श्री मेंढरं
सत्संग म्हणा, बैठक म्हणा किंवा कोणताही धार्मिक /अध्यात्मिक गट (Cult )म्हणा, सर्वांची modus operandi एकसारखी असते.
ह्या कल्टचा सर्वात वर एक म्होरक्या असतो जो प्रमुख मठाधीश /महाराज /स्वामी /बापु /श्री श्री ह्या सारख्या उपाधी घेऊन बसलेला असतो.
ह्या म्होरक्याच्या वर आणखी एक "अदृश्य सत्ता" असल्याचा भास (illusion) तयार करण्यात येतो.
त्या सर्वोच्च सत्तेशी तुम्हाला म्हणजे आपल्या सारख्या सामान्य माणसांना जुळायचं असेल तर ह्या मध्यस्थी असलेल्या म्होरक्याची कृपादृष्टी प्राप्त करावी लागेल असं अनुयायांच्या अंतर्मनात खोलवर रुजवल्या जातं.
ह्यालाच "ब्रेनवॉश" असं म्हणतात.
हा ब्रेनवॉश एका रात्रीतून होत नसतो करता येत नसतो. त्यासाठी अनुयायांच्या मनावर वारंवार ती गोष्ट हॅमर करत राहावी लागते. अगदी टीव्हीवरील जाहिराती सारखंच. संतूर साबण वापरल्याने वय माहित पडत नाही आणि तुम्ही तरुण सुंदर दिसायला लागता असं वारंवार सांगत राहिलं तर ते खरं वाटायला लागतं.
ही प्रक्रिया वारंवार करण्यासाठी विशिष्ट आवर्तनं (सायकल्स /repetitions) करावी लागतात. त्यासाठीच विशिष्ट दिवसांच्या अंतराने बैठका घेतल्या जातात.
गुरु म्हणून एकदा स्वीकार झाला कि मग पुढली प्रक्रिया सुरु होते. ह्या प्रक्रियेत गुरु आपल्या अनुयायांकडून आज्ञाकारीतेचं वचन वदवून घेतो. त्याच्या आज्ञा पालन करण्याचे लाभ आणि आणि आज्ञाभंगाच्या शिक्षा /नुकसान व्यवस्थित समजवून दिले जातात.
त्या अदृश्य सर्वोच्च सत्तेशी जुळण्यासाठी आवश्यक असलेली आपल्या स्वामींची कृपादृष्टी प्राप्त करायची असेल तर त्याची प्रत्येक आज्ञा पाळली गेली पाहिजे हे अनुयायांच्या मनावर ठसवल्या जातं.
आता तुम्ही त्याची प्रत्येक आज्ञा मान्य करण्यासाठी बाध्य झालेले असता. इथं ही प्रक्रिया कम्प्लिट होते. तुमचा एक आज्ञाकारी रोबोट तयार झालेला असतो.
ह्या रोबोटची संपूर्ण कमांड त्या म्होरक्याच्या हाती असते. तो आता तुमच्याकडून त्याला वाटेल ते करवून घेऊ शकतो.
ओसामा बिन लादेन सारख्या आतंकवादी संघटना ह्याच modus operandi वर काम करतात. आत्मघातकी पथक असो कि बॉम्ब पेरून माणसं मारणारे आतंकवादी असो, हे तेच रोबोट्स असतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा