आयुष्याचं कस्टमर केअर सेंटर
आमच्या शहरात एका नावाजलेल्या महाराजांचा कार्यक्रम सुरु आहे. तोच महाराज ज्याच्या कार्यक्रमात रुद्राक्षासाठी चेंगराचेंगरी होऊन माणसं मेली होती.
हा कार्यक्रम आमच्याच एरियात असल्याने दुपारी आणि सायंकाळी भयंकर ट्राफिक जाम लागतो. काही रस्ते बंद करुन वाहतूक वळवली जाते. कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी रिक्षे मोटारी आणि बसेस खचाखच भरून जातात. बरीच मंडळी पैदल असते. ह्या गर्दीत पिवळ्या नारंगी शेड्सच्या साड्या नेसून बायकांची भीड खुप जास्त पाहायला मिळते. अधिकांश बहुजन गरीब मध्यमवर्गीय घरातल्या बायका. जीवाचा इतका आटापिटा करत ह्या बायका तिथं गर्दी करायला जातात. काय मिळत असावं त्यांना?
एखाद्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरवर तक्रारी-कॉल्सची संख्या वाढली असेल, किंवा त्यांच्या सर्व्हिस सेंटरवर रिपेरिंग आणि रिप्लेसमेंटसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असेल तर ह्याचा असा अर्थ निघतो की ग्राहक प्रॉडक्टला घेऊन संतुष्ट नाहीत.
हल्ली कधी नव्हे ते बुवा बाबांच्या सत्संगाना ऊत आलाय. ऑफलाईन ऑनलाईन बाबा, विविध भाषिक बाबा, विविध संप्रदायाचे बाबा, टोणे टोटके सांगणारे बाबा, 'हे खा ते नका खाऊ' सांगणारे बाबा, परची काढून भविष्य सांगणारे बाबा, समस्या समाधान देणारे बाबा, इंग्लिश झाडणारे सुपरबाईक चालवणारे बाबा, जगण्याची कला शिकवणारे बाबा, वेदांचा अर्थ उलगडून सांगणारे बाबा, दलिया बिस्कीट विकणारे बाबा, पुस्तकं विकणारे बाबा, विश्वशांतीच्या प्रार्थना करवणारे बाबा.
हे बाबा आणि ह्यांचे आश्रम म्हणजे परमेश्वराचं "कस्टमर केअर सेंटर" आहेत असं ते भासवत असतात.
इथं रांगा लावणारे भक्तगण म्हणजे ते "कस्टमर" आहेत जे आयुष्यात संतुष्ट नाहीत, मरमर कष्ट करुन वैतागले आहेत, ज्यांना आपली आयुष्याने फसगत केली आहे असं वाटतंय. मनासारखं झालं नाही. मनासारखं काही मिळालं नाही. जे मिळालं ते नको होतं. जे गळ्यात पडलं ते नकोसं झालंय. आजारी शरीर, विस्कटलेली नाती, फसलेल्या रिलेशनशिप्स, गळ्यात पडलेला व्यसनी रिकामचोट नवरा, खर्चिक उद्धट बायको, वाया गेलेली पोरं, बेरोजगारी महागाईमुळे मोडकळीस आलेला प्रपंच, खऊट सासू, घाण शेजारी, अपुऱ्या राहून गेलेल्या इच्छा..
इत्यादी तक्रारी घेऊन जायचं तरी कुठं? कुणाला दाद मागायची? गोंधळलेली ही माणसं मग बुवा बाबांच्या आश्रमात रांगा लावतात. आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, आमच्या समस्या सोडवून मिळतील, नाही काही तर नुकसान भरपाई तरी मिळेल, रिप्लेसमेंट तरी मिळेल ह्या आशेने हे लोकं गर्दी करतात.
पण ह्यांना कळत नाही की ज्या कंपनीची कस्टमर केअर सर्व्हिस थाटून हे एजंट्स बसलेले आहेत मुळात ती कंपनीच अस्तित्वात नाही. तुम्ही अर्थात तुमचं शरीर हे ह्या सृष्टीच्या जिवशास्त्रीय खेळाचं केवळ एक बायप्रॉडक्ट आहे. ह्या अथांग अनंत सृष्टीच्या रचनेतला एक अगदीच क्षुल्लक असा स्पेअर पार्ट आहोत आपण. आपल्या असण्या नसण्याने ह्या सृष्टीच्या अस्तित्वात काहीही फरक पडणार नाही. डायनासोरचं अस्तित्व नाहीसं झालं म्हणून कुणाला काय फरक पडला? तसाच माणूस. आपणच उगा आपल्या अस्तित्वाबद्दल मोठेपणा मिरवत असतो. आपण स्वतःला ह्या सृष्टीच्या केंद्रस्थानी ठेऊन चोहीकडे बघत असतो.
आपल्या समस्या, आपली आयुष्यातली गुंतागुंत ही अनेक कारणांनी झालेली आहे. आपली सामाजिक धार्मिक जडणघडण, आपण ज्या समाजात राहतो त्याच्या चालीरीती, आपण ज्या देशात राहतो तिथलं राजकारण, प्रशासन इत्यादीमुळे आपल्या जीवनातल्या समस्या उद्भवलेल्या असतात. त्या त्याच स्तरावर सोडवल्या जाऊ शकतात. त्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही जादूची छडी नाही. एक लोटा जल दगडावर चढवून तर त्या समस्या सुटणारच नाहीत.
तुमच्या भाबड्या भावनांचं भांडवल करुन हे तोतया कस्टमर केअर सेंटरवाले तुमची लुबाडणूक करत असतात. अशी लुबाडणूक होऊ नये ह्यासाठी कित्येक महापुरुषांनी तुम्हाला आधीच सावध केलं आहे. संत तुकाराम, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आ. ह. साळुंखे, डॉ. दाभोळकर इत्यादी विचारवंतांनी आपलं आयुष्य झीजवलं आहे लोकांना शोषणापासून वाचवण्यासाठी. त्यांचं साहित्य वाचा. तुम्हाला कोणत्या बुवा बाबाची गरज पडणारच नाही.
डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा