पलट तेरा ध्यान किधर हैं
#पलट_तेरा_ध्यान_किधर_हैं
ध्यान (मेडिटेशन) करणं म्हणजे काहीतरी भारी गोष्ट असते असा समज सर्वसामान्य माणसाचा असतो. जवळपास प्रत्येकच धर्मात ध्यानाचा महिमा सांगितलेला आहे. ध्यानाचे अनेक फायदे होतात असा दावा केला जातो. ह्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे , किती फोलपणा आहे ह्या बाबतीत मात्र सामान्य माणूस संभ्रमित असतो. काही असलं तरी "ध्यान" हा आपल्यासाठी कुतूहलाचा विषय आहेच .
ध्यान केल्याने काही मानसिक शारीरिक लाभ होतात का ? ह्यावर काही सायन्टिफिक प्रयोग करण्यात आलेले आहेत का ? त्या प्रयोगांबद्दल माहिती आणि निष्कर्ष वाचायचे असल्यास आपण ते स्टडीज इंटरनेटवर वाचू शकतो. नेटवर अश्या प्रयोगांबद्दल आणि त्यांच्या निष्कर्षांबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे त्यामुळे मी त्या प्रयोगांच्या डिटेल्सवर इथं जास्त बोलणार नाही. मी चर्चा करणार आहे ती ध्यानाचे अध्यात्मिक दावे आणि त्यांची सत्यासत्यता ह्यावर. विशिष्ट प्रकारचे ध्यान केल्याने मेंदूतल्या विविध केमिकल्स आणि सेन्टर्स मध्ये काही घडामोडी घडून येतात आणि त्याचे बरेवाईट परिणाम मानसिक स्वास्थ्यावर दिसून येतात असे काही अंदाज ह्या वैज्ञानिक प्रयोगांतून बांधता आलेले असले तरीही अजूनपर्यंत ठोस असा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
ध्यान करणे म्हणजे "नेमकं" काय करणे ? ह्याबाबतीतही मतभेद आहेतच. ध्यानाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ध्यानावर विशेष जोर देणाऱ्या अध्यात्मिक संस्था म्हणजे विपश्यना , ब्रह्मकुमारीज , इशा फाउंडेशन , योगदा सत्संग सोसायटी आणि ओशो हे मुख्य असून इतरही सर्वच संप्रदायात ध्यान करण्यावर भर असतो.
ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, मन शांत आणि प्रसन्न होते, स्मरणशक्ती वाढते, निर्णयक्षमता वाढते , झोप चांगली लागते , एन्झायटी डिप्रेशन कमी होते, भय चिंता क्रोध ईर्ष्या द्वेष मत्सर अहंकार कमी होतो इत्यादी दावे करण्यात येतात. आता इतके सारे फायदे एकट्या ध्यानाने होत असतील तर कुणाला नकोत? ध्यानाबद्दल करण्यात येणार हा प्रचार फारच मनमोहक असतो. पण जाहिरात आणि ऍक्च्युअल प्रॉडक्ट रिव्यू ह्यात फरक असतो हे आपल्याला ठाऊक आहेच.
फेअरनेस क्रीमच्या जाहिराती बघितल्या असतील ना? काळ्या सावळ्या रंगाची एक मुलगी क्रीम लावते आणि "चौदा हफ्तेमे" गोरीपान होते . जाहिरातीत तर काहीही दाखवता येतं, पण खरंच फेअरनेस क्रीम वापरून गोऱ्या झालेल्या मुली शोधाल तर किती सापडतील? हि तथ्ये अगदी डोळ्यासमोर असूनही आपल्याला त्या जाहिरातींची भुरळ पडतेच कि नाही? भारतासारख्या देशात सावळ्या रंगाची त्वचा असणं हेच खरंतर नॉर्मल आहे. पण गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून नुकतंच बाहेर पडलेल्या ह्या सावळ्या भारतीयांच्या मनात आपल्या रंगाबद्दल न्यूनगंड आणि गोऱ्या लोकांबद्दल असलेल्या आकर्षणाचं भांडवल करून "मार्केट" कॅप्चर करणे हाच तर ह्या फेअरनेस क्रीम विकणाऱ्यांचा हेतू असतो. त्यांना त्यांचं क्रीम विकून करोडो रुपये कमवायचे आहेत, तेव्हा ते कशाला सांगतील कि गोरं असणं हि सौंदर्याची व्याख्या नाही, सावळा वर्ण सुद्धा सुंदरच आहे, हे ते कधीच सांगणार नाहीत.
अगदी ह्याच तत्वावर अध्यात्माचं मार्केट काम करत असतं. ते तुम्हाला तुमच्या मनातल्या द्वेष क्रोध ईर्ष्या भय चिंता इत्यादी वृत्तीचं दर्शन करवून देतात. मग ह्या वृत्ती कश्या "विकृत" आणि अपवित्र आहेत हे पटवून देतात. नंतर ते सांगतात कि ह्या विकारांपासून मुक्त व्हायचं असेल तर या, आम्ही तुम्हाला ध्यान शिकवू, साधना देऊ , मंत्रदीक्षा देऊ. ह्या तथाकथित विकारांनी त्रस्त आपण लगेच ह्या प्रचाराला बळी पडतो. मी ह्या विकारांतून मुक्त होईल ह्या आशेने ह्यांना शरण जातो, त्या मोबदल्यात मग ते तुमच्याकडून अनुपालनाचं वचन घेतात . वचनपालन करण्याच्या करारात आपण बांधले गेलो म्हणजे आता ते जे काही आज्ञा देतील ते ते आपण करत जातो.
आपल्या परिचित असलेल्या लोकांपैकी किती व्यक्ती ध्यान करून "ट्रान्सफॉर्म" झाल्यात ह्याचा आपण कधी सर्वे केला आहे का? फेअरनेस क्रीम वापरून गोरी झालेली सावळी मुलगी जशी शोधल्यास सापडत नाही तसेच ध्यान करून रूपांतरित झालेल्या व्यक्ती भेटणं दुर्मिळ आहेत. प्रत्यक्षात असं काही सापडत नसूनही फेअरनेस क्रीमचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांचा वार्षिक टर्नओवर अब्जो रुपयात असतो हे मात्र वास्तव आहे कि नाही ?
दोन तीन वर्षांपूर्वी घडलेला एक मजेदार किस्सा सांगतो. माझी एक क्लासमेट तिच्या काही कामानिमित्य नागपुरात आलेली होती. तिनं मला फोन करून भेटायची इच्छा व्यक्त केली. बऱ्याच वर्षांनी भेट होणार म्हणून मी तिला भेटायला गेलो. ती तिच्या चुलतभावाकडे मुक्कामी होती. मी त्यांच्या घरी पोचलो. बैठकीच्या खोलीत प्रवेश करताच ओशोंचा भलामोठा फोटो भिंतीवर लावलेला दिसला. शोकेसमध्ये ओशोंची भरपूर पुस्तकं डिस्प्ले साठी ठेवली होती. ते बघून मला छान वाटलं. मी ओशोंच्या फोटोकडं पाहत बसलो . माझ्या मैत्रिणीने स्वतःहूनच मग सांगायला सुरवात केली, "माझा दादा ओशो संन्यासी आहे." मी म्हटलं, "अरे वाह! मज्जा येईल मला त्यांना भेटायला. " तेवढ्यात दादाच बाहेर आलेत. स्मितहास्य करत त्यांनी माझं स्वागत केलं. माझी ओळख करून देताना माझ्या मैत्रिणीने त्याला असं सांगितलं कि हा माझा मित्र पण खूप वर्षे सत्संगात जात होता. दादांनी स्वतःचा परिचय देताना सांगितलं कि ते सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त असून १९८१ साली थेट ओशोंकडूनच सन्यास घेतला आहे. तेव्हापासून ते ओशो संन्यासी आहेत आणि नियमितपणे ध्यान करतात. आत्ताही ते ध्यानकक्षातून ध्यान करूनच बाहेर आले होते. मला फार आनंद झाला कि आपण ओशोंच्या सान्निध्यात राहिलेल्या एका संन्याश्याशी भेटतोय. १९८१ साली तर मी जन्मलो, तेव्हापासून हा माणूस ध्यान करतोय, हे खूप भन्नाट वाटलं. योगायोगाने तिच्या भावाचा फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये होता त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या फ्लोअरवर माझ्यासोबत आधीच्या सत्संगात असणारी एक महिला राहात होती. तिची व्यक्तिगत लाईफ जरा वादग्रस्त असून ती थोडी "बदनाम" टाईप महिला होती. "ती ज्या सत्संगात आहे त्याच सत्संगात मीही होतो" हे कळताच केवळ ह्या एका कनेक्शन वरून त्या दादांनी मला "जज" करायला सुरवात केली. एका क्षणात त्यांचा माझ्याबद्दल 'रुख' बदलला. चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत ते मला ट्रोल करू लागले. हसत हसतच परंतु माझी खिल्ली उडवत आहेत हे माझ्या लक्षात आलं. कदाचित समोरची व्यक्ती आपल्या "गटातली" नाही हे त्या वागण्यामागे कारण असावं, किंवा त्या खालच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या बाईने आपल्याया भाव दिला नाही म्हणून दादांचा अहंकार दुखावला गेला असावा. ते आपल्यापेक्षा वयाने फार मोठे आहेत आणि आपण इथं अध्यात्मावर डिबेट करायला आलो नाही ह्याचं भान ठेवत मी त्यांच्याशी उद्धटपणे बोललो नाही. परंतु त्यांचं ते वागणं त्यांच्या "ध्यानी" "संन्यासी" प्रतिमेशी अगदी विसंगत विपरीत आणि हास्यास्पद होतं. निदान एका ओशो संन्याश्याकडून मला ते अपेक्षित नव्हतं. कारण बहुतांशी ओशो फॉलोवर्स माझे चांगले मित्र असून ते इतर धर्मांध लोकांपेक्षा खूप मॅच्युअर्ड असतात.
हा किस्सा सांगायचं तात्पर्य हे होतं कि तुम्ही किती तास, किती वर्षांपासून आणि कोणतं ध्यान करता त्याहीपेक्षा महत्वाचं असतं तुमची वैचारिक स्पष्टता कशी आहे. तुम्ही माणसाला माणूस म्हणून ट्रीट करू शकता का? चाळीस वर्षे ध्यान करूनहि तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा ग्रेट मानत दुसऱ्यांना नीच समजत असाल तर मग त्या ध्यान करण्याचा फायदा काय?
एकंदरीत माझं ध्यान आणि ध्यानी लोकांबद्दल असलेल्या निरीक्षणांवरून माझ्यापुरते मी काही निष्कर्ष काढले आहेत . ते वैश्विक आहेत असा माझा दावा नाही आणि ते सर्वांनी मान्य करावेत असा माझा आग्रह नाही. ज्याने त्याने आपल्या विवेकाने प्रयोग आणि निरीक्षण करून आपल्यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे कि नाही ते ठरवावं.
१) मन थोडा वेळ शांत स्थिर अवस्थेत गेलं तर त्याचा आपल्या एकाग्रतेवर , ग्रहणशीलतेवर आणि स्मरणशक्तीवर चांगला परिणाम दिसून येतो. म्हणून दररोज काही मिनिटे , यथाशक्ती , मन आणि शरीर रिलॅक्स करण्याचा अभ्यास लाभदायक आहे.
२) तासंतास , घड्याळाच्या काट्यावर , जोर लावून , शिस्तबद्ध , काटेकोरपणे , वर्षानुवर्षे ध्यान करणारी माणसं विक्षिप्ततेकडे वळायला लागतात . त्यांचं वागणं सामान्य व्यक्तीपेक्षाही निकृष्ट असतं. त्यामानाने मोजके काही मिनिट , जमेल तेवढं ध्यान करणाऱ्या व्यक्ती स्वभावाने आणि वागण्याने छान असतात असा माझा अनुभव आहे.
३) ध्यानाने आम्ही मोक्ष निर्वाण बुद्धत्व आत्मसाक्षात्कार आत्मज्ञान निर्विकल्प समाधी किंवा ब्रम्हानंदापर्यंत पोचू ह्या आशेने / हेतूने ध्यान करणारी माणसं अधिक नैराश्य आणि मनोविकारांच्या गर्तेत ढकलली जातात. शिवाय जसजसं वय वाढत जाईल तसतसं ह्यांचं वागणं विक्षिप्त होतं जातं.
४) ध्यान हा सुद्धा मनोरंजनाचाच एक प्रकार असून मनोरंजन होत असेल तोवर करायला हरकत नाही. विरंगुळा म्हणून जसं बिडी ओढून कुणाला किक बसते तर कुणाला कॉफी पिऊन किक बसते अगदी तसंच ध्यानाचं आहे. किक बसते तोवर करण्यात काहीच चुकीचं नाही.
५) ध्यानाने कोणतेही दुर्धर आजार बरे होत नाहीत. पण जे सायकोसोमॅटीक आजार आहेत ज्यांचं ओरिजिन स्ट्रेस एन्झायटी अनिद्रा आहे ते आजार नियंत्रित करण्यात ध्यानाचा उपयोग होतो परंतु औषधोपचाराला ध्यान हा पर्याय नाही.
६) प्राणिक हीलिंग, विपश्यना सारख्या संस्थेत अनेकानेक वर्षांपासून ध्यान करणारे माझे परिचित मित्र आधीपेक्षाही अधिक निराश आणि नकारात्मक माइण्डसेट ने ग्रस्त झाले आहेत हा माझा अनुभव आहे.
७) गेल्या वीस वर्षांपासून तेज ज्ञान फाउंडेशन ह्या संस्थेत ध्यान करणाऱ्या शेकडो साधकांना मी पर्सनली ओळखतो. इतके वर्ष ध्यान करूनही बहुतांशी लोकांच्या वैयक्तिक कौटुंबिक शारीरिक मानसिक स्वास्थ्यात काडीचाही सकारात्मक बदल दिसून येत नाही. ह्याउलट ते घमंडी हेकेखोर कपटी वागताना दिसून येतात.
८) ध्यान केल्याने मेंदूत काही रासायनिक घडामोडी होऊ शकतात ज्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दोन्हींची संभावना असते. म्हणून ज्यांना PTSD (पोस्ट ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर ), बायपोलर डिसऑर्डर , delusional डिसॉर्डर्स , स्किझोफ्रेनिक फॅमिली हिस्ट्री असेल त्यांनी ध्यानापासून लांबच राहिलेलं बरं असा मी सल्ला देईल. अश्या प्रकारचे मनोविकार बरे होतील ह्या आशेने अध्यात्मात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सुदैवाने त्यातले बहुतांश लोक जास्त दिवस अध्यात्मात टिकत नाहीत. पण दुर्दैवाने जे टिकतात त्यांच्या लाईफची पार वाट लागून जाते ज्यामुळे त्यांच्यासकट त्यांच्या कुटुंबियांनाही भयंकर परिस्थितींचा सामना करावा लागतो.
९) ध्यान-साधना करून ध्रुवबाळाला देवाचा साक्षात्कार झाल्याच्या रंजक कथा आपण बालपणी ऐकल्या असल्याने त्याचा आपल्या अंतर्मनात खोलवर प्रभाव असतो. ध्यान करण्याच्या प्रक्रियेत त्या सुप्त इच्छा उफाळून वर येतात आणि मग देवाला भेटण्याचा ध्यास लागून आयुष्य वाया घालवलेली कित्येक माणसं सत्संगात तुम्हाला सापडतील. त्यांचं व्यावहारिक पोटेन्शियल जवळपास समाप्त झालेलं असल्याने ते कोणतंही दमदार कर्तृत्व करू शकत नाहीत.
१०) मानवी अस्तित्व निर्धोक टिकून राहण्यासाठी आपल्या मेंदूत उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून अनेक विविध भाव भावना निर्माण झालेल्या आहेत. भय क्रोध चिंता असुरक्षितता इत्यादी विकार नसून ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गाने उभी केलेली डिफेन्स सिस्टीम आहे. त्या भावनांचा समूळ विच्छेद करून संतपद प्राप्त करण्याच्या कल्पना निव्वळ मूर्खपणाच्या आहेत. त्या भावनांविरहित जीवन अशक्यप्राय गोष्ट आहे.
म्हणून ध्यान असो वा इतर कोणतीही अध्यात्मिक साधना जोवर तुम्हाला सुखावह वाटत असेल तोवर ती करण्यात काहीही गैर नाही. पण त्यातून तुम्ही खूप मोठमोठे लाभ एक्सपेक्ट करत असाल तर भ्रमनिरासाशिवाय हाती काहीही लागणार नाही. जसं संतुलित आहार, संतुलित व्यायाम आणि निद्रा आवश्यक आहे तसंच ध्यानाचंही आहे. झेपत असेल तेवढं करायला हरकत नाही. नाहीच केलं तरी फार नुकसान नाही.
डॉ .विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा