#प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 1)
#प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 1)
उत्तर आहे, "नाही. अजिबात नाही."
"द सिक्रेट" ह्या पुस्तकाने एक काळ गाजवला होता. असं म्हणण्यापेक्षा हे पुस्तक प्रत्येकाच्याच लाईफमधे कधीतरी एक काळ गाजवत असतं असं म्हणणं अधिक सयुक्तिक राहील. ह्या पुस्तकावर आधारित एक documentary film पण आली होती ती पण एकदम ढासू होती.
असं केल्याने तुमची प्रार्थना विश्वाच्या अंतरात्म्यापर्यंत पोचेल आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमची ती प्रार्थना चमत्कारीकरित्या वास्तवात उतरेल. अहाहा! किती छान!
ती फिल्म पाहून आणि ते पुस्तक वाचून थोडा वेळ असं वाटायला लागतं जणु काही आपल्याला जादूची छडीच सापडली की काय, किंवा अलादीनचा चिराग सापडला.
जसं काही कोणतं दिव्य रहस्य तुमच्या पुढ्यात उलगडलं. जसंकाही कोणत्यातरी दैवी दिव्य चमत्कारीक महाशक्तीने तुम्हाला वरदान दिलं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अजूनही हे सिक्रेट माहित नाही आणि तुम्हाला माहित झालं म्हणून तुमच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आता मी हे सिक्रेट कुणाला सांगु की नाही? सांगितलं तर मग माझं वेगळेपण कसं राहील? आणि नाही सांगितलं तर मी कसा blessed वगैरे आहे हे लोकांना कसं कळेल? अश्या विचारात तुम्ही रमून जाता. तुमच्याशिवाय अक्खी दुनिया तुम्हाला एकाएकी चु*या वाटायला लागते.
मग तुम्ही पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी प्रॅक्टिस करता. आणि सतत चेक करत असता की काही रिजल्ट मिळालेत का? मिळताहेत का?
घंटा काही रिजल्ट मिळत नसतात तरीही तुम्ही चिकाटीने प्रॅक्टिस करता. आपल्यालाच कसं रिजल्ट मिळत नाहीये म्हणून मग तुम्ही मित्रांनाही हे "सिक्रेट" सांगता. "शहाणे" मित्रही मग ह्याच नादी लागतात. आपण मठ्ठ नाही हे भासवण्यासाठी मग तुम्ही आणि तुमचे मित्र एकमेकांना खोटेखोटे रिजल्ट्स सांगत असता. पण ते असेच छोटेमोटे रिजल्ट्स असतात उदाहरणार्थ मी visualize केलं आणि मला पार्किंग मधे जागा मिळाली वगैरे वगैरे. कारण मोठ्या डिंगा मारल्या तर मग पुरावे द्यावे लागतात न?
हा शुद्ध वेडेपणा बरेच दिवस चालतो. काहीजण कालांतराने ह्यातून बाहेर पडतात. पण काही जिवट जीव असतात. वर्षानुवर्षे ते ह्या नादी लागलेले असतात.
ह्या निव्वळ थोतांड असलेल्या आकर्षणाच्या सिद्धांतावर कोर्सेस सेमिनार डिजाईन करुन मात्र अनेकजण करोडपती झालेत. कोर्सेस शिकून मात्र कोणीच श्रीमंत होत नाही. ते जिथल्या तिथेच असतात.
ह्या आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेऊन चालणाऱ्या अनेक अध्यात्मिक संस्था आहेत. त्यातली एक "तेज ज्ञान फाउंडेशन" ह्या नावाने काम करते. ह्या संस्थेत मी अनेक वर्षे होतो. खरंतर हा एक अध्यात्मिक कल्ट आहे. इथले साधक असल्या बिनबुडाच्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यांचे गुरु त्यांना अश्याच प्रकारच्या प्रार्थना शिकवतात. Law of attraction ला ते वेगवेगळी नावं देऊन त्याच तद्दन मुर्ख गोष्टी शिकवत असतात.
आता हा आकर्षणाचा सिद्धांत खरंच काम करतो का? ह्या मूळ मुद्द्यावर येऊयात.
तर ह्या तेज ज्ञान फाउंडेशनच्या नागपूर सेंटरचं उदाहरण घेऊयात. 2004 पासून नागपुरात कार्यरत असलेल्या ह्या संस्थेच्या सेंटर ला अजूनपर्यंत स्वतःच्या मालकी हक्काची जागा विकत घेता आली नाही.(विशेष म्हणजे ह्यासाठी ते वर्षानुवर्षे सामूहिक प्रार्थना आणि visualization करताहेत ). आश्रम तर सोडाच पण साधा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉटही ते विकत घेऊ शकले नाहीत. गेल्या विस वर्षांपासून अत्यंत समर्पित भावाने साधना, प्रार्थना करणाऱ्या अनेक साधकांना साधी नोकरी नाही, धंदे चालत नाही, कर्जबाजारी आहेत. ह्यांच्यासाठी law of attraction का बरं काम करत नसावा? बरं ही काही एक दोन उदाहरणं नाहीत, बहुतांशी साधकांची लाईफ लंगलंगच आहे. (लंगलंग हा वऱ्हाडी शब्द असून ह्याचा अर्थ भिकारचोट असा होतो ).
Law of attraction म्हणजे लोकांना निव्वळ मुर्ख बनवून त्यावर आपलं पोट भरण्याचा व्यवसाय आहे.
अभ्यास, मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्किल्स डेव्हलपमेंट ह्याच गोष्टी तुम्हाला यशस्वी बनवत असतात. शेखचिल्लीसारखी स्वप्न रंगवून इच्छापूर्ती होत नसते.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा