मृत्यु

 "मृत्यु" वर लिहायची किंवा वाचायची ही योग्य वेळ आहे का? खरं तर हिच वेळ योग्य आहे कारण मृत्यु हा असा अतिथी आहे जो तुम्हाला कधी कधी लिहायला किंवा वाचायला वेळच देत नाही. म्हणून तुम्ही "वाचाल" अशी अपेक्षा करतो.

डॉ. शंतनू अभ्यंकर सरांचा "आपुले मरण पाहिले म्या डोळा" हा लेख वाचण्यात आला. कॅन्सर चं निदान झाल्यानंतर त्यांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक विश्वात कश्या घडामोडी झाल्यात आणि त्या सर्व घडामोडिंकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्याचं वर्णन करणारा लेख त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केला आहे.
विशेष म्हणजे डॉ. अभ्यंकर हे एक विवेकवादी व्यक्ती आहेत. विवेकवादी आहेत अर्थातच ते नास्तिक आहेत. मरण हे अटळ आहे आणि प्रत्येक जण कधी ना कधी मरणारच ह्यावर आस्तिक आणि नास्तिक दोघांचही एकमत आहे. पण..
दोघांचा मृत्युंकडं बघण्याचा दृष्टिकोन अगदी भिन्न असतो. मृत्यु ची भीती ही निसर्गदत्त आहे. मृत्यु चं भय हे survival instinct वर आधारित असल्याने मृत्यु चं भय असणं हे नैसर्गिक आणि आवश्यक आहे. आस्तिक असो वा नास्तिक दोघंही इतर प्राण्यांप्रमाणेच "जीव" असल्याने "मृत्यु-भय" किंवा "जगण्याची इच्छा" असणं हे अगदी नैसर्गिक आहे. फरक आहे तो दृष्टिकोनाचा. एक आस्तिक व्यक्ती मृत्यु ला अध्यात्मिक घटना म्हणून बघते. मृत्यु म्हणजे "ऑडिट" चा दिवस. आयुष्याचा लेखाजोखा होऊन आता आत्मस्वरूप ती व्यक्ती पुढे "गती" करणार आणि आपापल्या कर्मानुसार मग स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म (वेगवेगळ्या योनीत ) किंवा मोक्षाला प्राप्त होणार असं आस्तिकांचं मत असतं.
तोच एक नास्तिक व्यक्ती मृत्यु म्हणजे केवळ "निरूपयोगी झालेल्या कोषिकामय शरीराचं विघटन" म्हणून मरणाकडे बघतो. नास्तिकाच्या मान्यतेला विज्ञान आणि तर्काची जोड आहे तर आस्तिकाच्या मान्यतेला धर्मग्रंथाचा आधार. वैज्ञानिक ग्रंथामध्यें आपसात एकमत आहे परंतु धर्मग्रंथ आपसात विरोधाभास प्रदर्शित करतात. काही धर्म पुनर्जन्म मानतात तर काही धर्म मानत नाहीत. असो.
मृत्यु चं नाव जरी ऐकलं तरी छातीत धडकी भरते. म्हणून आपण सतत ह्या शब्दापासून ह्या विषयापासून दूर पळत असतो. आपण मरणार आहोत हे अटळ सत्य असूनही आपण तो विषय टाळायचा प्रयत्न करतो. पण माझ्यामते प्रत्येकाने ह्या विषयावर चिंतन करायला हवं.
अध्यात्मात असताना मी मृत्यु ह्या विषयावर अनेक पुस्तकं वाचलीत. स्वामी अभेदानंद ह्यांचं प्रसिद्ध पुस्तक Life Beyond Death, खोरशेद भावनगरीचं Laws of Spirit world, अनिता मुरजानी चं Dying to be me, ब्रायन वेस चं Manny lives many masters आणि तत्सम बरीच पुस्तकं मी वाचून काढली होती. सर्वांचं म्हणणं एकच कि आत्मा अमर आहे आणि मृत्यु नंतरही जीवनाचं अस्तित्व आहे.
नचिकेत ची गोष्ट सर्वांनी ऐकली वाचली असेलच. मृत्यु चं गूढ जाणून घेण्यासाठी तो यमाच्या नगरीत जातो आणि त्याला प्रसन्न करुन तो मृत्यु रहस्य सांगण्याची विनंती करतो. पण यमराज मात्र मृत्यु रहस्य सांगण्यास नकार देतो. ते गूढ कुणालाही सांगता येणार नाही आणि सांगितलं तरी ते कळणार नाही असं तो म्हणतो.
एकंदरीत धार्मिक अध्यात्मिक ग्रंथामध्ये मृत्युभोवती एक रहस्यमय वलय तयार करण्यात आलंय. त्यातही वेगवेगळे पंथ आणि धर्म मृत्यु बद्दल जे काही बोलतात त्यात फारच मतभेद आहेत. ज्याला जे सोयीचं किंवा दिलासादायक वाटतं ते तो स्विकारून स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही अध्यात्मिक विधानं स्वतःच स्वतःमधे अंतर्विरोधी आहेत. गीतेत म्हटलं आहे कि आत्मा अलिप्त आहे आणि तिला शस्त्र भेदू शकत नाही अग्नी जाळु शकत नाही पाणी भिजवू शकत नाही. आणि गरुडपुराण म्हणतं तुम्ही जर पापं केली असतील तर मृत्यु पश्चात तुम्हाला शस्त्रानी कापल्या जाईल, आगीत होरपळल्या जाईल आणि पाण्यात डुबवून छळ करण्यात येईल. हे ऐकून बुद्धिवान माणूस म्हणेल "अरे भाई कहना क्या चाहते हो?"
Near death experiences च्या अनेक नोंदी आढळतात परंतु त्या लोकांनी वर्णन केलेला मृत्युंनंतर चा अनुभव हा वास्तविक कमी आणि काल्पनिकच अधिक असण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे mainstream science नं अश्या अनुभवांना अजुन अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही.
मृत्यु हा किचकट विषय जरी असला तरी त्याचा प्रभाव आपल्या जीवनात दिसून येतो. मृत्यु ची अनाठायी भीती माणसाला धार्मिक / आस्तिक बनवते. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे "गांड फटे तब शिरणी बटे". अर्थात मनुष्य जेव्हा खुप भेदरलेला असतो तेव्हा तो देव नावाच्या अदृश्य शक्तीला शरण जातो. जो जितका जास्त घाबरलेला तितका तो जास्त धार्मिक. एखादी व्यक्ती जर रोज दोन दोन तास पर्यंत पुजा पाठ, भजन, स्तोत्र पठण, पारायण, उपवास करत असेल तर ह्याचा अर्थ हा आहे कि ती व्यक्ती तितकी जास्त भेदरलेली आहे. काही लोक पाच मिनटात पुजापाठ आटपून घेतात. दिवा लावला उदबत्ती पेटवली आणि हात जोडून नमस्कार केला, आटोपली पुजा! अश्या व्यक्ती तुलनेनं कमी घाबरट आणि साध्या सरळ असतात.
मृत्यु म्हणजे अज्ञात. अज्ञाताची कुणाला भीती वाटते तर कुणाला कुतूहल वाटतं. खरंच मृत्यु नंतर जीवन असेल तर? कशाला उगाच रिस्क घ्या! काय बिगडतं देवाला मानलं तर? उगाच कशाला त्याला विरोध करायचा? अश्या प्रकारची सोयीची भुमिका घेणारे अधिक आहेत.
नास्तिकांची भुमिका स्पष्ट असते. एक तर देवाचं अस्तित्वच त्याला मान्य नसतं आणि देवाचं अस्तित्व मान्य केलं तरी मग असा विषमतावादी, डूख धरणारा, अन्याय अत्याचार होऊ देणारा, कितीही आर्त हाका देऊनही धावून न येणारा हेकेखोर देव त्याला स्विकार नसतो. अश्या देवाला तो झिडकारून देतो.
आस्तिक हा सतत पाप पुण्याचा हिशेब बॅलन्स करण्याची कसरत करत असतो. खुप पाप झालं आता थोडं दान धर्म करुन बॅलन्स साधुया अशी देवाणघेवाण तो देवाशी करत असतो.
नास्तिक पाप पुण्य मानत नसला तरी काय करणं योग्य आहे, काय करणं अहितकारक आहे ह्याचं भान त्याला असतं. आपल्याकडून "दान" रुपात लाच घेऊन आपली पापकर्म write off करणारा कोणी देव अस्तित्वात नाही त्यामुळे आपणच आपल्या कर्माची जवाबदारी घेतली पाहिजे ह्याची जाणीव ठेऊन नास्तिक व्यक्ती सहसा समाजपयोगी कामं करताना दिसून येतात. (भगत सिंग, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, दाभोळकर, पेरियार, रिचर्ड डॉकिंस आणि स्टीफन हौकीन्स ही काही उदाहरणं )
एक काल्पनिक कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न करतो. एक नास्तिक आणि एक आस्तिक असे दोन मित्र अपघातात मरुन यमलोकी जातात. तिथे त्यांच्या कर्माचा डेटा तपासून आस्तिकाला नरकात आणि नास्तिकाला स्वर्गात धाडण्याची आज्ञा दिली जाते. त्यावर आस्तिक चिडतो आणि यमाला म्हणतो, " हा काय अन्याय आहे? तुमचा काहीतरी घोळ होतोय. मी आस्तिक आहे. आयुष्यभर देवाला मानत आलोय. दानपेटीत पैसे टाकत आलोय. उपवास केलेत. मटण चिकन खाताना दिवसं पाळलेत. मला स्वर्गात जागा मिळायला पाहिजे. आणि हा माझा मित्र आयुष्यभर देवावर अविश्वास दाखवत आलाय, कोणत्याही दिवशी नॉन व्हेज खायचा, देवाला नैवेद्य न दाखवता मोकाट कुत्र्यांना खाऊ घालायचा. ह्याला नरकात पाठवायचं तर तुम्ही त्याला स्वर्गात पाठवताय? "
त्यावर यम म्हणतो, तु आयुष्यभर एका अश्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास केला ज्याच्या अस्तित्वाचं कोणतं प्रमाण तुझ्यापाशी नव्हतं. दुसरे सांगतात म्हणून आपणही मानायचं अशी तुझी भक्ती होती, स्वर्गात जागा मिळावी म्हणून तु दानपेटीत लाच ठेवलीस. तुला देवानं बुद्धी दिली त्याचा तु वापर न करता देवावर विश्वास ठेवलास म्हणून तु अंधविश्वासी आहेस, तुझ्या मित्रानं बुद्धीचा पुरेपूर वापर करुन जे प्रमाण्य आहे तेच स्विकारलं म्हणून तोच खरा स्वर्गात जाण्याच्या लायकीचा आहे.
गोष्ट काल्पनिक आहे पण बुद्धीचा वापर करणं किती आवश्यक आहे हे त्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
निश्चितच लोकोपयोगी आणि हितकारक कर्म करणं बुद्धिमानी चं कार्य आहे. म्हणून चांगल्या कर्माना नास्तिक विरोध करत नाहीत. पण कर्मफळांना घाबरून चांगले कर्म करणं हे नास्तिकांना पटत नाही.
सृष्टी चे नियम ठरलेले असले तरीही त्यात अनिश्चितता आहे. जीवन तुम्हाला कोणतंच प्रॉमिस करत नाही. कशाचीही वॉरंटी गॅरंटी देत नाही. तुम्ही चांगले कर्म कराल तर तुमच्याशी चांगलंच होईल असा नियम नाही, तुम्ही वाईट कराल तर तुमच्याशी वाईटच होईल असाही नियम नाही. काहीच निश्चित नाही. आयुष्यभर बिड्या फुकणाऱ्याला कोणताही आजार होत नाही आणि कोणतंही व्यसन नसलेल्या तरुण व्यक्तीला कॅन्सर सारखे आजार होतात ह्या तुमच्या आजूबाजुला घडणाऱ्या रोजच्या घटना आहेत.
तेव्हा उगाच अंधश्रद्धा बाळगून विज्ञानाला शिव्या घालू नका. विज्ञान सुद्धा परिपूर्ण नाही तरीही ऑक्सिजन लेव्हल खालवली असताना आपण मंदिरात नाही तर हॉस्पिटल मधेच जाऊन ऍडमिट होतो. हॉस्पिटल ही विज्ञानाची देण आहे अध्यात्माची नाही.
चार्वाक म्हणतो,
"यावज्जीवेत्सुखं जीवेत्
ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।
त्रयोवेदस्य कर्तारौ भण्डधूर्तनिशाचराः ।
अर्थात जोपर्यंत जीवन आहे तोवर सुखात आनंदात जगा, देह मेल्यावर तो भस्मिभूत होईल, आत्माच नसल्याने पुनरागमनाचा प्रश्नच कुठे येतो? जे काही आहे ते ह्याच जन्मी आहे. धूर्त पंडितांनी आपलं पोट भरण्यासाठी तिन्ही वेदांची रचना केली आहे.
तेव्हा भरपूर जगा. द्वेष पाळु नका. बुद्धी वापरा.
~डॉ विजय रणदिवे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.