Ⓔ︎Ⓟ︎Ⓘ︎Ⓒ︎Ⓤ︎Ⓡ︎Ⓔ︎Ⓐ︎Ⓝ︎ Ⓟ︎Ⓐ︎Ⓡ︎Ⓐ︎Ⓓ︎Ⓞ︎Ⓧ︎

आजचा लेख लांबलचक आहे. पण माझे बुद्धिवादी वाचकमित्र नक्कीच वाचतील ह्याची मला खात्री आहे म्हणून हा विषय जरा अघळ पघळ घेऊन लिहिला आहे.
लहानपणी आम्ही गरीबी काय असते ते जवळून बघितलं आहे, भोगलं आहे. आजोळी जायचो तेव्हा एका चुलत आजीकडे भेटायला म्हणून जात होतो. ती जख्ख म्हातारी एका दहा बाय दहा च्या खोलीत आपल्या कुटुंबासहित राहायची. त्या इवल्याश्या खोलीत पाच सहा जणांचं कुटुंब राहात होतं. वस्तु कशाबशा एकावर एक रचलेल्या कोंबलेल्या. एका कोपऱ्यात स्वयंपाक, एका कोपऱ्यात न्हानीघर म्हणून नुसताच एक पडदा लावलेला. जेवणं झोपणं सगळं त्या खुराडावजा झोपड्यात. असं असूनही एक कोपरा मात्र देवघरासाठी राखीव ठेवलेला होता. तोही प्रशस्त. देवघरात पंचवीस तीस मुर्त्या. नीट स्वच्छता ठेऊन पुजापाठ केलेला. फूल दिवा अगरबत्ती अन नैवेद्य ठेवलेला.
मला ते भारी वाटलं. त्या आज्जी खुप प्रेमळ होत्या. गरीब असूनही आम्हाला पाहुणचार करायच्या. त्यांच्या घरी दरवर्षी महालक्ष्मी स्थापना व्हायची. महालक्ष्म्यांचं खुप करावं लागतं. खर्चिक काम असतं. म्हणून मला आठवतं माझे बाबा दरवर्षी त्या आज्जीला मनी ऑर्डर करुन आर्थिक मदत करायचे.
मला त्या आज्जीचं दरिद्र्य बघुन प्रश्न पडायचा कि ही म्हातारी इतकं मनापासून देवाचं करते. पण तरीही हिच्यावर देव प्रसन्न झाला नाही कि हिची गरीबी दूर केली नाही.
आमच्या घरची परिस्थिती काही खुप बरी नव्हती. पण देवघर प्रत्येक घरी असतं तसं आमच्याही घरी होतं.
देवावर असलेली श्रद्धा आणि आपली गरीबी हा विरोधाभास मला जाणवयचा. मी ह्याबद्दल आईला प्रश्न केले तर "नशीब" पूर्वजन्मीचे कर्मफळ, देवाची इच्छा अशी उत्तरं मिळायची. साहजिकच ती उत्तरं तिला तिच्या आईकडून मिळाली असणार. अशी उत्तरं सरळ स्विकार केलीत म्हणजे मग चिकित्सा करुन सत्य शोधून काढण्याला वाव उरत नाही. आणि मग रेडिमेड उत्तरं घेऊन आपण जगत असतो.
आपल्या अवतीभवती आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला काहीनाकाही सतत घडत असतं. त्या घटना का बरं आणि कशासाठी घडल्यात ह्याची आपण चिकित्सा म्हणा किंवा कारणमीमांसा म्हणा करत असतो. हि चिकित्सा आपण आपआपल्या बुद्धीनुसार करत असतो. मी लहान असताना सायकल आणि मोटारसायकलची चेन बघून मला वाटायचं, सायकलच्या चेन पेक्षा मोटरसायकलची चेन जाडजूड असते, तर मग ट्रक किंवा बस ची चेन तर त्याहूनही कितीतरी जाडजूड राहात असेल. हा माझ्या बालबुद्धीने लावलेला साधा तर्क होता. पण नंतर जेव्हा मी मोठा झालो आणि प्रत्यक्ष प्रमाणाच्या आधारावर निरीक्षण केलं आणि विज्ञान शिकलो तेव्हा मला कळलं कि ट्रक किंवा बस ला सायकल सारखी चेनच नसते.
बुद्धी वाढली, तर्कशक्ती वाढली आणि प्रत्येक गोष्टीमागचं विज्ञान कळलं कि अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात. दोन घटनांमधला कार्यकारणभाव कळायला लागतो. पण कधीकधी आपण नुसतं वयाने वाढतो, शिक्षणाने मोठं होतो, डिग्र्या गोळा करतो पण आपली तर्क करण्याची विवेकबुद्धी मात्र बाल्यावस्थेतच राहून जाते. त्यामुळे कित्येक गैरसमजुती बाळगून आपण जगत असतो. स्पायडरमॅन किंवा शक्तिमान खरंच असतो असं एका लहान मुलाला वाटणं स्वाभाविक आहे परंतु मोठं झाल्यावरही जर त्याला स्पायडरमॅन शक्तिमानचं अस्तित्व खरं वाटत असेल तर त्याच्या तर्कबुद्धीचा विवेकशक्तीचा विकासच झाला नाही असं आपण म्हणू, नाही का ?
जर आपल्याला तर्क करता आला, चिकित्सा करता आली तर अश्या कित्येक गैरसमजुती एका क्षणात दूर करता येऊ शकतात. तर्क किंवा चिकित्सा म्हणजेच लॉजिकल रिजनिंग हि प्रश्न आणि प्रतिप्रश्न करत करत केली जाते, प्रश्न विचारायचा मग त्यातून मिळालेल्या विविध उत्तरांची चिकित्सा करून अचूक आणि तर्कशुद्ध उत्तर शोधून काढायचं . हि विवेकवादाची पद्धत असते.
विज्ञान आणि तर्कशास्त्र पुराव्यांच्या आधारावर उभं असतं. तिथं श्रद्धेला थारा नसतो. स्पायडरमॅन असतो हि माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे असं म्हणून तिथं चालत नाही, भागत नाही. स्पायडरमॅन असण्याचे विज्ञाननिष्ठ व तर्कनिष्ठ पुरावे द्यावे लागतात. मला स्पायडरमॅन दिसतो, माझ्याशी बोलतो, माझं ऐकतो हा माझा एकट्याचा प्रत्यक्ष अनुभव असूनही चालणार नाही. कारण तो माझा व्यक्तिनिष्ठ अनुभव (सब्जेक्टिव्ह एक्सपीरियन्स ) असून तो व्यक्तिगत असल्याने तो केवळ माझ्या मस्तिष्काचा एक भ्रम असू शकतो हेच ह्यावरून सिद्ध होईल. माझा स्पायडरमॅन इतरांना दिसत नसेल, किंवा कॅमेरा मायक्रोस्कोप टेलिस्कोप इत्यादी वैज्ञानिक उपकरणांच्या कसोट्यांमध्ये त्याचं अस्तित्व सिद्ध करता येत नसेल तर तो केवळ माझ्या मनाचा भ्रम म्हणून सिद्ध होईल. ते वैश्विक सत्याच्या व्याख्येतच बसणार नाही.
कोणत्याही गोष्टीची सत्यासत्यता तर्क विवेक आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध करण्याच्या प्रक्रियेला वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणतात. हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे आपलं संवैधानिक कर्तव्य आहे असं आपल्या संविधानातील आर्टिकल 51A (h) आपल्याला सांगतं. सायन्टिफिक टेम्पर (वैज्ञानिक दृष्टिकोन ) बाळगणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. ह्या आर्टिकल नुसार आपल्याला प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणे , शंका आणि प्रश्न उपस्थित करून त्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून बघणे हा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे.
प्रश्न - उत्तरं - परत प्रश्न- परत उत्तरं- परत प्रश्न - असं करत करत तर्काधिष्ठित निष्कर्षाप्रत पोचणे हि सायंटिफिक टेम्पर ची कार्यपद्धती असते. ह्या पद्धतीत त्या गोष्टीची किंवा त्या विधानाची वैज्ञानिक कसोट्यांवर चिकित्सा करणे अभिप्रेत असते.
एपिक्युरस नावाचा एक ग्रीक तर्कशास्त्री होऊन गेला. त्यानं तर्क आणि विवेकाच्या आधारावर प्रश्न कसे विचारायचे आणि आलेल्या उत्तरांना परत प्रश्न विचारून निष्कर्ष कसा काढायचा ह्याची एक पद्धत स्थापित केली. देव / ईश्वर आहे कि नाही ह्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यानं देव ह्या संकल्पनेची तर्काधिष्ठित चिकित्सा केली. आणि ह्या चिकित्सेअंती तो "देव नाहीच" ह्या निष्कर्षापर्यंत पोचला. एपिक्युरस च्या ह्या तर्कपद्धतीला एपिक्युरिअन पॅराडॉक्स किंवा "एपिक्युरिअन थिअरी अबाऊट गॉड" असं म्हणतात. एपिक्युरस चा हा पॅराडॉक्स खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांनी ह्या पॅराडॉक्स ला आव्हान देत देवाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी चित्रविचित्र तर्क दिले आहेत परंतु ते तर्क अगदीच बालिश पोरकट आणि हास्यास्पद आहेत. एपिक्युरस तरीही आपल्या विरोधी मतांचा आदर करत एक मत असाही मांडतो कि चला दूर आकाशात असलेल्या एका देवाची कल्पना मान्य करून त्याचं अस्तित्व स्वीकार जरी केलं तरीही तो देव आपल्या मानवजातीशी असंबद्ध अनुपयुक्त आणि अप्रासंगिक सिद्ध होतो. म्हणजे देवाचं अस्तित्व मान्य केलं तरीही त्याला शरण जाणे , त्याची आराधना करणे, त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे हे सगळे प्रकार निर्बुद्धतेचे लक्षण आहेत हेच यावरून सिद्ध होते.
काय आहे हा एपिक्युरिअन पॅराडॉक्स ? चला एकेक पायरीने समजून घेऊयात.
ईश्वरवाद्यांची थिअरी काय म्हणते ? तर ह्या विश्वाची निर्मिती आणि संचालन करणारा एक देव किंवा ईश्वर असतो आणि हा देव
सर्वव्यापी (प्रत्येक अणुरेणूत प्रत्येक चराचरात स्थित आणि व्याप्त असलेला )
सर्वशक्तिमान (म्हणजे काहीही करू शकण्याचं सामर्थ्य अंगी असलेला )
सर्वज्ञ ( म्हणजे भूत भविष्य वर्तमान आणि एकूणएक गोष्टीचं ज्ञान असलेला ) आहे.
आणि सुखकर्ता प्रेमस्वरूप दयाळू आणि क्षमावान आहे.
एपिक्युरस देवाच्या ह्या संकल्पनेला आपल्या तर्क आणि पुराव्यांवर आधारित कसोटीवर ठेऊन त्याची पडताळणी करतो, चिकित्सा करतो. एपिक्युरस कुणाशी भांडत नाही, मीच खरा असा अट्टाहास करत नाही, तो देवाची खिल्लीही उडवत नाही, पण तो म्हणतो मी प्रश्न विचारणार , माझ्या प्रश्नांची तर्कशुद्ध समाधानकारक उत्तरं जर मला मिळू शकली तरच मी देवाचं अस्तित्व मान्य करिन. अन्यथा नाही.
त्यासाठी तो सर्वात पहिला प्रश्न विचारतो.
१) ह्या जगात evil म्हणजे दुष्टप्रवृत्ती अस्तित्वात आहेत का ?
ह्या प्रश्नाचं उत्तर "होय" असच येईल. कारण जगात संकट आजारपण गुन्हेगारी चोरी बलात्कार खून इत्यादी नकारात्मक गोष्टी आहेतच हे उघड सत्य असून कुणीही हे अमान्य करू शकत नाही.
'दुष्टप्रवृत्ती आहेत' हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध केल्यावर एपिक्युरस मग त्या सिद्ध झालेल्या उत्तरावर परत दुसरा प्रश्न विचारतो..
२) जर देव आहे तर ह्या दुष्टप्रवृत्तींना आळा घालू शकतो का ? म्हणजे ते त्याच्या सामर्थ्यक्षेत्रात आहे का ?
आता ह्या दुसऱ्या प्रश्नापासून ईश्वरवादाची कोंडी सुरु होते. देव दुष्टप्रवृत्तींना आळा घालू शकतो का ?
आता ह्या प्रश्नाचं उत्तर "नाही" असं दिलं तर मग देवाच्या सामर्थ्यावर बाधा येऊन तो सांगितल्याप्रमाणे "सर्वशक्तिमान" नाही हे सिद्ध होतं.
आणि जर का "होय" असं उत्तर दिलं तर मग एपिक्युरस तिसरा प्रश्न उपस्थित करतो...
३) देवाला दुष्टप्रवृत्तीची जाणीव आहे का ? म्हणजे जगात दुःख आणि पीडा आहेत हे त्या देवाला माहित आहे का ?
ह्या प्रश्नाचीही दोन उत्तरं संभवतात . जर ह्याचं उत्तर "नाही" असं दिलं तर आता देव 'सर्वज्ञ' नाही हे सिद्ध होतं.
आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर "होय" असं दिलं तर मग एपिक्युरस पुढला म्हणजे चौथा प्रश्न अंगावर फेकतो..
४) दुष्टप्रवृत्तीला आळा घालण्याची देवाची इच्छा आहे का ?
याही प्रश्नाची दोन उत्तरं संभवतात , नाही आणि होय . जर "नाही" असं उत्तर दिलं तर मग देवाच्या प्रेमळ आणि सुखकर्ता असण्यावर बाधा येऊन तो "प्रेमळ नाही" किंवा सुखकर्ता नाही हे सिद्ध होतं. आणि जर का "होय" तो दयाळू आहे हे उत्तर दिलं तर मग एपिक्युरस पाचवा प्रश्न उपस्थित करतो..
५) जर देव दुष्टप्रवृत्ती आणि दुःखाला आळा घालू शकतो तर मग दुःख अस्तित्वातच का बरं आहेत ?
ह्या प्रश्नाची आता तीन उत्तरं संभवतात .. एक .. कि दुष्टप्रवृत्ती ह्या देवामुळे नाही तर सैतान राक्षसांमुळे अस्तित्वात आहेत. ह्या उत्तराला एपिक्युरस लगेच काउंटर (प्रतिवाद ) करत उध्वस्त करतो. तो म्हणतो , सर्वशक्तिमान असलेला देव सैतानाला किंवा राक्षसी प्रवृत्तीला एका क्षणात नष्ट का करत नाही ?
दुसरं उत्तर असं दिल्या जातं कि दुष्टप्रवृत्ती / दुःख/ सैतान हे देवानं आपली परीक्षा घेण्यासाठी निर्माण केलीत . याही बालिश उत्तराला काउंटर करत एपिक्युरस म्हणतो , जर देव सर्वज्ञ आहे असं तुम्हीच म्हणता तर मग तो तुमची परीक्षा तरी कशाला घेईल ? कारण तो सर्वज्ञ असल्यामुळे तुम्ही त्या परीक्षेत पास व्हाल कि फेल हे तर त्याला आधीच माहित असणार न ? मग माहीतच असलेल्या गोष्टी परत माहित करून घेण्यासाठी परीक्षा घेणारा देव शहाणा म्हणायचा कि निर्बुद्ध ?
