sunc cost fallacy
तुम्ही लाख रुपये खर्च करुन एक मशीन विकत घेऊन येता. ती मशीन कपडे धुवून देईल, भांडे घासून देईल, स्वयंपाक करुन देईल अशी जाहिरात तुम्ही बघितलेली असते. मोठ्या थाटामाटात तुम्ही मशीन घरी आणता. पण, जेव्हा तुम्ही तिला ऑन करता तेव्हा ती एकही काम करत नाही. मग तुम्ही कंपनीला तक्रार करता. कंपनी म्हणते मशीनला काम करण्यासाठी एक सॉफ्टवेअर अपग्रेड मारावा लागेल. त्यासाठी 25 हजार रुपये खर्च येईल. तुम्ही ऑलरेडी एक लाख खर्च केलेले असतात. त्यामुळे आता 25 हजार अधिक खर्च करायला काय हरकत आहे म्हणून तुम्ही 25 हजार रुपये आणखी देता.
पण तरीही मशीन काम करत नाही.
तुम्ही परत कंपनीला तक्रार करता. कंपनी म्हणते तुम्हाला मशीनसाठी एक सपोर्टिव्ह एसेसरी विकत घ्यावी लागेल त्याशिवाय मशीन काम करणार नाही.
तुम्ही परत 10 हजार खर्च करता आणि ती accessory घेऊन येता. पण मशीन तरीही काम करत नाही. पण तुम्ही आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार इन्व्हेस्ट केलेले असल्यामुळे ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून कंपनी जे जे सांगेल ते करत जाता. तुमची फसवणूक झालीये हे लक्षात येऊनही तुम्ही कंपनीच्या आज्ञा पाळत जाता. कारण तुमचे पैसे वाया जातील ही भीती असते.
शेवटी तुम्ही ती महागडी परंतु बिनकामाची वस्तु बैठकीच्या खोलीत कोपऱ्यात शोभेची वस्तु म्हणून ठेऊन देता. त्याला डेकोरेशन करता. अश्या अनेक बिनकामी वस्तूंचा पसारा आपण विनाकारण घरात बाळगत असतो. सगळ्यांच्याच घरात आहे मग आपल्या घरी का नको? ही एकटं पडण्याची भीती, आपण afford नाही करु शकल्याची खंत आणि लोकं काय म्हणतील, आपण वेगळे पडू, वाळीत टाकल्या जाऊ ह्याचं भय तुम्हाला हा बिनकामाचा पसारा संग्रहीत करायला भाग पाडतो. आपण हा पसारा भंगार मधे फेकून दिला तर उलट घर मोकळं मोकळं वाटेल, फ्रेश वाटेल हे आपल्याला कळत नाही.
ह्याला #Sunk_cost_fallacy असं म्हणतात.
एखाद्या वस्तुत, एखाद्या स्कीम मधे किंवा एखाद्या नात्यात आपण "इन्व्हेस्ट" करतो. पुढं चालून आपल्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालीये. खरंतर त्याच क्षणी तुम्ही ती गुंतवणूक थांबवली तर जरी गुंतवलेला पैसा /वेळ /एनर्जी /प्रेम वाया जाणार असतं पण तुम्ही पुढील फसवणूकीपासून स्वतःला वाचवू शकणार असता. पण तुम्ही तसं करत नाही. कारण तुम्ही आधी केलेली गुंतवणूक वाया जाईल ह्याचं दडपण मनावर असतं. ते दडपण तुम्हाला दलदलीत खोल घेऊन जातं.
अश्या अनेक गुंतवणूकी आपण करत असतो. फसत जातो. बाहेर पडायचं धाडस करत नाही.
दारुड्या, मारहाण करणाऱ्या नवऱ्याला / बॉयफ्रेंडला सोडु न शकणं, नेहमी संकटात टाकणाऱ्या मित्रांची संगत सोडु न शकणं, एखादं कुजून गेलेलं नातं तोडू न शकणं हे ह्यामुळंच घडत असतं.
आसाराम बापूच्या सत्संगात 20 वर्षे गुंतवणूक (भक्ती ) केलेला माझा एक पेशन्ट आजही गळ्यात आसाराम चा फोटो असलेलं लॉकेट घालून मिरवतो. त्याला माहित आहे आपली फसवणूक झाली आहे. पण आपली विस वर्षे वाया जातील ह्या भीतीने तो आसारामला मनातून काढु शकत नाहीये. कारण त्याला त्यानं इन्व्हेस्ट केलेल्या भक्तीचे "रिटर्न्स" हवे आहेत. ते आज नाही तर उद्या, इथं नाहीतर मेल्यावर आपल्याला मिळेल ह्याची भाबडी आशा आणि एक भय त्याच्या मनावर राज्य करत आहे आणि त्या गुलामगिरीत तो जगत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा