कल्ट

25 एप्रिल 2023 रोजी केन्या नावाच्या देशात जमिनीत पुरलेले 89 मृतदेह पोलिसांना सापडले. विशेष म्हणजे ह्या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्या होत्या. कशासाठी? तर येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी.
हे सर्वजण मालिंदी कल्ट चे सदस्य होते. Cult (कल्ट) म्हणजे धार्मिक /अध्यात्मिक उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या समान श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांचा समूह. ह्या cults चा एक गुरु असतो ज्यानं दिलेली प्रत्येक आज्ञा डोळे झाकून आणि कोणतीही शंका न ठेवता पाळणं हे त्या कल्टच्या सदस्यांचं कर्तव्य असतं.
ह्या मालिंदी कल्टचा गुरु होता पॉल माकेंझी. ह्या पॉल माकेंझी आणि त्याच्या बायकोने मिळून 2003 मधे हा कल्ट सुरु केला होता. त्यानं आपल्या अनुयायांना असं पटवून सांगितलं होतं की जर तुम्ही अन्नत्याग करुन जीव द्याल तर मेल्यानंतर तुम्हाला थेट स्वर्गात येशू ख्रिस्ताशी भेटता येईल आणि त्याच्यासोबत राहता येईल. देवभोळ्या आणि स्वतःला पुण्यवान बनवण्याचं भूत डोक्यावर चढलेल्या ह्या मूढ लोकांना आपल्या गुरुचं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्याची आज्ञा पाळली. 89 मृतदेह सापडलेत आणि 200 जण बेपत्ता आहेत.
ह्यापूर्वीही अश्या अनेक घटना घडल्या आहेत.
2000 साली युगांडा मधे अश्याच धार्मिक उद्देशाने प्रेरित होऊन 778 सदस्यांनी आत्महत्या केली होती. ह्यात मरणारेही ख्रिश्चन होते. Movement for the restoration of the ten commandments of God ह्या नावाने ही घटना प्रसिद्ध आहे.
2018 मधलं दिल्लीतलं बुराडी कांड ह्याच प्रकारचं होतं.
2007 मधे बांगलादेशात 9 जणांच्या मुस्लिम कुटुंबाने ट्रेन खाली येऊन असाच जीव दिला होता, तोही धार्मिक उद्देशाने.
2004 मधे मॉरिशस मधे दहा जणांनी अशीच सामूहिक आत्महत्या केली होती.
1997 मधे कॅलिफॉरनिया मधे "हेवन्स गेट" नावाच्या कल्ट मधील 39 सदस्यांनी स्वर्गप्राप्ती साठी सामूहिक आत्महत्या केली.
Solar Temple नावाच्या कल्ट मधील 74 सदस्यांनी 1994 ते 97 दरम्यान आत्महत्या केल्या.
1941 मधे नेपाळ येथे योगमाया न्योपाने नावाच्या एका महिला गुरुच्या आदेशावरून तिच्या 67 अनुयायांनी जलसमाधी घेऊन आपला जीव दिला.
1840 मधे Bekeranta cult च्या 400 सदस्यांना त्यांच्या गुरूंनी एकमेकांना मारून टाकण्याची आज्ञा दिली. असं केल्याने त्यांचा पुनर्जन्म श्वेत व्यक्ती म्हणून होईल असं त्यांच्या मनावर ठसवण्यात आलं होतं.
आणि सर्वात भयंकर घटना घडली ती 1978 मधे अमेरिकेत जोन्सटाऊन येथे. जिम जोन्स नावाच्या धार्मिक गुरुच्या अनुयायांनी स्वतःचं शहर वसवलं होतं. जोन्स टाऊन नावाच्या ह्या शहरात त्याचे अनुयायी बाह्य जगाशी संपर्क तोडून जगत होते. जोन्स जी आज्ञा देईल ती पाळली जायची इतका त्यांचा ब्रेनवॉश केल्या गेला होता. जोन्स हा आपल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे तुरुंगात जाणार होता, बहुधा त्याला मृत्युदंडाची शिक्षाही झाली असती. आता आपण पोलिसांच्या तावडीतून वाचणार नाही ह्याची भनक त्याला लागली होती. म्हणून त्यानं स्वतःसोबत आपल्या अनुयायांना सामूहिक आत्महत्ये साठी प्रवृत्त केलं. 918 अनुयायी ज्यामध्ये 276 लहान मुलांचा समावेश होता, सर्वांनी जोन्सची आज्ञा पाळत विष पिऊन आपला जीव दिला. ज्यांनी विरोध केला त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं.
जिहादी आतंकवादी संघटना सुद्धा जन्नत आणि 72 हुरांचं आमिष दाखवून आत्मघातकी बॉम्ब पथक तयार करुन तरुण पोरांना जीव द्यायला लावतात.
आता ह्याच्या मुळात जाऊयात. हे असं का घडत असावं?
जवळपास सर्वच धर्मांनी स्वर्गाची सुंदर आकर्षक कल्पना केली आहे. मृत्युउपरांत जीवनाला इतकं गौरवान्वित केलं आहे की ह्या पृथ्वीवरच्या भिकार जगण्याला वैतागलेली माणसं स्वर्गाच्या आणि देवाच्या मोहक कल्पनेच्या प्रेमात पडतात. मृत्यूनंतर स्वर्गात तुम्ही खुप सुंदर जीवन जगाल असं आमिष त्यांना दाखवलं जातं. ह्या सुंदर जीवनासाठी तुमची पात्रता (eligibility) तयार करण्यासाठी तुमच्याकडून आज्ञाधारकतेची शपथ घेतली जाते. तुम्ही त्या सद्गुरू (कल्ट लीडरची ) प्रत्येक आज्ञा पाळावी यासाठी तुमचा ब्रेनवॉश करुन तशी प्रॅक्टिस करुन घेतली जाते. तुमचा तुमच्या गुरुवर किती प्रमाणात विश्वास आहे ह्याची सतत परीक्षा घेतली जाते. तुम्ही त्यांच्या नियंत्रणात पूर्णपणे आला आहात ह्याची खात्री झाली की मग तुमचा वाटेल तसा उपयोग करुन घेतल्या जातो.
बरं आता तुम्ही म्हणाल ह्या तर मोजक्या आणि दुर्मिळ घटना आहेत. पण तसं नाही. आत्महत्या ह्या शारीरिकच असतात असं नाही. बौद्धिक आत्महत्या अधिक प्रमाणात करवल्या जातात. तुम्ही स्वतःची बुद्धि, तर्क आणि विवेक गुरूंच्या चरणी समर्पित करता तेव्हा खरंतर तुम्ही बौद्धिक आत्महत्याच केलेली असते.
स्वतःची बुद्धि न वापरता केवळ गुरु आज्ञा म्हणून उन्हातान्हात बसून उष्माघाताने मरणाऱ्यांनी सुद्धा एक प्रकारची आत्महत्याच केलेली असते.
मृत्युनंतर काय आहे हे कुणीही बघितलेलं नसताना जर एखादा गुरु तुम्हाला मृत्युनंतरच्या सुंदर मोहक जीवनाचं वर्णन करुन सांगत असेल तर सावध व्हा, तो तुम्हाला (बौद्धिक) आत्महत्येसाठीच प्रवृत्त करत आहे.
~डॉ. विजय रणदिवे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.