तिसरं उत्तर /तर्क असा दिला जातो कि ह्या जगाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुःख आणि दुष्टप्रवृत्तीही असणं गरजेचं आहे, ती देवाचीच लीला आहे. ह्या तर्कटाला काउंटर करत एपिक्युरस सहावा प्रश्न विचारतो ,
६) दुःखविरहित सृष्टी निर्माण करणं देवाला जमलं नसतं का ? विघ्न विरहित जग तयार करणं देवाच्या क्षमतेत नव्हतं का ? आता.. जर "नाही" असं म्हणाल तर देव "सर्वशक्तीमान नाही" हे सिद्ध होतं . आणि जर "होय" तो दु:खविरहित जग तयार करू शकला असता असं जर मान्य केलं तर मग आता एपिक्युरस पुढला प्रश्न विचारतो ..
७) मग देवानं दोषविरहित दुःखविरहित जग निर्माण का बरं नाही केलं ?
परत तोच हास्यास्पद तर्क करत ईश्वरवादी माणसं उत्तर देतात , कि दुःख देऊन देव माणसांची परीक्षा घेतो. पण एपिक्युरस ह्या तर्कटाला प्रश्न क्रमांक ५ मध्ये विचारलेला प्रतिप्रश्न करतो, कि विद्यार्थी पास होणार आहे कि फेल हे आधीच माहित असूनही त्याची परीक्षा घेणारा शिक्षक शहाणा कि मूर्ख? यावरून एकतर देव शहाणा नाही हे सिद्ध होईल किंवा देव विघ्नसंतोषी आहे किंवा दुष्ट आहे हे सिद्ध होईल. . इतरांचा छळ होताना बघून 'लीला' म्हणून आनंद घेणाऱ्या व्यक्तीला विघ्नसंतोषी किंवा मनोविकृत म्हणतात ना ?
ह्यावर ईश्वरवादी आणखी एक तर्क देतात तो म्हणजे, देवाची मर्जी, त्यानी काय करावं अन काय नाही करावं हे तो ठरवेल, आपण देवाला गाईड नाही करू शकत कि त्यानं काय करावं किंवा केलं पाहिजे.
ह्यावर एपिक्युरस पिकेमधल्या आमिर खानच्या स्टाईलमधे विचारतो, "अच्छा ..ओके.. म्हणजे एक सुंदर दुख-मुक्त वेदना-मुक्त अपराध-मुक्त जग निर्माण करता येणं आपल्या सामर्थ्यात असूनही केवळ 'माझी मर्जी' म्हणून एक दुःखमय जग निर्माण करणारा देव शहाणा किंवा प्रेमळ किंवा सुखकर्ता असू शकतो ? म्हणजे हे तर असच झालं कि लता मंगेशकर सारखं गाता येत असूनही अमृता फडणवीस सारखं गायचं .. का ? तर म्हणे माझी मर्जी !"
एकंदरीत एपिक्युरस आपल्या प्रश्न प्रतिप्रश्नांचा भडीमार करत ईश्वरवाद्यांना आणि त्यांच्या बालिश तर्कांना गारद करतो. तरीही भ्रमिष्टांना असलेल्या सवयीनुसार ईश्वरवादी मंडळी म्हणते कि आमची श्रद्धा आहे एवढं पुरेसं आहे. आम्हाला आमच्या श्रद्धेसोबत जगू द्या. तुम्ही आमच्यात नाक खुपसू नका. त्यावर एपिक्युरस म्हणतो, हरकत नाही. तुम्हाला तुमचे भ्रम घेऊन जगायचं तर खुशाल जगा. पण आम्ही चिकित्सा करूनच सत्य काय ते स्विकार करु.

डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे मृत्युपत्र.