प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 2)

 


#प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 2)

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधीना कधी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी प्रार्थना केल्या असतीलच. यश, आरोग्य, समृद्धी इत्यादी प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केल्या जातात. काही प्रार्थना केवळ याचना रूपात असतात तर काही प्रार्थना नवसाच्या रूपात असतात. फरक एवढाच की नवस करताना आपण आपली प्रार्थना फलद्रूप झाल्याच्या मोबदल्यात काहीतरी देण्याचं कबूल करत असतो.
काही प्रार्थना पुर्ण होतात तर काही होत नाहीत असा आपला अनुभव असतो. आपण कधी हिशेब ठेवत नाही की किती आणि कोणत्या प्रार्थना पूर्ण झाल्या आणि किती व कोणत्या नाही झाल्या. त्या कधी पूर्ण होतात अन कधी होत नाहीत एवढंच आपण म्हणु शकतो.
पण ह्या प्रार्थनांची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी एक मोठा प्रयोग करण्यात आला होता तुम्हाला माहित्ये का?
हा प्रयोग THE GREAT PRAYER EXPERIMENT म्हणून ओळखला जातो.
अध्यात्मिक वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असलेले भौतिकी तथा वैद्यकशास्त्री Russel Stannard ह्यांच्या नेतृत्वात हा प्रयोग करण्यात आला होता. २४ लक्ष डॉलर्स खर्च झालेला हा भव्य प्रयोग करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले होते जॉन टेम्पलटन फाउंडेशनने. जॉन टेम्पलटन फाउंडेशन ही नेहमीच अश्या प्रयोगासाठी अर्थसाहाय्य करत असते.
बॉडी माईंड मेडिकल इन्स्टिट्यूट चे हृदयरोगतज्ञ् डॉ. हर्बर्ट बेन्सन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भल्या मोठ्या टीमने हा प्रयोग केला. ह्या प्रयोगासाठी 1802 अश्या रुग्णांची निवड करण्यात आली ज्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी होणार होती. ह्या रुग्णांना 3 गटात विभाजीत करण्यात आलं.
पहिला गट - ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या पण त्यांना प्रार्थना केल्याबद्दल कल्पना दिल्या गेली नाही.
दुसरा गट - ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या नाही आणि त्यांना प्रयोगाबद्दल कल्पना दिली नाही.
तिसरा गट - ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत अशी त्यांना कल्पना देण्यात आली.
प्रार्थना अशी होती, "शस्त्रक्रिया यशस्वी होवो, प्रकृतीत वेगाने सुधारणा होऊ दे आणि शस्त्रक्रियेपश्चात कोणतेही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये".
प्रयोग डबल ब्लाईंड स्टडी पद्धतीने करण्यात आला. प्रयोगाची गोपनीयता इत्यादी नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. मिनेसोटा, मॅसेच्युसेट्स आणि मिसुरी ह्या तीन चर्चेस मधून प्रार्थना करण्यात आल्या.
ह्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रार्थनेच्या बाजूने सकारात्मकच येतील अशी प्रयोगात सहभागी झालेल्या सर्वांची खात्रीच होती कारण सगळे सहभागी हे ईश्वरवादीच होते.
परंतु... झालं त्यांच्या अपेक्षेच्या उलट.
एप्रिल 2006 च्या अमेरिकन हार्ट जर्नल च्या अंकात ह्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले ते असे -
दुसऱ्या क्रमांकाच्या गटाची म्हणजेच ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या नाहीत त्यांची तुलना इतर दोन गटांशी (म्हणजे ज्यांच्यासाठी प्रार्थना केली गेली ) केली असता असा कोणताही लक्षणीय फरक दिसून आला नाही. अर्थात प्रार्थना केली काय अन नाही केली काय असा खुप मोठा काही फरक दिसून पडला नाही.
दुसरा निष्कर्ष तर आणखीच धक्कादायक होता. तो असा की ज्यांच्या साठी प्रार्थना केल्या गेली अश्या पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या गटाची आपसात तुलना केली असता दोन्ही गटात पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स (शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत ) भरपूर प्रमाणात बघायला मिळाली. त्यातही ज्यांना प्रार्थने बद्दल सांगण्यात आलेलं होतं त्यांच्यात 59 टक्के रुग्णांत कॉम्प्लिकेशन्स दिसून आलेत जेव्हा की ज्यांना प्रार्थनेबद्दल कल्पना नव्हती त्यांच्यात फक्त 52 टक्केच कॉम्प्लिकेशन्स दिसून आलेत.
काय म्हणाल आता?
असाच एक निष्कर्ष चार्ल्स डार्विनच्या चुलत भावाने म्हणजे फ्रान्सीस गॅल्टन ह्याने केला होता. ह्यासाठी त्याने ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्यांच्या आरोग्याची तुलना सामान्य जनतेच्या आरोग्याशी पडताळून बघितली. राजघराण्यातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नित्यनेमाने चर्चेस मधे प्रार्थना केल्या जातात, तर आम जनतेसाठी कधीतरी क्वचितच कुणीतरी प्रार्थना करत असतं. ह्याचा अर्थ राजघराण्यातील सदस्यांचं आरोग्य आम जनतेच्या आरोग्यापेक्षा अधिक चांगलं असायला हवं होतं, पण प्रत्यक्षात तसा कोणताही लक्षणीय फरक दिसून आला नाही.
हा ग्रेट प्रेयर एक्सपेरिमेंट सपशेल अपयशी झाल्यावर ईश्वरवाद्यांनी सारवासारव करत हास्यास्पद तर्कटं द्यायला सुरवात केली. झालेल्या फजितीमुळे खजिल होऊन त्यांनी मग ह्या प्रयोगाच्या विश्वसनियतेवरच शंका उपस्थित केल्या.
शेवटी, प्रार्थना करणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असून तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. प्रार्थना करुन आपण आपलं त्या व्यक्तीबद्दल असलेलं प्रेम, काळजी आणि शुभेच्छा व्यक्त करत असतो जे त्या व्यक्तीला "बरं" वाटण्यापुरतं का होईना उपयोगाचं असतं. आजारी व्यक्तीचं मनोबल जरा वाढवण्यासाठीही ते उपयोगाचं असतं.
प्रार्थना करणारा आणि ती ऐकून घेत ती पूर्ण करणारा असे दोघं जण ह्यात अभिप्रेत असतात. माझी प्रार्थना ऐकणारी आणि मला मदत करणारी कुणीतरी अदृश्य शक्ती नक्कीच असावी ही एक सुप्त इच्छा प्रार्थना करण्यामागे असते. अदर एन्ड ला कुणी असो वा नसो परंतु याचना /प्रार्थना करुन माझ्या मनोबलात भर पडत असेल तर त्यात काही गैर नाही. पण आपल्या ह्या भाबड्या आशेचा गैरफायदा घेऊन आपलं शोषण करणारे भोंदू आपल्या अवतीभवती टपलेले असतात ह्याचं भान असु द्यावं.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे मृत्युपत्र.