बुलाती हैं मगर
नटसम्राट भाऊराव काका व्हेंटिलेटर वर असतात. इकडे हॉस्पिटल बाहेर पत्रकार आणि भाऊरावांचे हितचिंतक टपरीवर चहाचे घोट घेत आपसात चर्चा करत असतात. सर्वांनां काकांची काळजी लागलेली असते. आतमधे काय चाललंय ह्याबद्दल कुणीच काही सांगत नसल्याने आणि अफवांना ऊत आल्याने गावात संभ्रम पसरलेला असतो. रेडिओ वर राहत इंदोरी च्या शायरीचा कार्यक्रम सुरु असतो. आपल्या अनोख्या शैलीत राहत साहब शेर "इर्षाद" करत असतात.
वो बुलाती हैं मगर जाने का नइ
ये दुनिया हैं उधर जाने का नइ
वबा फैली हुई है हर तरफ़
तेवढ्यात हॉस्पिटल चे सिनियर डॉक्टर्स बाहेर येतात. सगळे पत्रकार त्यांच्याकडे धाव घेतात. प्रश्नांची सरबत्ती सुरु होण्याआधीच डॉक्टर्स भाऊरावांच्या मृत्युची बातमी कन्फर्म करतात. ते ऐकून गर्दीत उभा असलेला एक युवक ढसाढसा रडायला लागतो. पत्रकारांना वाटतं हा बहुतेक भाऊरावांचा कुणी निकटवर्तीय असावा. सगळे जण त्याच्या तोंडासमोर आपापले माईक नेऊन त्याला विचारतात तुम्ही कोण आहात आणि काकांच्या जाण्याने तुम्हाला इतकं दुःख का बरं झालं?
त्यावर तो युवक म्हणतो, माझं तसं त्यांच्याशी काही नातं नाही, खरं सांगायचं म्हणजे भाऊराव काका मला ओळखत सुद्धा नाही. पण ते असे अवेळी निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. त्यांचं स्वप्न होतं आमच्या गावात एकच धर्म स्थापित करण्याचं. गावात बाहेरून आलेल्या इतर धार्मियांना हाकलून देऊन गावात शांति आणि सुव्यवस्था स्थापित करण्याचं. ते स्वप्न पुर्ण केल्याशिवाय ते जग सोडून जाणार नाहीत असं ते बोलले होते. असं म्हणून तो युवक अजूनच जोराजोरात रडायला लागतो आणि बेशुद्ध होतो.
इकडे वर स्वर्गात काकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होते. काकांना आणायला पुष्पक विमान सजवून पृथ्वीच्या दिशेने दोन पायलट (देवदूत) रवाना होतात.
आपल्याला न्यायला विशेष पुष्पक विमान आलं आहे हे बघून काका हर्षित होतात परंतु आपलं महान स्वप्न पुर्ण होण्याआधीच आपल्याला जावं लागतंय ह्याचं शल्य काकांना अस्वस्थ करत होतं. पण काकांचा पुनर्जन्मावर विश्वास असल्याने ते परत पृथ्वीवर येऊन आपलं कार्य पुर्ण करतीलच असा निश्चय करत काका विमानात बसले. विमान "टू सीटर" होतं पण तरीही पॅसेंजर म्हणून काका एकटेच होते. काकांना आपल्याला इकडेही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचं बघून आनंद झाला.
विमान आकाशाच्या दिशेनं भरारी घेतं. दोन्ही पायलटांच्या पाठमोऱ्या आकृत्या काका बॅकसीट मधे बसून बघत असतात. त्यांच्या असं लक्षात येतं कि दोन्ही पायलट एकाच रंगाचे युनिफॉर्म नेसून आहेत पण एकाच्या डोक्यात केशरी रंगाची कॅप आहे तर दुसऱ्या च्या डोक्यात हिरव्या रंगाची कॅप आहे. केसरी रंग काकांचा आवडता होता पण हिरवा बघितला कि काकांना मळमळ व्हायची.
असो, आपल्याला काय कायमचं विमानात बसायचं आहे का? म्हणून काकांनी खिडकीबाहेरील ढग इंद्रधनुष्य आणि चमचमणाऱ्या ताऱ्यांकडे आपली दृष्टी वळवली.
बाहेरचे दृश्य अत्यन्त मनोरम दिसत होते.
तेवढ्यात हिरवी टोपी घातलेल्या पायलट न आपल्या सहकारी पायलट कडं बघत म्हटलं, "अर्ज हैं!"
त्यावर केशरी टोपी वाला पायलट बोलला, "इर्षाद!".
हे ऐकून मागे बसलेले काका दचकलेच. आपण चुकून भलत्याच विमानात "बोर्ड" तर नाही केलं ना अशी शंका काकांच्या मनात आली. पण विमानावर तर आपल्याच नावाचा बोर्ड होता हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी वाचलं होतं.
हिरवा पायलट सुरुवात करतो.
"ये हादसा तो किसी दिन गुजरने वाला था
मैं बच भी जाता तो एक रोज मरने वाला था"
केशरी पायलट त्याला दाद देत "वाह वाह वाह वाह" म्हणतो.
हिरवा पायलट मग दुसरा शेर सांगतो.
"उस आदमी को बस इक धुन सवार रहती है
बहुत हसीन है दुनिया इसे ख़राब करूं"
केशरी पायलट परत दाद देतो.
मग तिसरा शेर..
"नये किरदार आते जा रहे है
मगर नाटक पुराना चल रहा है।"
तिसऱ्या शेर मधे "नाटक" शब्द ऐकून काकांना शंका यायला लागते कि हा माणूस आपल्याला शायरीतून टोमणे तर मारत नाहीये ना? शंकेमुळं काका थोडं घाबरतातच. कारण पृथ्वीसारखं इकडेही प्लेन हायजॅक वगैरे तर होत नसेल ना? असं त्यांना वाटून गेलं. मिरर मधे काकांच्या चेहऱ्यावर भीती बघून हिरवा पायलट पुढला शेर म्हणतो..
"लोग हर मोड़ पे रुक-रुक के सँभलते क्यूँ हैं,
इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यूँ हैं?"
केशरी पायलट तर आता "वाह! माशाल्लाह माशाल्लाह" म्हणत दाद देतो.
आता मात्र काका चांगलेच घाबरतात. प्लेन हायजॅक, 'सर तन से जुदा' वाले वॉट्सप मेसेज त्यांना आठवतात. पण दुसऱ्याच क्षणी त्यांना आठवतं कि आपण तर ऑलरेडी मेलो आहोत. आणि आत्म्याला शस्त्र भेदू शकत नाहीत हे त्यांनी गीतेत वाचलेलं असतं. त्यांना थोडा धीर येतो.
हिरवा पायलट पुढला शेर सांगायला सुरवात करतो..
"हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं,
मोहब्बत की इसी मिट्टी को हिन्दुस्तान कहते हैं"
हा शेर ऐकताच काका जोरदार दाद देतात "वंदे मातरम!" काकांच्या जीवात जीव येतो. पायलट "आपलाच" आहे हे बघून त्यांना आनंद होतो.
जरा वेगळीच दाद मिळाल्याचं बघून पायलटलाही बरंच वाटतं.
पुढला शेर..
"ये सहारा जो नहीं हो तो परेशान हो जाएँ,
मुश्किलें जान ही लेलें अगर आसान हो जाएँ,
ये जो कुछ लोग फरिश्तों से बने फिरते हैं,
मेरे हत्थे कभी चढ़ जाएँ तो इंसान हो जाएँ।"
आता काकांना त्या पायलट चा आवाज कधीतरी ऐकल्यासारखं वाटायला लागलं. कुतूहल म्हणून काकांनी केशरी पायलटला त्या शायर पायलट ची ओळख विचारली. त्यावर त्या हिरव्या पायलटनं परत एक शेर मारला..
अब ना मैं हूँ, ना बाकी हैं ज़माने मेरे,
फिर भी मशहूर हैं, शहरों में फ़साने मेरे
हिम्मत करुन काका त्या हिरवी टोपी वाल्या पायलटलाच थेट विचारतात.. "मला तुम्ही ओळखीचे वाटत आहात, कृपा करुन सांगाल का तुम्ही कोण आहात?"
त्यावर तो पायलट मागे वळून बघतो काकांच्या नजरेत आरपार आपली नजर भिडवून, आणि म्हणतो..
"मैं ख़ुद भी करना चाहता हूँ अपना सामना
तुझ को भी अब नक़ाब उठा देनी चाहिए"
अरे देवा! हे काय? हे तर राहत इंदोरी साहेब आहेत. काका चमकलेच. भाऊराव काकामधला कलाकार राहत साहेबामधल्या कलाकाराला आदाब करतो. "कलाकारांचा धर्म नसतो" हा तरुणपणी केलेल्या कुठल्यातरी नाटकात काकांचा हा डायलॉग त्यांना आठवतो.
भाऊरावांना थोडं "अनकमफर्टेबल" होतं. ते राहत साहेबांना विचारतात कि "मला घ्यायला तुम्ही कसे काय आलात?
नाही म्हणजे तुम्ही तर तिकडे जन्नत मधे राहात असाल न? तुम्ही मला स्वर्गात नेऊन सोडणार आहात ना?
त्यावर इंदोरी साहाब म्हणतात..
मेरी ख्वाहिश है कि आंगन में न दीवार उठे,
मेरे भाई, मेरे हिस्से की जमीं तू रख ले
कभी दिमाग, कभी दिल, कभी नजर में रहो,
ये सब तुम्हारे घर हैं, किसी भी घर में रहो
मी हिंदु तु मुसलमान तो ख्रिस्चन तो शीख हे सगळं पृथ्वीवरचं नाटक असतं माझ्या भावा. इथं सगळे सारखेच असतात. राहत साहेबांचं हे वाक्य ऐकून भाऊराव काकांचे डोळे पानावतात. विमान लँड होतं. भाऊराव उतरतात आणि पानावलेल्या डोळ्यांनीच राहत इंदोरी साहेबांना घट्ट मिठी मारतात. खऱ्या अर्थाने आता भाऊरावांना "राहत" मिळाली हॊती.
"राहत इंदोरी" नावाच्या सच्च्या देशभक्ताला आदरांजली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा