शेअर्ड सायकोटीक डिसॉर्डर
अध्यात्म मार्गात असताना आमचा आठ दहा मित्रांचा एक ग्रुप बनला होता. आठवड्यातून एक दिवस तलावाकाठी आमची मिटिंग भरायची. त्या ग्रुपमधे हिंदू मुस्लिम असे मित्र आम्ही होतो. त्या ग्रुपमध्ये एकजण होता, तो सांगत असे कि त्याच्या घरी paranormal activities (भुताटकी ) होते. त्याच्या फॅमिलीत तो त्याची बायको आणि आई बाबा असे चार जण राहात होते. आणि त्या चौघासोबत एक अदृश्य भूतही त्यांच्या सोबत राहायचं म्हणे. मुस्लिम धर्मात त्याला जिन्न म्हणतात. त्या भुताचे आवाज त्या सर्वांना ऐकू यायचे, भास व्हायचे, बांगड्यांचे, भांड्यांचे आवाज रात्रीच्या वेळी ऐकू यायचे, लाईट्स आपोआप चालू बंद व्हायचे असं तो मित्र सांगत होता. कधी कधी तर ती पाचवी व्यक्ती त्यांच्यासोबत जेवायला बसायची म्हणे.
त्यावेळी आम्हाला ते खरं वाटत होतं. कारण तो खोटं बोलत नाहीये ह्यावर आमचा विश्वास होता.
पण आता जेव्हा मानसिक आजारांबद्दल सामान्य ज्ञान घ्यायचं म्हणून बराच अभ्यास केला तेव्हा माहित झालं कि ह्या मानसिक आजाराला Shared Psychotic Disorder (शेअर्ड सायकोटीक डिसॉर्डर ) असं म्हणतात.
घरातल्या एका व्यक्तीला हा आजार होतो. पण ती व्यक्ती तिला होत असलेले भास /भ्रम इतरांना जेव्हा नॅरेट करुन सांगते (वर्णन करते ) तेव्हा ती इतक्या पद्धतशीरपणे सांगत असते कि ऐकणाऱ्यांना त्या व्यक्तीच्या सांगण्यावर शंकाच येत नाही.
हळूहळू त्या व्यक्तीवर असलेला विश्वास इतरांनाही भ्रमिष्ट बनवत जातो. "ऐक, नीट कान देऊन ऐक तुला बांगड्यांचा आवाज ऐकू येतोय?" असं ती भ्रमिष्ट व्यक्ती म्हणते आणि बाकीचे जेव्हा एकाग्र होऊन आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांनाही तो आवाज ऐकू यायला लागतो. आणि असं करत करत त्या लोकांचा त्या व्यक्तीवर इतका विश्वास बसतो कि आता तो म्हणेल तेच सत्य असं सर्वांचं ठाम एकमत तयार होतं.
ह्या आजारामुळेच 2018 मधे दिल्लीतल्या बुराडी येथील एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. त्या कुटुंबात ललित नावाच्या व्यक्तीला हा आजार झालेला होता. पण त्याला होत असलेले भ्रम हे भ्रम नसून ते सत्य आहे ही गोष्ट तो कुटुंबातील इतर दहा जणांना पटवून देण्यात यशस्वी झाला आणि त्याच्या सांगण्यावरून सर्वांनी आपला जीव गमावला.
देव असतो, देव आपल्या प्रार्थना ऐकतो, तो आपली रक्षा करतो, तो नवसाला पावतो, तो शिक्षा करतो अश्या प्रकारचे विश्वास बाळगणे हा देखील एखाद्याच्या मनाचा भ्रम असु शकतो ही संभावना आपल्या डोक्यात का बरं येत नाही?
एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळण्यासाठी "प्रमाण" (evidences /सबूत /पुरावे ) बघावे लागतात. हे पुरावे म्हणजेच प्रमाण खालील प्रकारचे असतात.
1) प्रत्यक्ष प्रमाण
2) अनुमान प्रमाण
3) आप्तवचन
प्रत्यक्ष प्रमाण हे सर्वात अधिक विश्वासार्ह मानलं जातं. अनुमान प्रमाण तुलनेने कमी ग्राह्य धरलं जातं तर आप्तवचन सर्वात कमी विश्वास ठेवण्यासारखं मानलं जातं. आप्त म्हणजे नातेवाईक किंवा विश्वासू व्यक्ती. अश्या व्यक्तीने सांगितलं आहे म्हणजे ते सत्यच असेल असा विश्वास ठेवला जातो. पण बरेचदा आप्तवचन हे शेवटी असत्य सिद्ध झाल्याचे दाखले मिळत असतात.
हल्ली समाजात वेगवेगळ्या श्रद्धा पसरवण्यात येत आहेत. अमुक दिवशी तमुक देवळात जाऊन बेलपत्र मध वाहलं तर मनोकामना पुर्ण होते, अमुक ठिकाणचा रुद्राक्ष धारण केला तर आजार बरे होतात, अमुक ग्रहाचा खडा अंगठीत धारण केल्यास लग्न जुळते, अश्या एक ना अनेक अंधश्रद्धा पसरवण्यात येत आहेत. विश्वास श्रद्धा आस्था म्हणून आपण त्यावर भरोसा करतो. पण त्या मान्यता सत्य नसून एखाद्याच्या मेंदूचे भ्रम असु शकतात. त्यावर विश्वास ठेऊन आपणही त्यांच्यासोबत शेअर्ड सायकोटीक डिसॉर्डर ह्या आजाराने ग्रस्त तर झालो नाही आहो ना? हा विचार जर आपल्या डोक्यात येत नसेल तर फार कठीण आहे मग!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा