चार्वाक
चार्वाक अभी जिंदा हैं, वो झूकेगा नहीं स्साला!
महाभारताचं युद्ध जिंकून आलेल्या पांडवांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून मोठ्ठा यज्ञ समारंभ आयोजित केला. हजारो ब्राम्हणांना आमंत्रित करुन त्यांना धन धान्य आणि गाय दान करण्याचं ठरवलं. समारंभात दुरून दुरून पंडित पुरोहित शामिल झालेत. यज्ञाला सुरुवात होणार तोच त्यातला एक ब्राम्हण उठून उभा होतो आणि थेट युधिष्ठिराला प्रश्न विचारायला सुरवात करतो.
"युधिष्ठिरा, तु हा भव्यदिव्य समारंभ कशासाठी आयोजित केला?"
युधिष्ठिर म्हणतो, "कारण आम्ही महायुद्ध जिंकून आलोय म्हणून "
"आपल्याच भावांना चुलत्यांना मारून आणि त्यासाठी आपल्याच राज्यातल्या हजारो सैन्यांचं बलिदान देऊन, हजारो लहान मुलांना अनाथ करुन, बायकांना विधवा करुन आणि अनेक माता पित्यांना निसंतान करुन तु "विजयी" झालायस असं वाटतं तुला?" त्या ब्राम्हणाचा दुसरा प्रश्न.
हा प्रश्न ऐकून युधिष्ठिराचा चेहरा पडला, कारण युधिष्ठिर हा दयाळू आणि विचारी पुरुष म्हणून प्रसिद्ध होता. न्यायप्रिय अशा युधिष्ठिराला त्या प्रश्नानं असहज केलं हे तिथं बसलेल्या इतर ब्राम्हणांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या ब्राम्हणा वर शाब्दिक हल्ला चढवला. ते युधिष्ठिरा ला म्हणाले, "हा ब्राम्हण नास्तिक आहे, हा वेदांना प्रमाण मानत नाही, हा देव मानत नाही, मोक्ष, स्वर्ग नर्क पुनर्जन्म मानत नाही, हा फक्त ब्राम्हण आई बापा च्या पोटी जन्माला आलाय पण हा ब्राम्हण नाही, त्यामुळे ह्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तु बांधिल नाहीस. म्हणून ह्याला इथून बाहेर हाकलून दे."
पण हा ब्राम्हण आहे तरी कोण? जो युधिष्ठिरा ला न घाबरता प्रश्न विचारतोय? असं म्हणत भीम आपली गदा घेऊन रागानं उभा झाला.
"चार्वाक! चार्वाक नाव आहे माझं, मी विवेकवादी ब्राम्हण आहे जो केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानतो, स्वर्ग नर्क आणि ईश्वर अशा पोकळ कल्पना मी मानत नाही. मी फक्त माणुसकी, आणि जगण्याचा प्रत्यक्ष आनंद, सुख ह्या गोष्टींना मानतो. जगा आणि जगु द्या ह्या साध्या सोप्या तत्वा वर माझं जीवन आधारित आहे आणि धर्म वगैरे कल्पनांचा उपयोग स्वतः ला धर्माचे ज्ञानी म्हणून घेणारे लोकं केवळ आपल्या स्वार्था साठी करतात हे माझं मत आहे. मी धर्म आणि सत्ते ला प्रश्नाच्या कठड्यात उभं करुन आत्मचिंतन करायला लावतो कि हे जे काही तुम्ही करताय त्याची किंमत जर असंख्य लोकांचे जीव घेऊन चुकवावी लागत असेल तर ते खरंच न्यायसंगत आहे का?"
मनातल्या मनात युधिष्ठिरा ला चार्वाकाचं बोलणं पटायला लागलं होतं, हे बघून इतर ब्राम्हणांच्या आनंदा वर विरजन येऊ शकतं आणि जे दान सावडण्यासाठी सगळे इथे जमले आहेत ते रद्द होऊ शकतं हे त्या पंडितांच्या लक्षात आलं. त्यातला एक जण उठून उभा होतो आणि तलवारीनं चार्वाकाचं डोकं उडवतो.
चार्वाक मेला म्हणून सगळे जण जल्लोष साजरा करतात. पण त्या मूर्खांना माहित नाही कि चार्वाक हा व्यक्ती नसून "विचार" आहे. चार्वाक विवेक आहे, चार्वाक प्रतिप्रश्न आहे, चार्वाक विद्रोह आहे, चार्वाक जिज्ञासा आहे जी कधीच मरत नसते.
चार्वाक अजून जिवंत आहे, धर्मा सारखं संगठीत होऊन इतरांना आपल्या प्रभावात ठेवणं चार्वाकांना पटत नसल्या मुळे भले ते विखुरलेले आहेत, त्यांना कुणाचंही नेतृत्व करुन मिरवण्यात आणि सत्ता गाजवण्यात स्वारस्य नसल्यामुळे भले त्यांचं अस्तित्व असून नसल्यासारखं आहे, परंतु चार्वाका चा मृत्यु शक्य नाही, चार्वाक संपवणं शक्य नाही. दाभोळकर, पानसरे सारखे चार्वाक आजही मारले जातात पण तरीही परत कुणीतरी उभा राहून धर्म आणि सत्ते ला प्रतिप्रश्न करण्याचं धाडस दाखवतोच. चार्वाक विज्ञानाला धर्म मानतो. विवेकाला प्रमाण मानतो. तर्काला आधार मानतो. म्हणूनच तो कोणतीही गोष्ट सगळे मानतात म्हणून आपणही मानायची असं करत नाही. तो प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतो, चिरफाड करतो आणि जर ती तर्काच्या कसोटीवर सिद्ध झाली तरच तिला स्वीकारतो. एकंदरीत चार्वाक हा डोळस पणे जीवन जगतो, आंधळ्यासारखं जगणं त्याला मान्य नाही.
देव, आत्मा, स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म, मोक्ष अशा कपोल कल्पनांमधे रमून जाऊन कुठल्यातरी काल्पनिक देवी देवतांची उपासना करणं, लोकांनी डोक्यावर घेतलेल्या बुवा बाबा महाराजांचे लाखो भक्त आहेत म्हणून आपणही शेळ्या मेंढ्या सारखं दर्शन रांगेत भिकारी बनून उभं राहणं म्हणजे तो आपल्या निसर्गदत्त बुद्धी चा अपमान समजतो.
चार्वाक "नगद" आहे, त्याला स्वर्ग मोक्ष सारख्या उधारीच्या गोष्टी नकोत. आत्ता ह्या क्षणी जगण्याचा आनंद घेणारा तो चार्वाक. कमी असो जास्त असो जेवढं आहे त्याचा पुरेपूर आस्वाद घेत सामोरं जातो तो चार्वाक. चार्वाक प्रत्येकात आहे, नव्हे प्रत्येक जण निसर्गतः चार्वाकच असतो पण धार्मिक चौकट त्याला अनैसर्गिक बनवते.
चार्वाकांना भौतिकवादी म्हणून नेहमीच बदनाम केलं जातं, त्यांची खिल्ली उडवली जाते. पण ह्या चिडवणाऱ्यांना हे मात्र कळत नाही कि आज ह्यांचं जीवन ज्या विज्ञानाच्या कृपेनं सहज सुखद झालं आहे ते विज्ञान म्हणजे ह्याच भौतिकवादी वैज्ञानिकांची देण आहे. तुमच्या हातातला मोबाईल, त्यातलं इंटरनेट हे सुद्धा विज्ञानानं शोधून काढलं आहे, धर्मानं किंवा अध्यात्मानं नाही.
यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।
त्रयोवेदस्य कर्तारौ भण्डधूर्तनिशाचराः
जो पर्यंत जिवंत आहात तोपर्यंत सुखात जगा (सुख भोगा ) कर्ज घ्या पण घृत (तुप ) प्या. काही लोकं चार्वाकांच्या ह्या "कर्ज काढून तुप पिण्याच्या" सल्ल्या ची खिल्ली उडवतात. ह्याचं स्पष्टीकरण असं, पुर्वीच्या काळी तुप म्हणजे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीचं औषध मानल्या जायचं. तेव्हा तुप बदनाम नव्हतं. तुप हे समृद्धी चं पेय होतं. शरीर निरोगी असेल तरच इंद्रिय सुख अनुभवता येतील, म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी कर्ज काढण्याची गरज वाटली तर कर्ज घेऊन तुप घ्यावे असं चार्वाक म्हणतात. लक्षात ठेवा त्यांनी कर्ज घेण्यासाठी सांगितलं, चोरी किंवा उधारी करायला नाही सांगितली. कर्ज तुम्ही व्याजासकट परत करत असता म्हणून इथे कुणाचे उपकार घेतले जात नाहीत.
हा देह मेल्यानंतर भस्मीभूत होणार आहे त्यामुळे पुनरागमन होणार नाही. हे एकच जीवन पहिलं आणि शेवटचं असल्याने ह्याचा पुरेपूर आस्वाद घ्या.
तिन्ही वेद ज्यांनी रचलेत ते मोठे धूर्त लोकं होते ज्यांनी स्वर्ग नरकाच्या कल्पना लोकांना सांगून त्यांचं शोषण केलं.
धार्मिक आणि तथाकथित नैतिक जडणघडण झालेल्या मेंदु ला चार्वाक चटकन झेपणार नाही. चार्वाक विचार म्हणजे पारंपारिक सांस्कृतिक विचारांवर आक्रमण आहे. पण हे आक्रमण फायद्याचं आहे. चार्वाक विचार तुम्हाला अनावश्यक बेड्यां मधून सोडवतो, तणाव, चिंता, असुरक्षितता, लोकभय अश्या गोष्टींपासून मुक्त करतो. चार्वाका पासून शोषण कर्त्यांना धोका आहे म्हणून शोषण करणारे धार्मिक लोकं चार्वाकांचा द्वेष करताना दिसतात. त्यांच्या फसवणूकीच्या धंद्याला हादरे देतो चार्वाक, म्हणून ते चार्वाकांना संपवण्याचे प्रयत्न करतात.
पण चार्वाक संपत नाही आणि वाकत तर मुळीच नाही.
चार्वाक ह्या शोषणकर्त्यांच्या छाताडा वर बसून ठणकावून सांगतो, मैं झूकेगा नहीं साला!
(डॉ. विजय रणदिवे - Rationalist

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा