ईश्वरवादी (आस्तिक ) विरुद्ध निरीश्वरवादी (नास्तिक )


 ईश्वरवादी (आस्तिक ) विरुद्ध निरीश्वरवादी (नास्तिक ) हा वाद फार जुना आहे. हे दोन्ही गट आपसात समन्वयाने, वादविवादरहीत जगु शकत नाहीत का?

एकाच कुटुंबात दोन सदस्य आस्तिक अन दोन जण नास्तिक असतील तर ते एका घरात गुण्यागोविंदाने राहु शकत नाहीत का?
देवावर श्रद्धा असणे किंवा नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असला तरीही त्यांच्या विश्वासाचा एकमेकांच्या जगण्यावर बरा वाईट परिणाम होत असतो. समजा, बायको आस्तिक असेल अन नवरा नास्तिक तेव्हा तिथं दोघांमध्ये आपसी समजूतदारपणा नसेल तर रोजचे वाद होऊ शकतात. नवऱ्याला नॉनव्हेज खायची इच्छा झाली, पण नेमकी त्या दिवशी चतुर्थी असेल तर? आता दोघांपैकी एकाला आपल्या comfort चा बळी द्यावा लागेल.
आज न खाता उद्याही खाता येईल, हा समंजसपणाचा प्रतिसाद नवऱ्याने द्यावा असं बहुतेकांचं मत इथं राहील. चतुर्थी काही रोज रोज येते का? म्हणून नवऱ्याने आपल्या इच्छेला होल्ड करावं हे सुज्ञपणाचं अन सभ्यपणाचं आहे कुणीही मान्य करेल.
पण समजा त्याला एकट्यालाच दरवेळी तडजोड करून माघार घ्यावी लागत असेल तर? किंवा चतुर्थीसारखंच आठवड्यातून पाच दिवस कोणत्या ना कोणत्या देवाच्या वारामुळे नॉनव्हेज खायचं जमत नसेल तर? मग कसा न्याय करायचा? नवऱ्याने बायकोचा मान ठेवण्यासाठी आपल्या इच्छेचा बळी दिला ठीक आहे, पण बायको एखादवेळी चतुर्थी असुनही फक्त नवऱ्याच्या खुशीसाठी त्याला नॉनव्हेज खायची मुभा देईल काय? स्वतः जरी खाल्लं नाही तरी त्याला बनवून देईल काय?
इथंही काहीजण म्हणतील की घरीच आणून खाणं आवश्यक आहे का? बाहेर जाऊनही खाऊ शकतो न?
पण असं म्हणणं किती न्यायसंगत आहे ह्याचा बारकाईने विचार करुन बघा. नवरा नास्तिक असुनही बायको देवघरासमोर अर्धा तास बसून पुजा अर्चना करत असेल तर तो जसा सहन करतो तसंच बायकोनेही त्याला चुपचाप किचनमध्ये नॉनव्हेज शिजवून खाऊ द्यायला काय हरकत आहे?
ह्या केसमधे न्यायनिवाडा करणं वाटतं तितकं सोपं नाही.
हे तर झालं फक्त खाण्यापिण्याचं उदाहरण. इतर अनेक गोष्टी असतात ज्यावरून दोघांमधेही परस्परभिन्न मतामुळे ओढाताण होत असते. मुहूर्त पाळणे, कुंडली -जन्मपत्रिका, धार्मिक विधी कर्मकांड करण्यासाठी येणारा खर्च, तीर्थयात्रा, धार्मिक स्थलांना भेटी देणे, प्रत्येक गोष्टीसाठी दिवस पाळणे इत्यादी गोष्टींवरून माझ्या एका नास्तिक मित्राचे त्याच्या अति श्रद्धाळु बायकोशी सतत खटके उडत असतात. कौटुंबिक सलोख्याचं भान ठेऊन दरवेळी त्यालाच तडजोडी कराव्या लागतात. तिच्या श्रद्धाळूपणामुळे त्याच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडत असतो ते दुःख वेगळंच.
बायकोवर प्रेम म्हणून तो दरवेळी आपली नास्तिकता दाबून टाकतो. पण ह्यात त्याची सारखी घुसमट होत असते. आपण दरवेळी हिच्यासाठी माघार घेतो, पण एखादवेळी तिनेही माझ्या भावनेचा आदर ठेऊन एखाद्या चतुर्थीला मला, फक्त मला खुश करण्यासाठी माझा मान ठेवण्यासाठी नॉनव्हेज करुन खाऊ घालावं अशी इच्छा तो मला नेहमी बोलून दाखवत असतो.
बघा, इथं मुद्दा नॉनव्हेज खाण्याचा बिलकुल नाहीये. तो महिन्या दोन महिन्यातून कधीतरी एखादवेळी नॉनव्हेज खाणारा सदगृहस्थ आहे. त्याला ते खायची कडकडही सुटत नाही. मुद्दा असा आहे की त्याची इच्छा ज्या दिवशी झाली तो दिवस योगायोगाने चतुर्थी वगैरे असेल तर त्याला तडजोड करावी लागते. दरवेळी त्यानेच माघार घेणं हे न्यायसंगत नाही, मुद्दा हा आहे. आपल्या इच्छेलाही मान दिला जावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे जी मला न्याय्य वाटते.
आपल्याला असा नास्तिक नवरा का बरं मिळाला असावा ह्याचंही तिला वेगळंच टेन्शन. मागच्या जन्मी तुझ्या हातून पापं घडलीत म्हणून तुझ्या नशिबी राक्षसी नवरा आला असं तिला कुण्यातरी पंडिताने सांगितलं. त्यावर उपाय म्हणून तिनं एकवीस हजार रुपये खर्च करुन एक विधी करवून घेतला. (अर्थातच तोही भुर्दंड नवऱ्याच्याच खिशावर बसला )
नास्तिक म्हणजे राक्षसी प्रवृत्ती हा गैरसमज केला जातो. माझा मित्र नास्तिक असुनही खुप प्रेमळ आहे, परोपकारी आहे, गरजूना मदत करतो, अहिंसावादी आहे.
इतका मोठा खर्चिक विधी करूनही नवरा नास्तिक तो नास्तिकच आहे अर्थात आपण मागच्या जन्मात केलेली पापं भयंकरच असतील असा समज आता तिचा झालाय. त्यामुळे आता पाप:क्षालन म्हणून तिची धार्मिकता अधिकच वाढली आहे, आणि त्याचा खर्चही! 😀😀
All re

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.