दूर के ढोल सुहाने लगे.

 


दूर के ढोल सुहाने लगे.

जे लांब आहे त्याची ओढ अधिक असते. जे जवळ आहे त्याबद्दल ओढ किंवा आकर्षण कमी होत जातं. हा मानवी स्वभाव आहे. मी पहिल्यांदा ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा वाटलं होतं किती नशीबवान असतील ना इथले रहिवासी. ऋषिकेश सारख्या पवित्र जागी त्यांचं घर आहे. आपण किती लांबून येतो इथं दर्शनाला. ह्यांचं बरं आहे, रोजच तीर्थयात्रा घडते ह्यांना. पण प्रत्यक्षात मात्र तिथं राहणाऱ्या लोकांना त्यात काही थोर वाटत नाही. त्यांना ऋषिकेश व्यतिरिक्त इतर देवस्थानावर जाऊन दर्शन घ्यायची इच्छा असते.
"जागृत" देवस्थानावर बाहेरून लांबून येणाऱ्यांचीच संख्या अधिक असते नेहमी. लोकल लोकं क्वचितच त्या मंदिरात जात असतील.
जे प्राप्त आहे त्यातून अपेक्षाभंग झाला म्हणजे मग अप्राप्याची ओढ लागते. अप्राप्य गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. जिथं पेशन्टची गर्दी असते तो डॉक्टर चांगला, जिथं ग्राहकांची रांग असते ते हॉटेल चांगलं, जिथं भक्तांची रेटारेटी जास्त असते तो देव जागृत असं लोकमत असतं. हॉटेलात कितीही घाण असो, पदार्थ कितीही बेचव असो, पण "क्राऊड" आहे म्हणजे ते चांगलंच असणार अशी भावना असते. "इतके सगळे लोकं काही मुर्ख आहेत का?" असं मनाशीच म्हणून आपणच आपल्याला समजावत असतो. फूड ब्लॉगर्स चे व्हिडीओज बघून एखाद्या अत्यंत लोकप्रिय हॉटेलात जाऊन नाष्टा करुन बघाल तर भ्रमनिरास होईल. अपेक्षाभंग होईल. रद्दी अनुभव येऊनही बहुतांश जण आपलं प्रामाणिक मत बोलून दाखवत नाहीत. ह्याचं कारण म्हणजे लोकमताच्या विरुद्ध जाण्याचं धाडस अंगात नसणे. पिअर प्रेशर मुळे आपणही इतरांच्या हो ला हो मिसळून मान डोलावतो. आपण एकटं पडण्याची भीती असते मुळात. कदाचित मलाच एकट्याला वाईट अनुभव आला असेल, इतके सारे लोकं गर्दी करुन आहेत इथं ते उगाच थोडी ना असतील! असं त्या गर्दीतल्या प्रत्येकाला वाटत असतं... "प्रत्येकाला".

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे मृत्युपत्र.