कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही!
कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही!
कुठल्याही सत्संगात, अध्यात्मिक संस्थेत, आश्रमात जाल तर तिथं तुम्हाला सेवकांची एक भलीमोठी फौज बघायला मिळेल. हे सेवक (volunteers ) म्हणजे एक अशी जमात असते ज्यांचा पूर्णपणे ब्रेनवॉश झालेला असतो. ह्यांनी एक विशिष्ट गणवेश धारण केलेला असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सारखेच भाव असतात. एकसारखी ह्यांची भाषा आणि देहबोली असते. प्रोग्रॅम्ड केलेल्या humanoid robots सारखे हे सोपवलेली कामं करत असतात. एक रोबोट जसा दिलेल्या कमांड नुसार काम करतो अगदी तसंच.
कोणताही कल्ट (cult ) चालवण्यात ह्यांची खुप मोठी आणि मोलाची भूमिका असते. ह्यांच्याच श्रमावर सगळा कल्ट ऑपरेट होत असतो. हिटलरनं जसं त्याच्या बाजूने असलेल्या नागरिकांना एकसारखा गणवेश दिला होता, हातात शस्त्रे आणि काही घोषवाक्ये दिली होती अगदी तसेच हे सेवक असतात. फक्त ह्यांच्या हाती शस्त्रांच्या ऐवजी विक्रीसाठी विविध प्रचारसाहित्य असतं. (ह्यांच्या गुरूंनी आदेश दिला तर हे शस्त्रही उचलतात एवढा ह्यांच्या बुद्धीचा ताबा ह्यांनी गुरुच्या हाती सोपवला असतो.)
ह्या सेवकांचे प्रकार असतात. फूलटाईम सेवक, पार्ट टाईम सेवक, पगारी सेवक, बिनपगारी सेवक, गुरुजीचे खास लाडके सेवक, स्तुतीपाठक सेवक. ह्यांच्या ranks सुद्धा ठरलेल्या असतात. Glamorous सेवा देणारे सेवक (उदाहरणार्थ इस्कॉन मधे स्टेजवर ज्ञान पाजळणारे गौडगोपाल सारखे ) आणि रस्त्यावर भटकून पुस्तकं विकणारे सेवक. हे "glamorous सेवक" विमानाने प्रवास करतात, फाइव्हस्टार हॉटेल्स मधे थांबतात. तर हे रस्त्यावर भटकणारे "लंगचोट सेवक" सहसा आपल्या स्वखर्चाने सेवा देत असतात.
ह्यात तरुण वर्ग खुप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. करिअर घडवू न शकलेले, किंवा चांगलं करिअर असतानाही existential crisis मुळे जॉब्स सोडून देऊन संन्यासी वगैरे झालेले भ्रमिष्ट मानसिकतेचे जीव असतात.
युटोपीयन ड्रीम्सच्या विश्वात रमलेले हे भ्रमिष्ट कसल्यातरी काल्पनिक ध्येयाच्या शोधात भटकत असतात.
मी स्वतः अश्या भ्रामक जगात कित्येक वर्षे वावरलो आहे. मी स्वतः सेवक म्हणून जगलो आहे. सेवकांचं भावविश्व आतून बाहेरून मी निरखून बघितलं आहे. ह्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. एखादं चक्रव्युह तोडण्यासारखं कठीण काम असतं हे. कारण तुमच्या डोळ्यावर श्रद्धेची झापड बसवण्यात आलेली असते त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचं काही दिसतच नाही. तुमच्या कानांत गुरुच्या आदेशाशिवाय कोणतेही शब्द घुसतच नाही. इतकी जबरदस्त प्रोग्रॅमिंग झालेली असते.
शेवटी ह्या सेवकांचं काय होत असतं? कुठं पोचतात हे?
ह्यांना ह्यांचं ध्येय प्राप्त होतं असतं का?
ह्यांचा प्रवास शेवटी ह्यांच्या बौद्धिक आणि आर्थिक क्षमतेनुसारच ठरत असतो. ह्यात ह्यांची भक्ती किती होती, सेवाभाव किती होता किंवा ह्यांनी गुरूंची किती मर्जी राखली ह्याचा काहीही संबंध नसतो.
