गर्व से कहो ?
खुप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,
एकदा माझे पेशन्ट असलेले एक हिंदुत्ववादी काका मला हिंदुत्वाची महिमा सांगत बसले होते. आपला धर्म खतरे में हैं, आणि आता आपण एकजूट व्हायला हवं वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं, काका माझी गर्लफ्रेंड हिंदू आहे आणि मी पण हिंदूच आहे, पण तरीसुद्धा माझ्या जातीमुळे तिच्या घरचे आमच्या लग्नाला विरोध करतायत. तर तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही आणि तुमच्या हिंदुत्ववादी संघटनेचे सगळे कार्यकर्ते मिळून माझ्यासोबत माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी चला आणि तिच्या घरच्यांना समजावून सांगा की मुलगा मुलगी दोघेही हिंदूच आहेत तर लग्नाला विरोध का करता? माझी एवढी मदत कराल का काका?
ह्यावर काका म्हणाले, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही ह्यात काही करु शकत नाही. एवढं बोलून काका निघून गेले, परत कधी हिंदुत्वाच्या विषयावर माझ्याशी बोललेच नाहीत.
∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»≠∞≈«»
आजचा विषय जरा गंभीर आहे. गेल्या दिवाळीतच लिहिणार होतो परंतु टाळलं. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी मला वॉट्सपवर एक फॉर्वर्डेड व्हिडीओ आला. त्या व्हिडिओत काही मुस्लिम लोकांचा जमाव एका हिंदू व्यक्तीला घेरून चोप देत होता. फेसबुकवर त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेयर केल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला मारझोड करुन जाहिर माफी मागायला लावली, त्याचा विडिओ बनवला आणि तो वायरल केला.
मी व्हिडीओ बघितला आणि मला धक्काच बसला. कारण त्या व्हिडिओतली व्यक्ती म्हणजे माझा चुलत भाऊच होता. माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे.
माझे चुलत भाऊ गावी असतात. बालपणीच आई वडील मरण पावलेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. पण मेहनत करुन दोघाही भावांनी मिळून गावात छोटंसं हॉटेल सुरु केलं. हॉटेल खुप चालायला लागलं आणि काही वर्षातच भरपूर पैसा कमावला. घर बांधलं, प्रॉपर्टी घेतली, लग्न केलेत, सोनं नाणं जमवलं. आम्ही 1999 मधेच गाव सोडलं त्यामुळे मग त्यांच्याशी भेटीगाठी कमी होत गेल्या.
परिस्थिती मुळे त्यांना पाचवी सहावी पासून पुढे शाळा शिकता आली नाही. हे सगळं घडताना असं काय झालं माहित नाही पण ह्या दोन्ही भावांवर कट्टर हिंदुत्वाचा प्रभाव झाला. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन असो की हनुमान जयंती, रामनवमी उत्सव असो दणक्यात साजरी करतात ते. स्वतःच्या प्रॉपर्टीत हनुमानाचं मंदिर आहे तिथं दरवर्षी महाप्रसाद आयोजित करतात. धार्मिक कार्यासाठी मोठमोठ्या देणग्या देतात.
ह्या वायरल व्हिडीओच्या एक दोन महिन्यापूर्वी मी त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो तेव्हा माझा हाच भाऊ मला बोलला होता, "दादा तु फेसबुकवर लिहितोस ते मला पटते पण त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या तर उगाच तुला त्रास देतील लोक." त्याला माझ्याबद्दल असलेल्या काळजीपोटी तो बोलत होता.
त्यानं माझ्याबद्दल जी काळजी व्यक्त केली होती ते काही दिवसांनी त्याच्याच सोबत घडलं.
हल्ली लोकांच्या धार्मिक भावना इतक्या हळव्या झाल्यात की जराशी टीका केलेली त्यांना खपत नाही. पण मग सभोवताली घडणाऱ्या घटनांची चिकित्साच करायची नाही का?
मला प्रश्न पडला, स्वधर्माबद्दल इतका प्रचंड अभिमान आणि परधर्माबद्दल द्वेष कुठून आणि कशामुळे आला असेल माझ्या भावांच्या मनात? निश्चितच काही कारण असेल का? मी कधीच त्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा केली नाही. तशी गरज भासली नाही. पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. एखादवेळी त्यांच्याशी बोलावं वाटते पण उगाच त्यांना उपदेश पाजून त्यांच्या भावना दुखवणं मला पटत नाही. ते स्वतःहून चर्चा करायला तयार असतील तर करु शकतो.
परधर्माबद्दल द्वेष कुठून आला हा प्रश्न थोडा बाजूला ठेऊन स्वधर्माबद्दल अभिमान /गर्व कुठून आणि कशामुळे आला असेल ह्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा उत्तरंच सापडत नाही. काय दिलं मला धर्माने ? माझ्या चुलत भावांना तरी काय दिलं? चातुरवर्ण व्यवस्थेत खालच्या श्रेणीत येणारी जात दिली. त्या जातीने तरी काय दिलं? माझे हेच चुलत भाऊ लहानपणी अनाथ झाले तेव्हा एकाही नातेवाईकाने त्यांना सहारा दिला नाही, मदत केली नाही. पाच पैशाचा फायदा झालेला नाही तरीही त्या जाती-धर्माचा कसला आलाय अभिमान?
बरं ज्या धर्माभिमानासाठी मुसलमानांचा मार खाल्ला त्या धर्माचे नेते म्हणून मिरवणारे कोणीही त्याचा बचाव करण्यासाठी पुढं आले नाही. शेवटी भाऊच गेला मदतीला आणि सोडवून आणलं.
वाचन कमी, चिंतन नाही, विवेकबुद्धी कमी, तर्क कळत नाही त्यामुळे आयती मिळालेली जाती धर्माची आयडेन्टिटी सोडता येत नाही, सोडायची गरज भासत नाही. पण जेव्हा अभ्यासू वृत्तीने प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करु लागतो तेव्हा फक्त "माणूस" म्हणून ओळख पुरेशी होऊन जाते. मग जाती आणि धर्माच्या कुबड्या घेऊन चालायची गरज भासत नाही. स्वतःची बुद्धि न वापरणारी धर्माच्या ठेकेदारांनी ब्रेनवॉश केलेली हीच धर्मांध झुंड 'सर तन से जुदा' करायला पुढं असते. क्षमाशिलता सहिष्णूता प्रेम शांती बंधुभाव ह्या धार्मिक शिकवणींचा नेमका तेव्हा ह्यांना विसर पडतो.
दैनंदिन आणि प्रॅक्टिकल जगण्यात कुठंही जात किंवा धर्म उपयोगात येत नाही. कामं पैश्याने होतात अन काम करणारी माणसं कोणत्या जातीची /धर्माची आहे ह्याने काही फरक पडत नसतो.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा