सुशिक्षितांच्या_अंधश्रद्धा
तेजज्ञान फाउंडेशन ह्या अध्यात्मिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून सेवा देत असताना मी विदर्भात विविध शहरात जाऊन तिथं शिबीर घ्यायचो. एकदा अमरावतीला शिबीर असताना तिथल्या एका सेविकेने मला आणि माझ्या टीम ला घरी जेवायला आमंत्रित केले.
त्या मॅडमचा अमरावतीतल्या उच्चभ्रू वस्तीत बंगला होता. अगदी चकाचक घर. घरात नोकरचाकर. मॅडमचे पती खुप मोठे सरकारी कंत्राटदार होते. मुलं विदेशात शिकायला होती.
मला वॉशरूमला जायचं होतं तर मी मॅडमला वॉशरूम कुठाय विचारलं. बैठकीच्या हॉल ला लागूनच किचन होतं अन किचनमधून वॉशरूम कडे जायचा रस्ता होता. मला वॉशरूमकडे जाण्याचा रस्ता दाखवताना मॅडमने तिथल्या चार फरशांकडे बोट दाखवत सांगितलं, "सर ह्या चार फरशांवर पाय न देता थोडंसं वळून जाल वॉशरूमकडे. मला वाटलं फरशी ओली असेल किंवा उखडलेली असेल म्हणून काळजी घेत असणार मॅडम.
मी वॉशरूम मधून बाहेर आल्यावर मग त्यांनी मला त्या फरशा निरखून बघायला सांगितलं आणि त्यात कसली आकृती दिसते का ते विचारलं. मी निरीक्षण करत बघितलं काय दिसते का म्हणून. मार्बलच्या फरशा होत्या तर त्यावर वेडं वाकडं काहीतरी दिसलं. मला काहीच दिसत नसल्याचं बघून मॅडम स्वतःच सांगु लागल्यात.
"सर तुम्हाला ह्यात तिरुपती बालाजीची आकृती दिसत नाहीये का?" त्यांनी असं म्हटल्यावर मी परत निरखून बघितलं तर मग मला ती आकृती खरंच तिरुपती बालाजी सारखी दिसू लागली. ह्याला दृष्टीभ्रम (optical illusion ) असं म्हणतात. त्यावेळी मीही सश्रद्ध होतो त्यामुळे मलाही त्या फरशीत बालाजीच्या चित्राचा आभास झाला.
मग मॅडमने त्यांना झालेल्या ह्या "साक्षात्कारा" मागील स्टोरी सांगायला सुरवात केली. "मी एकदा बालाजी दर्शनाला गेले होते, पण तिथं गेल्यावर काही कारणांनी मला दर्शन घेता आलं नाही. पण मग बालाजी माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की मी तुझ्याच घरात आहे, मला शोध म्हणजे मी सापडेल. मी खुप दिवस शोध घेतला पण मला काही बालाजी सापडेना. मग एक दिवस अचानक माझं लक्ष ह्या फरश्यावर गेलं आणि मला दर्शन झाले." हे सांगत असताना मॅडमचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
आम्हीही साक्षात बालाजी आणि त्यांच्या एका महान भक्तीनीचे दर्शन घेऊन धन्य झालो असल्याचं फील होत होतं. सोबत स्वादिष्ट महाप्रसाद मिळाला तो आनंद वेगळा!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा