मतलबी बन जा जरा मतलबी

 मतलबी बन जा जरा मतलबी

दुनिया कि सुनता हैं तु
खुद कि भी सुन ले कभी...
(लेखक: डॉ. विजय रणदिवे )
डिस्क्लेमर आणि चेतावणी : पोस्ट जरा ( नाही थोडी जास्तच ) लांबलचक आहे. त्यामुळे आधीच सांगतो, घाईगडबडीत वाचु नका. data ऑफ करुन वाचा म्हणजे मधातच कुणी मेसेज करुन डिस्टर्ब् करणार नाही. पोस्ट वाचून तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला अश्लील वाटु शकतील असे काही शब्द वापरण्यात आले आहेत. तुम्ही parents असाल, फारच सभ्य असाल, धार्मिक असाल तर तुमच्याही भावना दुखू शकतात त्यामुळे आपल्या जवाबदारी वर पोस्ट वाचावी. अन्यथा स्क्रोल करुन खाली जा आणि कच्चा बदाम वाला रील बघा.
तर आजची पोस्ट anxiety (एंझायटी / तणाव) ह्या विषयावर आधारित आहे. तुमच्या जीवनाशी सबंधित विषय आहे. बरेच मुद्दे तुम्हाला पटतील. पुर्ण पोस्ट वाचु शकलात तर नक्कीच तुमच्या फायद्याचं राहील ह्याची गॅरंटी देतो.
तुम्हाला माहित आहे का, कि आपल्यापैकी बरेच जण प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. आणि काहीजण तर अशा तणावाखाली आहेत कि त्यांना त्या तणावाची जाणीव सुद्धा नाही. जगातल्या लोकसंख्ये पैकी 4 ते 5 टक्के लोकं वेगवेगळ्या anxiety disorders ने ग्रस्त आहेत. पण वास्तविक पाहता आपल्यापैकी प्रत्येकच जण थोड्याफार तरी तणावाखाली जगत आहे.
ह्या anxiety ची लक्षणं कोणती आहेत बरं?
Behavioural (म्हणजे वर्तणुकी शी संबंधित लक्षणं) :
hypervigilance (अति सतर्कता ) ,
irritability (चिडचिडपणा )or रेस्टलेसनेस (अस्वस्थ पणा किंवा बेचैनी )
Cognitive (कॉगनिटीव्ह म्हणजे आकलन क्षमते शी निगडित लक्षणं ) : lack of concentration (एकाग्रते ची कमी ) ,
racing thoughts (सतत धावणारे असंख्य आणि अनावश्यक विचार) unwanted thoughts.
Whole body ( सार्वदैहिक लक्षणं ) : fatigue or sweating ( थकवा आणि खुप घाम जाणे )
Also common: anxiety,
excessive worry (चिंता ),
fear (भय ) ,
feeling of impending doom ( काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटणे ) ,
insomnia ( झोप न येणे ) ,
nausea ( मळमळ उलटी सारखं वाटणे ) , palpitations ( छातीत धडधड होणे ) , or trembling ( थरथर कापणे )
वरीलपैकी दोन चार लक्षणं जरी प्रकर्षाने तुम्हाला जाणवत असतील तरी तुम्ही anxiety च्या विळख्यात सापडला आहात असं समजता येईल. जर वरील पैकी जवळपास सर्व च्या सर्वच लक्षणं तुमच्यात तीव्रतेने जाणवत असतील तर तुम्हाला लवकरात लवकर मनसोपचार तज्ञा ची भेट घेऊन औषधोपचार करुन घेणं गरजेचं आहे. आणि अशा तीव्र लक्षणांनी ग्रस्त असाल तर ह्या पोस्ट मधे पुढे जे सल्ले मी तुम्हाला देणार आहे ते क्वचितच तुमच्या उपयोगाचे असतील. कारण शरीरात झालेली रसायनिक गडबड ( केमिकल लोचा ) हा फक्त औषधोपचारानेच बरा करता येऊ शकतो. मी जे (फुकटचे ) सल्ले तुम्हाला देणार आहे ते "फिलोसोफिकल" असल्यामुळे त्यासाठी तुमची आकलनशक्ती थोडी तरी शाबूत असायला हवी तरच ते तुमच्या उपयोगाचे आहेत. आणि हे सल्ले तुमच्या anxiety साठी उपचार म्हणून उपयोगात येतील असा दावा मी करत नाही. माझा उद्देश एवढाच कि जर ह्या लक्षणांची सुरवात झालेली तुमच्या लक्षात येत असेल तर वेळीच आपल्या थिंकिंग आणि वर्तणुकीत बदल घडवून तुम्ही थोडं रिलॅक्स जीवन जगु शकाल.
माझा एक मित्र आहे. तो बरेचदा माझ्या क्लिनिक मधे येऊन गप्पा करत बसायचा. कधी कधी आम्ही निवांत तळ्याकाठी जाऊन चहा चे घोट घेत गप्पा करत बसायचो. माझ्यासोबत गप्पा करत बसणं त्याला खुप आवडायचं. पण... त्याचं सारखं लक्ष घड्याळाकडं असायचं. थोड्या थोड्या वेळात मोबाईल खिशातून बाहेर काढून बघायचा. कारणही तसंच होतं. बायको मुलं घरी वाट बघायचे. जरा का उशीर झाला घरी जायला कि लगेच बायको फोन करायची. बायको वर चिडतो म्हणून ती मुलाला फोन करायला लावून विचारायला लावायची "पप्पा, किती वेळ आहे अजून?"
मित्र म्हणायचा "आलोच बेटा, डॉक्टर अंकल सोबत बसलो आहे"
थोड्या वेळात आणखी फोन.. "या न लवकर घरी, बिट्टू वाट बघतोय, आईस्क्रीम घेऊन याल येताना"
(आईस्क्रीम लवकर विरघळतं म्हणून नवरा आईस्क्रीम घेतल्यावर इकडे तिकडे न भटकता सरळ घरी पोचतो ही शक्कल चतुर बायकांची असते )
थोडया वेळाने पोराचा व्हिडिओ कॉल येतो ( कन्फर्म करण्यासाठी कि पप्पा खरंच डॉक्टर अंकल कडे बसले आहेत कि कोणत्या आंटी जवळ )
आता पप्पा च्या चेहऱ्यावर चं हसु गायब होऊन चेहरा बेचैन दिसायला लागतो. तो मला म्हणतो, "चल मित्रा मला निघावं लागेल. बायको पोरं वाट बघताहेत."
"अरे पण आताच तर आलायस, थोडा वेळ निश्चिन्त होऊन बस, अजून रात्रीचे आठ देखील वाजले नाहीत.".. मी.
"नाही रे बाबा, तुला काय? तुझ्या सारखा आजाद जीव नाही मी. निघावं लागेल मला." असं म्हणून चेहऱ्यावर एक "घाई" चिपकवून तो निघून जायचा.
महिन्या दोन महिन्यातून एखाद स्मॉल पेग घेणारा, सिगरेट तंबाकू ला स्पर्श ही न करणारा, बायको शिवाय इतर कोणत्या स्त्री च्या नादी न लागणारा, नियमित योग प्राणायाम आणि व्यायाम करणारा, खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणारा, क्वचितच नॉन व्हेज खाणारा हा जीव, ह्या कुटुंबवत्सल प्राण्याला एक दिवस अचानक हार्ट अटॅक आला आणि तो आयसीयू मधे भरती झाला. मी भेटायला गेलो तर बेडमधे निपचित पडलेला होता. सतत चेहऱ्यावर चिंता आणि घाई असलेला हा माणूस ICU मधे अगदी रिलॅक्स दिसत होता. चेहऱ्यावर स्माईल होती आणि भीती चं तर नमोनिशाण नव्हतं चेहऱ्यावर. मला आश्चर्य वाटलं. माझ्या सोबत बसलेला असताना ह्याला मी कधीच एवढं रिलॅॅक्स बघितलं नाही. आणि ह्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न तेज चमकत आहे हे बघून मी त्याला कुचकून विचारलं, "काय रे नर्सेस सुंदर सुंदर आहेत ह्या हॉस्पिटल मधे म्हणून एवढा निश्चिन्त आणि आनंदी दिसतोय का?"
त्यावर तो हळूच हसत मला जे बोलला ते ऐकून मी शॉक झालो.
तो म्हणाला, "अरे आता मी इथे आठ दिवस भरती असणार आहे, आणि मी ह्यासाठी खुश आहे कि आता किमान आठ दिवस तरी मला कुणाचेच फोन उचलावे लागणार नाहीत. पप्पा घरी कधी येताय असं वारंवार पोरगा फोन करुन विचारणार नाही, मी कुठल्या दुसऱ्या बाई सोबत तर बसून नाही ना हे चेक करण्यासाठी म्हणून बायको विडिओ कॉल करणार नाही. टार्गेट पुर्ण करण्यासाठी बॉस रेटे देणार नाही. क्लायंट फोन करुन डोकं खाणार नाहीत. पुढले आठ दिवस छान रिलॅक्स जाणार आता, म्हणून मी खुपच प्रसन्न आहे."
हे ऐकून मी चमकलोच. किती विचित्र आहे हे सगळं? टेन्शन रहित निश्चिन्त असे एकांतात स्वतःसाठी स्वतः सोबत घालवता येतील असे काही क्षण उपभोगण्यासाठी एखाद्या ला हार्ट अटॅक येऊन आयसीयू मधे भरती होण्याइतकी किमत मोजावी लागणं हे सुद्धा "परवडल्या" सारखं जर वाटत असेल तर ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं?
मी मनातल्या मनात विचार करत त्याच्या बेड च्या बाजूला बसून मॉनिटर्स चे बीप बीप आवाज ऐकत होतो. "आठ दिवस! आठ दिवसांनी परत हा बेचैन व्हायला लागणार. परत घड्याळाकडे बघत बघत, मोबाईल चे नोटिफिकेशन्स चेक करत आणि मी कुठल्या बाई सोबत बसलेलो नाही हे बायकोला विडिओ कॉल द्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करत करत हा माणूस परत एकदा चेहऱ्यावर "घाई" चा मुखोटा लावून धावत सुटणार आहे. तोवर, जोवर दुसरा अटॅक येत नाही"
कुठून आली ही घाई? कुठून आली ही बेचैनी, अस्वस्थता?? कुणी दिली? आणि आपण ती का बरं स्वीकारली? ती झुगारून देण्याचं बळ का बरं नाही आपल्या पाशी? ह्या बेचैनी शिवाय जगता येणं संभव नाही का? अशा प्रश्नांचं काहूर डोक्यात घेऊन मी हॉस्पिटल च्या बाहेर आलो. बाहेर चं वातावरण हॉस्पिटल च्या आतल्या वातावरणा पेक्षा मोकळं होतं. हॉर्न चे कर्ण कर्कश आवाज, प्रदूषण हे एरवी सगळं वैताग आणणारं चित्र आता सुखद वाटत होतं, सुखद होतच ते आयसीयू च्या तुलनेत. बायको पोरं आणि बॉस ची कावकाव ह्याच्या तुलनेत माझ्या मित्राला जसा आयसीयू सुखद वाटत होता अगदी तसंच! खरंच, तुलनेचाच फरक आहे शेवटी सुख दुःख अनुभवण्या साठी.
आपण सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षेला बसलेलो असतो. सतत कुठला तरी पेपर सोडवत असतो. मी खुप कर्तबगार आहे, मी खुप कुटुंबवत्सल आहे, मी खुप सज्जन आहे, मी खुप नैतिक, धार्मिक आहे, मी खुप आज्ञाकारी मुलगा -बाप -नवरा - बायको - प्रियकर -प्रेयसी - एम्प्लॉयी -नागरिक आहे हे सतत सिद्ध करत राहण्याची स्पर्धा परीक्षा. ह्या परीक्षेला सामोरं जाण्यात आपण स्वतः ला कुठंतरी हरवत जातो.
ह्या सर्वाला कारणीभूत आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या मनात लहानपणापासून ठासवण्यात आलेलं असतं "be a Nice guy", अच्छे बच्चे बनो, छान छान बाळ बना. सालं ह्या "नाईस गाय" बनण्याच्या चक्कर मधे कधी आपला "बैल" होऊन जातो ते कळतच नाही. ह्या बैलाच्या गांडीवर जेव्हा टोचन बसते तेव्हा त्याला कळायला लागतं कि सालं आपण तर बैलगाडी ला जुपल्या गेलोय, इच्छा नसताना. "रानावनातल्या जनावरांना पण बैलगाडी खेचावी लागत असेल का रे?" एका बैलानं आपल्या जोडीदार बैलाला एकदा विचारलं. दुसरा बैल म्हणाला, "काय माहिती यार! मी कधी गेलो नाही तिकडे. पण तो मोती कुत्रा सांगत असतो मला नेहमीच रानातल्या गोष्टी. तो जातो न तिकडे रेगुलर. खुप मज्जा असते म्हणे तिकडे. सगळीकडे हिरवळ असते. कुणी खुट्याला बांधत नाही. बैलगाडी ला कुणी जुम्पत नाही. मस्त ओढा वाहतो म्हणे पाण्याचा. पण यार एकच भीती आहे रानात. ती म्हणजे शिकार होण्याची. वाघ सिंह असतात तिकडे. त्यांच्या तावडीत सापडलं म्हणजे गेलं!"
ते ठीक आहे पण असं बैलगाडीला जुपून गांडीत खिळा टोचून नाकात दोरी आरपार घालून खांद्यावर हजार किलो चं वजन तर ठेवत नसेल ना ते वाघ सिंह लोकं?? पहिला बैल बोलला.
शाळेत मास्तरीण बाई च्या तोंडून, घरी आई बाबा च्या तोंडून आणि समाजात शेजारच्या काकू च्या तोंडून "good boy / good girl " हे शब्द ऐकण्यासाठी सगळा आटापिटा चाललेला असतो आपला. मग त्या शब्दांचं व्यसन जडतं आपल्याला. ते शब्द ऐकण्यासाठी आपण आपली मारून घ्यायला पण तयार असतो. शाळेच्या टिसी वर "समाधानकारक" असा शेरा, गुणपत्रिकेवर Pass with Distinction लिहिलेलं असलं म्हणजे आपण काय सुपरमॅन झालोत असं वाटायला लागतं. अगदी नाकाच्या शेंड्याकडं बघून चालणारी पोरगी आहे, कॅरेक्टर सांभाळून ठेवलं पोरी नं, असे प्रमाणपत्र मिळाले म्हणजे तर अमेरिकन सिटीजनशिप मिळाल्याचा आनंद होतो आपल्याला. समाजाकडून हे दाखले मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्यासाठी आपण तयार असतो. पण ह्याची किती मोठी किमत आपण चुकवत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. जेव्हा कळायला लागतं तेव्हा खुप उशीर होऊन गेलेला असतो. शाळेत चांगले मार्क, मैदानात बक्षीस आणि नोकरीत भलमोठं पॅकेज मिळवलं तरच तुमचं जीवन सार्थक आहे हे आपल्या मनात इतकं वारंवार भरवलं जातं कि ह्या गोष्टी जर आपण मिळवू शकलो नाही तर जगणंच व्यर्थ आहे हे आपण मानायला लागतो.
आपले आई वडील, त्यांनी त्यांचं तरुणपण मस्त एन्जॉय केलेलं असतं किंवा अजिबातच एन्जॉय केलेलं नसतं. पण तरीही त्यांची आपल्या कडून अपेक्षा असते कि आपण आपलं तारुण्य त्यांच्या अर्धवट इच्छा पुर्ण करण्यासाठी खर्च करायला हवं. श्रावण बाळ आणि त्या पुंडलिका च्या गोष्टी सांगून सांगून आपणही त्यांना आयुष्यभर कावडीत बसवून खांद्यावर घेऊन फिरवावं अशी त्यांची इच्छा असते. त्या श्रावण बाळाची गोष्ट मिटक्या मारू मारू सांगितली जाते लहान मुलांना. पण त्या कथेवर कुणीच प्रतिप्रश्न करत नाही. ही श्रावण बाळाची कथा पण खुप मजेदार आहे. आंधळ्या आई बापा ला तरुण पोराच्या खांद्यावर चढून तीर्थयात्रा करण्याची मस्ती सुचतेच कशी? भोकन्या डोळ्यांनी कोणता देव बघणार होते ते? आणि हा चुतिया पोरगा त्यांना खांदयावर घेऊन बैला सारखा रानावनात भटकतो आहे. खांद्यावर घेऊन गावातल्या गावात फिरून हिच काशी आहे नं हेच हरिद्वार आहे असं जरी सांगितलं असतं तरी त्या नेत्रहिनांना कुठे कळलं असतं?
ह्या श्रावण बाळाला तर दशरथा नं मारलं म्हणतात पण ह्याचं भूत अजुनही आपल्या मानगुटी वर बसून आहे. ते भूत सहजासहजी उतरणार नाही. कारण ते भूत पवित्र आहे असं चित्र रंगवण्यात आलं आहे. ते भूत उतरवलं तर गिल्ट नावाचं भूत चढेल. मायबापाची सेवा करु न शकल्याचा गिल्ट, आदर्श पुत्र किंवा पुत्री नसण्याचं गिल्ट. हा गिल्ट आपल्याला सुखाने जगु देत नाही. आपल्या मुलांना आपल्या शब्दात बांधून ठेवण्या साठी मायबाप ही गिल्ट ची दोरी वापरतात. आणि त्या दोरी ला ते "ममता" असं गोंडस नाव देतात. एकदा ह्या दोरीची सवय झाली कि मग ही दोरी वाटेल तो आपल्या हाती घेऊन तुम्हाला आपल्या कंट्रोल मधे ठेवायचा प्रयत्न करतो. ही गिल्ट ची दोरी कधी नवऱ्या च्या हाती जाते, कधी बायको च्या हाती, कधी बॉयफ्रेंड कधी गर्लफ्रेंड कधी बॉस तर कधी तुमचेच मुलं ही दोरी आपल्या हाती घेऊन तुम्हाला माकडासारखं नाचवतात. हा गिल्ट म्हणजे खतरनाक हत्यार आहे. तु परफेक्ट मुलगा नाहीस, तु परफेक्ट विद्यार्थी नाहीस, तु परफेक्ट नवरा नाहीस, तु परफेक्ट बाप नाहीस असं तुम्हाला पटवून दिलं जातं. तुम्हाला ते पटलं म्हणजे तुम्हाला नाचवणं सोपं असतं. ह्या परफेक्ट असण्याला इतकं ग्लोरिफाय करण्यात आलंय कि तुम्ही थोडं जरी इम्परफेक्ट वागले कि आभाळ कोसळतं.
नवरा वेळेवर घरी आला तर तो परफेक्ट.
बायको न वेळेवर जेवण दिलं तर ती परफेक्ट.
पोरानं चांगले मार्क्स मिळवले तर तो परफेक्ट.
पोरीनं मायबापाच्या मनानं लग्न केलं तर ती परफेक्ट.
बॉयफ्रेंड किंवा नवरा आपल्याशिवाय कुणासोबतच फिरायला नाही गेला तर तो परफेक्ट.
मेसेज चा रिप्लाय वेळेवर केला तर परफेक्ट.
भरपूर कमाई असली म्हणजे परफेक्ट.
सालं हे परफेक्ट बनण्याच्या शर्यतीत सगळी वाट लागून जाते. जमलंच पाहिजे का प्रत्येक गोष्टीत परफेक्शन?? नाही जमलं तर नाही का चालणार? आमच्या सारख्या इम्परफेक्ट लोकांचं काही अस्तित्व आहे कि नाही? आम्ही जगावं कि मरावं?
ही नाईस गाय आणि मिस्टर परफेक्ट वाली इमेज झुगारता यायला पाहिजे. जर anxiety नको आहे तर मग समाजानं जबरदस्तीनं आपल्या मानगुटी वर बसवलेली ही श्रावण बाळ आणि मर्यादा पुरुषोत्तमाची भुतं उतरवता यायला पाहिजेत. ही भुतं उतरवली म्हणजे आपण अगदी अनैतिकच होऊन जाऊ असं काही नाहीये. आपण अगदी स्वैराचार करायला लागु किंवा "आग मूतत" फिरू असं होणार नाही. पण "yes boss" म्हणत "होयबा बैल" बनून जगणं सोडावं लागेल. आपलं "स्टॅन्ड" घ्यावं लागेल. ही माझी पर्सनल स्पेस आहे, हा माझा पर्सनल वेळ आहे, मी ह्या वेळात मला वाटेल ते करीन, वाटेल तिथं जाईल, मी कुणाला हिशेब देणार नाही, मला कुणी जाब विचारणार नाही, हे घोषित करावं लागेल.
