, आत्महत्या, बलात्कार, बालकांचं शोषण करण्याची प्रवृत्ती अंधभक्तीतून जन्माला येऊ शकते.
ह्यांच्या लीडर बद्दल एखादं आलोचनात्मक वक्तव्य कुणी केलं तर हे असहज होतात, नाराज होतात, मुद्दा सोडून बोलतात, पळ काढतात किंवा आक्रमक होतात.
त्यांच्या लीडरने केलेलं दुष्कृत्य त्यांच्या लक्षात आणून दिल्यास ते त्याकडे एकतर दुर्लक्ष करतात, अमान्य करतात किंवा ते कृत्य कसं योग्य आणि धर्माधिष्ठित आहे हे जस्टीफाय करुन सांगतात.
तर्क, विज्ञान आणि बुद्धीप्रमाण्यवाद वापरून वादविवाद करायला ते तयार नसतात. स्वतःचे तर्क न देता आमच्या गुरूंनी अमुक पुस्तकात काय सांगितलं आहे, आमच्या ग्रंथात काय लिहिलं आहे असे तकलादू आणि गैरलागू तर्कटं देतात.
त्यांनी डोळ्यांवर अंधभक्ती आणि अंधश्रद्धेचा चष्मा चढवलेला असल्याने त्यांना त्यांच्या कल्ट आणि कल्ट लीडर मधे कोणताही दोष दिसून येत नाही. कुणी दोष दाखवून दिला तरीही ते तो स्विकार न करता त्या दोषावर चादर झाकतात. आपल्या गुरूंचे दोष स्पष्ट दिसत असतानाही ते अमान्य करण्याच्या ह्या प्रवृत्तीला halo effect असं म्हणतात. हा cognitive bias भक्तांच्या मेंदूत आधीच feed केलेला असल्याने ह्यांचा गुरु बलात्काराच्या आरोपात तुरुंगात गेलेला असला तरीही ह्यांना त्यात दोष दिसत नाही. "गुरुजीने किया हैं तो सही किया होगा " अशी भूमिका ते घेतात.
आपल्या कल्टच्या प्रचार प्रसारासाठी ते इतके समर्पित असतात की ते लोकांना आपल्या कल्टमधे सामावून घेण्यासाठी विशेष आग्रही असतात. आग्रह करण्याच्या बाबतीत ते भयंकर जीवट असतात. काही दिवसांपूर्वी माझ्या क्लिनिक मधे भगवदगीता विकण्यासाठी इस्कॉनच्या दोन महिला कार्यकर्त्या आल्या. मी गीता नको आहे म्हटल्यावर त्या बोलल्या "का बरं नको आहे?" मी वाचली आहे म्हटल्यावर परत बोलल्या, "कोणती वाचली आहे? आमची गीता ओरिजनल आहे, ही वाचा."
मी म्हटलं तुमची पण वाचली आहे तर त्या बोलल्या, मग तुम्ही इस्कॉन जॉईन करायचा विचार नाही केला का कधी?
च्यायला! काय डोकं खातायत म्हणून मग मी माझ्या असलीयत वर आलो. मी म्हटलं, तुम्ही रस्त्याने किती तास फिरता असं गीता विकत? मग इतका वेळ तुम्हाला मिळतो कसा? तुमचं मुलांकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होत नाही का? काय मिळतं तुम्हाला असं लंगलंग फिरून?
ह्यापैकी एकाही प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर त्यांच्यापाशी नव्हतं. शिवाय गीता नेमकी त्याच तारखेला जन्माला आली हे इतकं ठामपणे कोणत्या कॅलेंडरच्या आधारावर सांगु शकता? ह्या प्रश्नाचंही उत्तर त्यांना देता आलं नाही.
तेच भक्तिमय रटाळवाणी घोकंपट्टी उत्तरं आणि त्या नकली नकली स्माईल्स देऊन समोरच्याला प्रभावित करण्याच्या फालतू टॅक्टिक्स. uncomfortable करणारे एक दोन प्रश्न विचारताच त्या चिडल्या.
ह्या चालत्या फिरत्या रोबोट्स ला निद्रेतून जागं करणं सोपं काम नाही.
✍️ डॉ. विजय रणदिवे
May be an image of 1 person and text that says "HOW TO BECOME A CULTLEADER CULT"
All reac

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.