ही तरुण पोरं पोरी आपला उमेदीचा काळ गुरुजींच्या सेवेत घालवत असतात. त्यामुळे अभ्यास करिअर इत्यादी गोष्टींपासून ह्यांचा फोकस हटून जातो. हे भौतिक जग म्हणजे माया असून यश हे क्षणभंगूर असतं असा ठाम समज असल्याने हे करिअर घडवण्याच्या बाबतीत गंभीर नसतात. क्वचितच एखादा सेवक ह्यात गुंतूनही आपलं करिअर घडवतो (असे अपवाद बोटावर मोजण्याइतकेच )
इथं सेवा देणारे "अंकल आंटी" कॅटेगरीत येणारे सेवक मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. ह्यांना सरकारी किंवा प्रायव्हेटच पण चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असतात. त्या सांभाळून हे इथं सेवा देत असतात. हे अत्यंत "चतुर लोमडी सेवक" असतात. कारण हे आपल्या स्वतःच्या पोरांना सेवेपासून लांब ठेवतात, त्यांना करिअरवर फोकस करायला सांगतात, आपल्या पोरांना डॉक्टर इंजिनिअर पायलट वगैरे बनवतात. पण सामान्य घरातल्या दुसऱ्यांच्या पोरांना हे सत्संगात सेवा देण्यास प्रवृत्त आणि प्रोत्साहित करत असतात. ह्यांची पोरं देशविदेशात सेटल होतात तर इतर पोरांच्या हाती हे गुरुजींचं प्रचारसाहित्य सोपवून त्यांना रस्त्यावर भिकारड्यासारखं फिरायला सांगतात.
ही पोरं (सहसा बहुजनांची ) आपली बुद्धी विवेक गहाण ठेऊन, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि उपकार विसरून ह्या महापुरुषांच्या विचारांशी दगाबाजी करत असतात. अर्थातच ह्यांनी कधीच फुले-आंबेडकरी साहित्य वाचलेलं नसतं. मग डोक्यात प्रकाश कुठून पडणार??
मी ज्या सत्संगात जायचो तिथं माझ्यासोबत सेवक म्हणून खुप मोठी तरुण पोरापोरींची फौज होती. त्यातली बहुतांशी मध्यमवर्गीय / गरीब शेतकरी बहुजन कुटुंबातली, खेड्यापाड्यातून नागपुरात शिक्षणासाठी म्हणून आलेली, स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणारी पोरं होती. त्यातली जवळपास सगळीच्या सगळी पोरं आता बेरोजगार आहेत. वयं वाढून गेलीत त्यामुळे आता काय करिअर घडणार? तरीही बहुतेकांच्या अक्कला ठिकाणावर आल्या नाहीत.
आणि जितकेही "अंकल आंटी" कॅटेगरीवाले सेवक होते त्यांची पोरं डॉक्टर, पायलट झालीत. कारण त्यांनी आपल्या पोरांना सेवेपासून लांब ठेवलं.
ही बेअक्कल जमात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वास्तववाद विवेकवादाशी सोडचिट्ठी घेऊन हे एका कल्पनाविश्वात रमत चालले आहेत. आपल्या सदसदविवेकबुद्धीचा ताबा दुसऱ्याच्या हाती सोपवून मी हा भवसागर पार करुन घेईल असा पोकळ आशावाद उराशी बाळगून हे समुद्रात उड्या घेतात अन गटांगळ्या खात डुबून मरतात. जेव्हा जाग येते तेव्हा खुप उशीर झालेला असतो.
जोवर तुम्ही गुलाम असता, तुम्हाला गुलामगिरीची जाणीव होतच नाही. सुदैवाने जर तुम्ही मुक्त झालात तरच कळतं तुम्ही किती भयंकर बंधनात जगत होता.
बेवकू्फो की कमी नहीं गालिब
एक ढूंढो हजार मिलते हैं
नगद ढूंढो उधार मिलते हैं
डॉ. विजय रणदिवे


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा