फिर भी दिल है हिंदुस्थानी


 एक मित्र भेटायला आला. म्हणे, तु अध्यात्मात इतकी वर्षे घालवूनही आता त्यावरच टीका करतोस. आसारामसारख्या बुवांना शिव्या घालतोस ते ठीक आहे, पण सगळेच वाईट नसतात रे.

मी म्हटलं, एखादं उदाहरण दे जो ह्या क्षेत्रात धुतल्या तांदळाचा आहे.
तो बोलला, आचार्य प्रशांत बद्दल तुझं काय मत आहे? तो किती छान गोष्टी सांगतो, वेद उपनिषद सारख्या क्लिष्ट गोष्टी सोप्या करुन सांगतो. भक्ती ज्ञान आणि कर्मयोग सोप्या भाषेत समजावतो.
मी म्हटलं, आचार्य प्रशांत बद्दल बोलण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो ती नीट ऐक. मग आचार्य प्रशांत बद्दल बोलूयात.
एका गावात एक व्यापारी होता. त्याच्या घरी एक म्हैस होती. म्हशीचं दूध तो स्वतः प्यायचा. पण शेणाचं काय करायचं हा प्रश्न त्याला पडायचा. त्याला एक युक्ती सुचली. शेणाला वेगवेगळे आकार देऊन तो खेळणी म्हणून विकू लागला. आपल्या मार्केटिंग स्किल्स वापरून तो गावभर खेळणी विकू लागला. काही वर्ष जोरात चालला त्याचा धंदा. पण शेणाची खेळणी लवकर तुटफूट व्हायची शिवाय आता मार्केट मधे लाकडाची धातूची टिकाऊ खेळणी आली त्यामुळे काही वर्षांनी धंदा मंदावला.
व्यापाऱ्याच्या मुलाने मग नवीन शक्कल लढवली. शेणापासून तयार केलेल्या उदबत्त्या तो विकू लागला. काही वर्ष चांगला चालला धंदा. मग लोकांना कळायला लागलं कि ह्या उदबत्त्या तर म्हशीच्या शेणापासून बनवतात. तोवर सुगंधित उदबत्त्या आल्या होत्या बाजारात. त्यामुळे आता उदबत्त्याचाही धंदा मंदावला.
मग व्यापाऱ्याची तिसरी पिढी आली. त्यांनी त्याच शेणापासून लाडू चकल्या शेवया बनवून विकायला सुरवात केली. नविन पदार्थ दिसतात म्हणून ग्राहकांची झुंबड तुटून पडायची त्या पदार्थांवर. पण काही वर्षांनी परत त्यांचं पितळ उघडं पडलं आणि धंदा मंदावला.
मग आली व्यापाऱ्याची चौथी पिढी. ह्या चवथ्या पिढीतली पोरं हुशार होती. शिकलेली होती. एक मुलगा तर IIT IIM झाला. ह्या पोरानं ठरवलं. विकायचं तर शेणच! कारण तो आपला पिढीजात धंदा आहे. पण आपण आता आपल्या बापजाद्या सारख्या चुका करायच्या नाहीत. आपल्या पुर्वजांनी जी स्ट्रॅटेजी वापरली ती आपण वापरायची नाही. त्यानुसार त्यानं आपल्या धंद्यात काही बदल घडवून आणले.
जसं कि आपल्या बापजाद्यांनी काही विशिष्ट जातीच्याच ग्राहकांना प्रॉडक्ट वापरायची परमिशन दिली होती, आपण ती चुक नाही करायची, आपण सर्व जातीच्या लोकांना ते प्रॉडक्ट उपलब्ध करुन द्यायचं. प्रॉडक्टची पॅकेजिंग आकर्षक ठेवायची. सोबत फ्री वस्तु द्यायच्या. डिस्काउंट द्यायचं. ईएमआय सुविधा उपलब्ध करुन द्यायची. होम डिलिव्हरी द्यायची, इत्यादी इत्यादी. पण विकायचं मात्र शेणच!
त्याचा धंदा इतका जोरात चालायला लागला कि मार्केट मधल्या इतर स्पर्धकांना मागे लोटत हा बंदा सुसाट वेगाने समोर जाऊ लागला. ह्यानं मुद्दाम त्याच जातीवर्गातील ग्राहकांना कॅप्चर केलं ज्यांच्या पुर्वजांनी ह्याच्या पूर्वजांचं पितळ उघडं पाडलं होतं. हा एक प्रकारचा सूड होता. सूडही घेऊन झालं, लोकांना नादी लावून त्यांना शेणही खाऊ घातलं आणि वरून रग्गड पैसाही कमावला!
ह्याला म्हणतात IIT वाला दिमाग!
गोष्ट ऐकून माझा मित्र स्तब्ध झाला होता. त्याचा पडलेला चेहरा बघून मी बोललो, चल आता आचार्य प्रशांतवर बोलूयात.
पण तो म्हणाला मला एक अर्जंट काम आठवलं मी घरी जातो, नंतर बोलु. असं म्हणून तो निघून गेला.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.