युटोपियन स्वप्नांचं सुपर मार्केट


 सर थॉमस मोर ह्या फिलोसॉफर - लेखकानं सोळाव्या शतकात एक "युटोपिया" नावाचं पुस्तक लिहिलं. युटोपिया (Utopia) म्हणजे एक कल्पनेतला देश किंवा एक काल्पनिक बेट जे आपण राहतो त्या दु:खमय आणि "imperfect" जगापासून अगदी भिन्न आहे. अर्थातच हे "युटोपिया" नावाचं स्थळ अस्तित्वात नाही तरीदेखील ह्या युटोपिया चं वर्णन करताना म्हटलं आहे कि असं जग जिथं दुःख, भय, चिंता , द्वेष, इर्ष्या, मोह, आजार, गरिबी, गुन्हेगारी, पारतंत्र्य, विरह आणि विवंचनेचा लवलेशही नाही. म्हणजेच एक असं विश्व जिथं फक्त सुख आनंद आणि हर्ष - उल्हासाचं साम्राज्य आहे. युटोपियात वास्तव्यास असलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव प्राणी पक्षी हे अप्रतिम सौंदर्याने नटलेले असून तिथं उन्ह वारा पाऊस हे ऋतू सुद्धा अगदी आपल्या सुंदरतम अवस्थेत आणि एका लयीत संचालित होत असतात. रसरशीत आणि अवीट अश्या स्वादाने भरपूर अशी विविध फळे झाडांवर लगडलेली आहेत आणि स्वच्छ शीतल मधुर पाण्याचे ओढे जिकडे तिकडे वाहत आहेत. युटोपिया मधे कुणाचं कुणाशी वैर नसल्याने कुणाची भीती नाही कि इर्ष्या नाही. प्रत्येका साठी प्रत्येक सुख विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने तिथं कुणी कुणाची वस्तु चोरत नाही. कुणी कुणाच्या सुखात व्यत्यय आणत नाही. तिथं भांडणं होत नाहीत. अपघात होत नाहीत. भूकंप पूर ह्यासारखी नैसर्गिक आपत्ती येत नाही. म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच म्हणा.

कित्ती छान वाटतंय ना ही कल्पना ऐकून? आनंदाच्या उकळ्या फुटतात. नाही?
पण कितीही सुंदर आणि लोभस असली तरी ती शेवटी एक कवीकल्पनाच आहे. कोरी कल्पना!
ह्या स्वप्नांचं एक भलं मोठं मार्केट आहे. ह्या स्वप्नांचे manufacturers आहेत, मार्केटिंग आहे, विक्रेते आहेत आणि भरमसाठ ग्राहक आहेत. ह्या काल्पनिक युटोपियन स्वप्नांना आपण रोज नगदी किंमत मोजून खरेदी करत असतो. आपल्या खिशातून पैसे घेऊन आपल्याला संमोहित करुन फक्त स्वप्ने दाखवली जातात. जोवर आपण गाढ झोपेत आहोत तोवर ती स्वप्ने आपल्याला आभासी आनंदाचा क्षणिक अनुभव देतात. पण जाग येताच हाती येते तो भ्रमनिरास आणि हताशा.
मार्केटिंग आणि बिजनेस च्या जगतात एक सूत्र असतं. ज्या ठिकाणी ज्या वस्तुची टंचाई असेल त्या जागी त्या वस्तुच्या विक्रीला अधिक स्कोप असतो.
जिथं समृद्धी, सदाचार, क्षमाशिलता इत्यादी मूल्यांचा अभाव असेल तिथल्या लोकांना ह्या "प्रॉडक्ट्स" ची स्वप्ने सहज विकता येतात. आपल्या देशातल्या बहुतांश लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, "घर में नहीं दाना, अम्मा पुडी पकाना". म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचाही वृथा अभिमान बाळगण्याची वृत्ती. सहिष्णूतेच्या प्रेमाच्या क्षमाशिलतेच्या कोरड्या गोष्टी करायच्या परंतु प्रत्यक्षात मात्र ह्याच मूल्यांचा अभाव आहे. मग "अभाव तिथं पुरवठा" ह्या बिजनेस सूत्रानुसार ही मूल्ये शोकेस मधे सजवून त्यांची विक्री केली जाते. विक्रेत्यांची इथे कमी नाही. "एक ढुंढो हजार मिल जायेंगे."
ह्या मूल्यांची विक्री करणाऱ्या बाजारास "अध्यात्म" असं म्हणतात. ह्या अध्यात्माच्या मार्केट मधे तऱ्हे तऱ्हेचे विक्रेते आपापली दुकानं थाटून बसले आहेत. अश्याच एका युटोपियन स्वप्नांच्या सौदागराच्या जाहिराती आणि भूल थापांना बळी पडून कित्येक तरुणांना आपल्या करिअर आणि मानसिक आरोग्याचं वाटोळं करुन घेतलेलं मी जवळून बघितलेलं आहे.
80 च्या दशकात पुण्यात राहणारा जगदीश जुमानी नावाचा एक इसम जो दहावी-बारावी पर्यंत सुमार शिक्षण घेतो. पुण्यातल्या एका इंजिनिअरिंग लॅब मधे लॅब असिस्टंट म्हणून इंजिनिअर्स च्या हाताखाली काम करतो. नंतर त्याला लवकर श्रीमंत आणि लोकप्रिय होण्याच्या स्वप्नांचा ध्यास लागतो. रक्तातच "बिजनेस" असलेल्या कम्युनिटीत जन्म घेतलेला तो एक भन्नाट शक्कल लढवतो. आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे, ईश्वरप्राप्ती झाली आहे, मोक्ष मिळाला आहे, उच्चतम ज्ञान प्राप्ती झाली आहे अश्या थापा मारून युटोपियन स्वप्ने विकून लोकांना आपले फॉलोवर्स बनवतो आणि त्यातून भलंमोठ आश्रमरुपी साम्राज्य उभं करुन स्वतः ला अवतारी पुरुष म्हणून प्रस्थापित करतो. युटोपियन स्वप्नांना भाळून हजारो लाखो लोकं त्याच्या भूल थापांवर विश्वास ठेवतात. आणि हा धूर्त माणूस ह्या मूढ लोकांच्या एका भल्यामोठ्या समुदायावर राज्य करतो.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे मृत्युपत्र.