देव... एक लोभस कल्पना

अगदी उत्क्रांतीच्या सुरवातीच्या काळापासूनच कुतूहल (curiosity ) हा मानवी मेंदूचा आवडता विषय राहिला आहे. "हे काय आहे? हे असं का बरं आहे? हे असंच का बरं आहे?" असे प्रश्न मानवाला पडत आलेले आहेत.
कुतूहल शमवणे आणि नव्या गोष्टींचा शोध घेणे ह्यात त्याला रोमांच मिळतो.
पाऊस पडतो, विजा कडाडतात, भूकंप येतो, पूर येतो, चक्रीवादळ, ज्वालामुखी, गारपीट हा काय प्रकार आहे? हे प्रश्न मानवी मेंदूला हैराण करुन सोडायचे. तर्क विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या प्राथमिक आणि कच्च्या अवस्थेत असल्यामुळे त्याच्या त्या अपरिपक्व बुद्धीला जे पटेल ते अनुमान लावून त्यालाच सत्य मानणे अशी त्याची संशोधक वृत्ती होती.
साथीचे आजार पसरायचे, माणसं पटापट मरायची, हे सगळं होण्यामागे कसलातरी व्हायरस असावा हे त्याच्या अविकसित मेंदूच्या आकलना बाहेरची गोष्ट होती. जे डोळ्यांनी दिसत नाही, ते बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकयंत्र उपलब्ध नव्हते. मग हे सगळं घडून येण्यामागे कसलीतरी अदृश्य शक्ती कार्यरत असावी असा कयास त्याच्या मेंदूनी बांधला. काळेकुट्ट ढग, त्याआडून लखलखणाऱ्या वीजा, मुसळधार कोसळणारा पाऊस, सुसाट सुटलेला वारा आणि तुडुंब भरून वाहणाऱ्या राक्षसी नद्या बघून तो घाबरला. निसर्ग जितका लोभस आहे तितकाच रौद्र आहे हे त्याला कळायला तर लागलं परंतु निसर्ग असा अनियमित अनिश्चित का बरं आहे ह्याचं कारण त्याला कळायला मार्ग नव्हता.
कुतूहल शमवण्यासाठी मग त्यानं अदृश्य दैवी शक्तीची कल्पना केली. माणूस जसा प्रशंसेनं प्रसन्न होतो आणि निंदेनं नाराज होतो तसाच तो अदृश्य देव असावा असं त्याला वाटलं. त्या अनिश्चित अनियमित लहरी अदृश्य देवाला प्रसन्न करुन त्याची कृपादृष्टी प्राप्त करण्याच्या हेतूने मग आराधना उपासना पुजा अर्चना सुरु झाल्यात. व्रत वैकल्ये नवस उपवास रुपी देवाणघेवाण केल्याने ती अदृश्य सत्ता प्रसन्न होईल असं त्या अर्धविकसित मेंदूला वाटायला लागलं.
पुढं मानवी मेंदू जसजसा विकसित होऊ लागला तश्या ह्या अश्मयुगीन कल्पना मावळायला लागल्या. पाऊस पडणे वीज कडाडणे किंवा भूकंप होणे ह्या पर्यावरणीय घटना असून ह्यामागे कोणती दैवी शक्ती नाही हे विज्ञानाने सिद्ध करुन दाखवलं. जे मेंदू वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत गेलेत ते अश्मयुगीन दैवी कल्पनेतून बाहेर पडत गेलेत. पण ज्यांनी विज्ञान स्विकारलं नाही किंवा ज्यांच्या मेंदूला विज्ञान झेपलंच नाही ते आजही त्याच अश्मयुगीन कल्पनांमध्ये रमून त्या अस्तित्वातच नसलेल्या दैवी शक्तीला शरण जाऊन भजन गात आहेत.
अशी अश्मयुगीन अविकसित मेंदू कोंबलेली टाळकी चमत्कारी बुवा बाबांच्या दर्शनरांगेत रेटारेटी करत उभी असलेली आढळून येतात. अशक्य ही शक्य करतील कसे स्वामी? किंवा महाराजांच्या थुंकीने कुष्ठरोग (Leprosy ) कसा बरं बरा होईल हा प्रश्न त्यांच्या मेंदूला कधीच पडत नाही.
डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.