सर्वांना त्यांच्या हक्काचा वेळ द्या, आई बाबांची काळजी घ्या, बायको लेकरांना वेळ द्या. पण स्वतः कडं दुर्लक्ष करु नका. स्वतः ची स्पेस स्वतः साठी राखून ठेवा. त्या स्पेस मधे तुमच्या शिवाय कुणालाच एन्ट्री नको. कुणी जबरीनं त्या स्पेस मधे घुसायचा प्रयत्न केलाच तर ठामपणे सांगा त्यांना कि प्लिज आपल्या ठरवून दिलेल्या क्षेत्रातच राहा. आपल्या सीमेत राहा. मी तुमच्यावर प्रेम करतो, मला तुमच्याबद्दल काळजी आहे, पण.. आपल्या मर्यादा पाळाल तर बरं राहील. आणि मग जो तुमचा स्वतः चा वेळ आहे, तुमची जी स्वतः ची स्पेस आहे त्यामध्ये तुम्ही वाटेल ते करा. पुस्तक वाचा, संगीत ऐका, फिरायला जा, खा - प्या, मौज करा. लिहा, वाचा, फेसबुक वर बकचोदी करुन व्यक्त व्हा. प्रत्येक फोन उचलू नका, प्रत्येक मेसेज ला रिप्लाय करु नका, फोन का उचलला नाही, रिप्लाय का केला नाही ह्याचं स्पष्टीकरण देत बसु नका. आपल्या प्रत्येक क्षणाचा हिशेब देण्यास तुम्ही बांधील नाही. तो हिशेब ठेवण्याचा तुमच्याशिवाय कुणाला अधिकार ही नाही. हे प्रत्येक नात्यात प्रत्येकाला कळायला हवं. प्रेम आपल्या जागी, आपली पर्सनल स्पेस आपल्या जागी.
हे सगळं करताना narcissist बनू नका. नारसीसीस्ट म्हणजे अशी व्यक्ती जिला दुसर्यांना दुःख देऊन स्वतः सुख घेणं आवडते ( म्हणजे आपलं सुख दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून नको )
लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा जीव जरी पणाला लावला तरी तुम्ही तुमच्या आजु बाजूच्या सर्वच लोकांना संतुष्ट करु शकत नाही. ती तुमची क्षमताही नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला खुश करत राहण्याची आवश्यकता देखील नाही. तुम्ही कितीही केलं तरी सतत कुणी न कुणी तुमच्याशी असंतुष्ट राहीलच. तेव्हा आपलं सूत्र आपल्या हाती घ्या. आपलं मानसिक स्वास्थ स्थिर ठेवा. स्वतः चं मोल प्रत्येकाच्या नजरेत सिद्ध करण्याच्या फंदात पडु नका. ज्यांचं तुमच्यावर खरोखर प्रेम आहे ते तुमच्या पर्सनल आनंदा वर अतिक्रमण करणार नाहीत. ज्यांचा तुमच्यावर खरोखर विश्वास आहे ते तुमच्यावर शंका घेणार नाहीत. आणि अवाजवी कमीटमेंट्स करणं टाळा, अशे वचन देऊ नका जे पाळणं कठीण असेल किंवा जे पाळण्यासाठी तुम्हाला स्वतः च्या छोट्या छोट्या आनंदाचा बळी द्यावा लागेल. आयुष्य एकदाच आहे, ते भरपूर जगा. आवडेल ते करा. कधी हार्ट अटॅक येऊन पुढली वाट धरावी लागेल ह्याची शाश्वती नाही. साधनांची वाट बघत बसू नका. जेवढी साधनं उपलब्ध आहेत तेवढीच वापरून सुख अनुभवा. आपले छन्द जोपासा. मनोरंजन करा. तब्येत सांभाळा. प्रेम करा. जास्त वेळ एकमेकांवर रुसून राहु नका. एकमेकांच्या प्रेमावर शंका घेऊ नका. समोरच्याला त्याचं प्रेम सिद्ध करायला भाग पाडू नका. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार प्रेम देत असतो, तुमची प्रेम देण्याची क्षमता जास्त आहे म्हणून तुमच्या पार्टनर न सुद्धा तेवढंच प्रेम तुम्हाला दिलं पाहिजे ही अपेक्षा ठेऊ नका, कदाचित त्याची तेवढी क्षमता नसेल. कुणाला त्याच्या क्षमते पेक्षा जास्त मागणी करणं म्हणजे हिंसा आहे शोषण आहे. जेवढं मिळतंय तेवढं आनंदाने स्वीकारा.
लहानपणी प्रभुदेवाचं "उर्वशी उर्वशी टेक इट इजी उर्वशी" हे गाणं खुप आवडायचं. प्रभुदेवाचा डान्स आणि ए आर रहमान चं संगीत म्हणजे जणु स्वर्गीय अनुभव, पण त्या गाण्याच्या लिरिक्स म्हणजे जीवनाचा मंत्र आहे असं वाटतं.
So take it easy yaar!
(डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.