लिव्हइन रिलेशनशिप
लिव्हइन रिलेशनशिप
आपण एखाद्या विषयावर "थोडक्यात" आपलं मत व्यक्त करायला बघतो. पण तसं करताना आपण व्यक्त केलेल्या मताचा विपर्यास होण्याची शक्यता असते. विषय गंभीर असेल तर व्यक्त होताना आपल्याला जवाबदारीने लिहावं लागतं. शेवटी आपण कितीही समतोल साधायचा प्रयत्न केला तरी वाचकांपैकी बरेच जण त्यांच्या सोयीचा अर्थ घेऊन मोकळे होतात.
आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या मतांना तसं फारसे लोक महत्व देत नसले तरीही आपले विचार वाचणारे मोजके मित्र भ्रमित होण्याचा दोष आपल्यावर येऊ शकतो. आपली मतं आपल्याला आलेल्या अनुभवावर आणि त्यातून आपण घेतलेल्या बोधावर तयार झालेली असतात. प्रत्येकाची आकलन क्षमता कमी अधिक असल्याने एकाच विषयाबद्दल मत मतांतरे असु शकतात. प्रत्येकाला आपलं मत योग्य वाटत असलं तरीही ते त्रुटीयुक्त असु शकते ही शक्यता डोक्यात असायला हवी. व्यक्त होणं गरजेचं आहेच, पण आपलं मत कुठंतरी चुकतंय हे लक्षात आणून देणारे मित्र आपल्या यादीत असले तर ते तुम्हाला करेक्ट करतात. असे मित्र असणं आपल्यासाठी हिताचं असतं. तेव्हा त्यांनी सुचवलेल्या गोष्टींनाही महत्व देण्याचा गुण अंगी असायला हवा.
अश्या विषयांवर आपसात चर्चा होणं गरजेचं असतं. कुणाला आपला जीव गमवावा लागतो, कुणी तुरुंगात जाऊन त्याच्याही आयुष्याची राखरांगोळी होते, दोन्ही परिवारांना कोणत्या मनस्थितीतून जावं लागत असेल ह्याची आपण कल्पनासुद्धा करु शकत नाही.
एक जण मरतो, दुसरा मारतो, तिसरा न्युज कव्हर करतो, चौथा आपल्या सोयीनुसार त्या घटनेचं मूल्यांकन करतो. पण विषय त्या दोघा चौघाचाच नसून उद्या तुमच्या माझ्या कुणा जिवलग व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित असु शकतो.
त्यामुळे ही पोस्ट जरा लांबलचक झाली तरी चालेल पण लिव्हइन रिलेशनशिप बद्दल दोन्ही बाजूने विचार व्हावा ह्या उद्देशाने लिहिण्याचा प्रयत्न करतो.
मी फर्स्ट इयर ला असताना म्हणजे 1999-2000 ह्या काळात माझ्या बॅच मधलं एक जोडपं लिव्हइन मधे राहायचं. अर्थातच ते दोघेही एकमेकांशी लग्न करण्यासाठीही वचनबद्ध होतेच. पण लग्न ते डिग्री पुर्ण झाल्यावर करणार होते. इमॅजिन करा 22 वर्षांपूर्वीचा तो काळ. अकोल्यासारखं एक छोटंसं शहर. ज्या शहरात कपल्स एकमेकांना भेटतही लपून छपून होते त्या शहरात आमच्याच कॉलेजातले दोन कपल्स लिव्हइन मधे राहत होते.
मित्र म्हणून आम्हाला काही आक्षेप जरी नसला तरी काळजी वाटायची. मुलगा आणि मुलगी दोघेही सुखवस्तु घरातले होते. दोघेही पेमेंट सीट वर ऍडमिशन घेतलेले होते. मुलगी अभ्यासात हुशार आणि शिक्षणाला घेऊन सिरिअस हॊती. पण मुलगा आततायी आणि उथळ स्वभावाचा. तो माझा चांगला मित्र. म्हणून मला त्या दोघांचीही काळजी वाटायची. वाटायचं कि हे आतापासून लिव्हइन मधे राहून जरा अतिरेक करतायत. ह्या अतिरेकामुळे ह्यांच्या करिअर वर विपरीत परिणाम होऊ शकतो. मी त्याच्या लक्षात आणून द्यायचो ही गोष्ट. पण ओव्हर कॉन्फिडन्स असतो तेव्हा बुद्धी काम करत नसते. मी म्हणायचो आधी आपलं शिक्षण पुर्ण करा. नंतर लग्न करा आणि सुखाने सन्मानाने जगा. पण नाही! भाऊ जरा जास्तच हुशार होते. दिड शहाणा त्याचा बैल रिकामा ह्या उक्ती प्रमाणे तेच झालं ज्याची मला आशंका आणि भीती हॊती. वर्ष सरते शेवटी तिच्या घरी माहित झालं. तिच्या वडलांनी तिला कॉलेजातून काढून नेलं. तो मुलगा सगळ्या विषयात नापास झाला. ती मुलगी सगळ्या विषयात पास झाली. पण दोघेही डिग्री पुर्ण करु शकले नाही.
ह्या "लिव्हइन" चा खरा अर्थ जर त्यांना कळला असता तर आज दोघेही डॉक्टर असते. ते दोघं आजही माझे चांगले मित्र आहेत. पण मला वाईट वाटतं कि मी त्यांना त्यावेळी धोक्याची संभावना लक्षात आणून दिली हॊती तरीही जे व्हायला नको होतं तेच झालं.
ते जे दुसरं कपल होतं त्यांनी डिग्री तर पुर्ण केली परंतु त्यांच्याही रिलेशनशिप चा अंत दुःखदच झाला.
मी तरीही ह्या दोन केसेस कडं लिव्हइन च्या संदर्भाने पूर्णतः बघत नाही. अपरिपक्व वयात एक थ्रील म्हणून केलेला तो निव्वळ मूर्खपणाच होता असं मी समजतो.
पण ज्याला genuinely लिव्हइन म्हणता येईल असं रिलेशनशिप म्हणजे काय असतं? तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लग्नाचे कोणतेही सांस्कृतिक किंवा कायदेशीर सोपस्कार पार न पाडता विवाहित जोडप्या सारखंच सोबत राहणे म्हणजे लिव्हइन. मग प्रश्न पडतो कि जर नवरा बायको सारखंच सोबत राहायचं आहे तर मग फक्त विवाहाचे सोपस्कार करण्याशीच कसलं वावडं? तर ह्याचं स्पष्टीकरण देताना ही लिव्हइन जोडपी पुढील काही मुद्दे मांडून आपल्या लिव्हइन ला जस्टिफाय करतात.
1) आम्हाला एकमेकांवर प्रेम तर आहे, पण तरीही एकमेकांना आतून बाहेरून जाणून घेता यावं ह्या उद्देशाने आम्ही लग्नापूर्वी काही काळ सोबत घालवायचं ठरवलं आहे.
2) आम्हाला कोणतीही कायदेशीर कमिटमेन्ट नको आहे. जर आम्हाला वाटलं कि आम्ही एकमेकांशी compatible नाही आहोत तर आम्हाला एकमेकांना मोकळं करताना कोणतीही कायदेशीर अडचण यायला नको, शिवाय लग्न समारंभात जो अमाप खर्च झालेला असतो तो खर्च वाचावा म्हणून हा निर्णय.
3) तिसरा मुद्दा ते सांगतात तो हा कि आम्हाला "फ्री" जगणं आवडतं. टिपिकल नवरा बायको बनून जगताना जो पजेसिव्हनेस येतो तो काही अंशी कमी करता यावा म्हणून हे पाऊल आम्ही उचललंय. (हे कारण जरी ते देत असले तरी मुळात ह्या पार्टनर पेक्षा बेटर "दुसरा कुणी" किंवा "दुसरी कुणी" जर आलंच जीवनात तर हिला डच्चू देणं सहज व्हावं ह्यासाठीच दिलेला हा तर्क असतो.)
4) ऍक्च्युअल लग्न झाल्यावर आपण दोघेही नवरा बायको म्हणून कसे वागू, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून जगणं आणि नवरा बायको बनून जगणं ह्या दोन्ही भुमिका निभवताना काय काय चॅलेंजेस येऊ शकतात ह्याची रंगीत तालीम म्हणून आम्ही लिव्हइन मधे राहायचं ठरवलं, हे चौथं कारण ते सांगतात.
एकंदरीत लिव्हइन म्हणजे सामाजिक प्रथा आणि कायद्याची नकोशी मध्यस्थी ह्या दोन्ही गोष्टींना फाटा देऊन लग्नाचे privileges उपभोगणे अशी व्याख्या करता येते. ह्या कन्सेप्ट बद्दल प्रचंड क्लारिटी आणि एकमेकांबद्दल प्रेम विश्वास आणि वचनबद्धता जर दोघांमधेही असेल तर लिव्हइन रिलेशनशिप हा आपल्या प्रस्थापित विवाहसंस्थे पेक्षाही अधिक सुंदर कन्सेप्ट आहे. कारण कायद्याचं किंवा समाजाचं कोणतंही दडपण नसूनही एकमेकांना प्रेम विश्वास देणं, एकमेकांची साथ आयुष्यभर निभवत जाणं हे ओढाताण करत निभावलेल्या पारंपारिक विवाहबंधनापेक्षा सुंदर आहे.
पण ह्या लिव्हइन च्या फेल्युअर साठी कारणं कोणकोणती आहेत तेही लक्षात घेतलं पाहिजे.
मनुष्य प्राण्यासाठी एकपत्नीत्व (monogamy) हे नैसर्गिक नाही. सृष्टीनं निर्माण केलेल्या इतर प्राण्यांमध्ये जसं बहुपत्नीत्व (polygamy) नैसर्गिक आहे तसंच ते मनुष्य प्राण्यातही नैसर्गिक आहे. पण मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने आणि त्यानं समाजात गुण्या गोविंदाने नांदता यावं यासाठी जी सभ्यता आणि संस्कृती तयार केली आहे ती अबाधित राखण्यासाठी एकपत्नीत्व हा नियम अंगीकारला आहे. पण तो नियम निसर्गाने आखलेला नसून मानवनिर्मित असल्याने तो बरेचदा एकपत्नीत्व वर हावी होतो. बायोलॉजी ही नैसर्गिक शक्ती असल्याने ती नेहमीच मानवनिर्मित संस्कारांवर वरचढ ठरते.
आपली बायोलॉजीच monogamous नाही हे सत्य प्रत्येक जण आपल्या अंत:करणातून जाणत असतो, पण सामाजिक भान राखण्यासाठी तो हे सत्य दडपून आपण पतिव्रता /पत्नीव्रता आहोत असं प्रेजेंट करत असतो.
एकपत्नीत्व निव्वळ ढोंग आहे असाही ह्याचा अर्थ नाही. बरेचदा एकाच व्यक्तीशी जीव जडून व्यवस्थित केमिस्ट्री जुळून येते आणि आयुष्यभर त्या एकाच व्यक्तीसोबत एकनिष्ठ राहण्याचं ठरवणं हे देखील सहज शक्य आहे.
निसर्गाने इन्स्टॉल केलेलं हे जे बहुपत्नीत्व आहे ह्यावर मात करणं खुप लोकांना शक्य होत नाही. मग ते ह्यातून पाळवाटा शोधत असतात. लिव्हइन रिलेशनशिप मधे ही पळवाट जस्टीफाय करता येते. म्हणूनही लिव्हइन मधे व्याभिचार करण्याची संभावना वाढून जाते. कोणतंही कायद्याचं बंधन नसणं आणि सामाजिक बांधिलकी नसणं ह्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेतच. त्यातला एक तोटा म्हणजे आपल्या पार्टनर च्या विश्वासर्हते विषयी सतत भीतीची टांगती तलवार दोघांच्याही डोक्यावर लटकत असते. मग त्यातून पजेसीवनेस, इनसिक्युरिटी ची फिलिंग वाढते. शाश्वती नसणे हे मोजक्याच लोकांसाठी जमेची बाजु असु शकते परंतु बहुसंख्य लोकांसाठी तो खुप मोठा निगेटिव्ह पॉईंट असु शकतो.
प्रस्थापित विवाह-संस्था तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून वचनबद्धता मिळवून देते. ती वचनबद्धता पाळली गेली नाही तर न्यायव्यवस्था तुम्हाला त्याची कायदेशीर नुकसानभरपायी मिळवून देण्याचं आश्वासन देते.
आपल्या देशात जिथं आता पर्यंत स्त्री ही पुरुषावर निर्भर असायची तिथं विवाहसंस्था म्हणजे तिच्यासाठी एक वरदान आहे. कमावत्या मुलींचा तो प्रॉब्लम नसल्याने त्यांच्या साठी विवाह म्हणजे केवळ एक मान्यताप्राप्त प्रतिष्ठाप्राप्त सोपस्कार तेवढा उरतो.
शेवटी, लिव्हइन ही मुळात एक सुंदर संकल्पना आहे. पण प्रत्येक संकल्पने चे जसे फायदे तोटे असतात तसे तिचेही आहेत. म्हणून तिची प्रशंसा किंवा आलोचना करण्यापेक्षा ती आपल्या देशातल्या विवाह संस्थेच्या तुलनेत एक बेटर ऑप्शन म्हणून कशी प्रस्थापित करता येईल ह्यासाठी काही आदर्श उदाहरणं वानगी दाखल भरपूर संख्येने समाजासमोर प्रस्तुत व्हायला हवीत. आणि ते मोठं कठीण काम आहे आपल्या देशात.
विवाह संस्था तरी यशस्वी आहे का? नाही. विवाहनंतरचा कलह क्लेश विवाहित लोकांनाच ठाऊक असतो. पण लिव्हइन मधे असतो तसा सुटकेचा मार्ग सोप्या पद्धतीने उपलब्ध नसल्याने विवाह "टिकताना" आढळतात. पण ते टिकणं किती पोकळ आणि जीव गुदमरणारं असतं हे त्या नात्याच्या क्वालिटिवरून लक्षात येतं.
म्हणून माझ्या मते लिव्हइन हा कन्सेप्ट जरी सुंदर असला तरीही आपल्या मेंदूत "भारतीय संस्कृती" नावाचा अँटी व्हायरस इन्स्टॉल झालेला असल्याने हे लिव्हइन नावाचं सॉफ्टवेअर सुरळीतपणे function होणारच नाही.
~डॉ विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा