पुस्तक
मला अजूनही आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी त्या पुस्तकांपैकी शंभरेक तरी पुस्तकं अंगणात रचून त्यावर घासलेट ओतून पेटवून दिली होती. माझ्या आईला ते बघून धक्का बसला होता. तिला वाटलं मी वेडा झालो कि काय? ज्या पुस्तकांवर मी जीवापाड प्रेम केलं त्या पुस्तकांची मीच होळी करताना बघणं तिला झेपलं नाही.
»≈«»≈«»≈»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»≈«»
"पुस्तकं माणसाचे मित्र आहेत" असं म्हटल्या जातं.
माझ्याही जीवनात पुस्तकरूपी अनेक मित्र आलेत. त्यांनी माझं मनोरंजन केलं. मला खोट्या का होईना आशा दाखवल्या स्वप्ने दाखवली.
2004 ते 2014 ह्या काळात मी शेकडो पुस्तकं वाचली.
शेकडो पुस्तकं माझ्या घरी शेल्फ मधे संग्रहित होती. परंतु त्यातली अधिकांश पुस्तकं अध्यात्म आणि स्वविकास ह्या विषयावर होती. अध्यात्म आणि स्वविकास ह्या विषयातली फ्लॅगशिप मानली जाणारी पुस्तकं माझ्याकडे होती.
हे सगळं कशासाठी चाललं होतं? कोणती परीक्षा पास करायची होती मला जो इतका सखोल अभ्यास करत होतो मी?
मला हवा होता आत्मसाक्षात्कार, ईश्वराचा बोध करायचा होता मला.
पण इतका इमानदारीने अभ्यास करूनही, साधनारूपी प्रात्यक्षिक करूनही, आणि भावभक्ती जागृत होऊनही देव मात्र भेटत नव्हता. किंवा "हा मी आहे.. हे माझं सत्य स्वरूप आहे " असं घोषित करता येईल असा कसलाही साक्षात्कार होत नव्हता.
मग मला ह्या सर्व पुस्तकांची.. साधनांची आणि आर्त भक्तीची व्यर्थता जाणवायला लागली. 12 वर्षाच्या कालावधीत आपण जो तप केला तो व्यर्थ ठरला असं वाटायला लागलं. ज्ञान आणि भक्तीचं ऑडिट करता असं लक्षात आलं कि आपण घाट्यात गेलोय.
2014 मधे रॉबर्ट ऍडम्स चं "सायलेन्स ऑफ द हार्ट" हे पुस्तक वाचण्यात आलं. ते पुस्तक अध्यात्मातलं शेवटचं पुस्तक ठरलं. मला जी व्यर्थता जाणवायला लागली होती ती त्या पुस्तकानं आणखी जास्त जाणवून दिली. तसं हे पुस्तक सुद्धा अद्वैत वेदांत आणि स्व चा साक्षात्कार ह्या विषयावरच आधारित होतं परंतु ह्या पुस्तकानं एक गोष्ट स्पष्ट करुन दिली कि कुठल्याही विषयाच्या खोलात शिरण्यासाठी फापटपसारा गोळा करण्याऐवजी त्या विषयांतलं नेमकं सूत्र शोधलं पाहिजे.
एकदा भगवान बुद्धांना एकाने प्रश्न विचारला., ज्ञानाची व्याप्ती किती आहे? तर बुध्दानी त्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल अरण्याकडं बोट दाखवलं. बापरे! ज्ञान अरण्याएवढं विशाल आहे तेव्हा तर माझं एक आयुष्य सुद्धा कमी पडेल ते मिळवण्यात.
त्या माणसानं मग दुसरा प्रश्न विचारला, "ह्या ज्ञानरूपी अरण्यातलं नेमकं किती ज्ञान मिळवलं म्हणजे माझं जीवन सफल होईल?"
त्याच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत बुध्दानी त्यांच्या बाजुच्या एका झाडाची मूठभर पानं तोडली आणि त्या व्यक्तीच्या हातात ठेवली.
बस! इतकंच?
कोणत्याही विषयाच्या खोलात शिरण्यासाठी खुप नाहीतर नेमकं ज्ञान कामाचं असतं.
जेव्हा मला ह्या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा मला ह्या पुस्तकरूपी पसाऱ्याची निरर्थकता व्यर्थता कळायला लागली. मला अजूनही आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी त्या पुस्तकांपैकी शंभरेक तरी पुस्तकं अंगणात रचून त्यावर घासलेट टाकून पेटवून दिली होती. माझ्या आईला ते बघून धक्का बसला होता. तिला वाटलं मी वेडा झालो कि काय? ज्या पुस्तकांवर मी जीवापाड प्रेम केलं त्या पुस्तकांची मीच होळी करताना बघणं तिला झेपलं नाही.
त्या दिवसापासून मी अध्यात्मवरील पुस्तकं मागवणं आणि वाचणं बंद केलं. कोणती पुस्तकं वाचली नसतील मी? ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी ह्या पुस्तकापासून सुरु झालेला माझा प्रवास विनोबा भावे, विवेकानंद, बायबल कुराण गीता, अष्टावक्र गीता, रिभु गीता, उद्धवगीता, गीता प्रेस गोरखपूर प्रकाशनाची सर्व दिग्गज पुस्तकं, दीपक चोप्रा पासून ते रॉबिन शर्मा पर्यंत, काय काय नसेल वाचलं मी?
हळूहळू हा पसारा कमी होत गेला. शेल्फ मधला आणि हृदयातलाही. नेमकं मर्म कळायला लागलं. ज्या शांतीच्या शोधात मी पुस्तकं जमा करत गेलो होतो ती शांती मला पुस्तकं कमी कमी करत नेताना मिळत गेली.
ही सर्व अध्यात्मिक आणि सेल्फ मोटिवेशनल पुस्तकं भ्रामक आहेत. ती पुस्तकं म्हणजे तुम्हाला तात्पुरतं आशावादी पॉजिटीव्ह बनवण्यासाठीचा एक तंबाखू आहे जो जोपर्यंत तुम्ही चघळत राहाल तोपर्यंतच तुम्हाला कीक बसेल. कितीही लोभस वाटत असल्या तरी त्या परीकथा आहेत. एक भ्रामक देव एक भ्रामक स्व शोधण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करुन आपली पुस्तकं विकायची आणि आपल्या भ्रामक कल्पना तुमच्या डोक्यात भरायच्या उद्देशाने लिहिण्यात आलेली पुस्तकं आहेत ती.
ह्या पसाऱ्यापासून जेवढा मोकळा होत गेलो तेवढा शांत सुखी आणि संतुष्ट होत गेलो. अपचन झालेल्या रुग्णाला उलटी केल्यावर जसं हलकं हलकं आणि प्रफुल्लित वाटतं तसं मी फील करत गेलो.
इथून पुढं मी मग वास्तववादी पुस्तकांकडे वळलो. जीवनाचं वास्तववादी वर्णन करणारी पुस्तकं. सत्यशोधक पुस्तकं. विवेकवादी विज्ञानवादी पुस्तकं. त्या पुस्तकांबद्दल ह्या लेखाच्या पुढल्या भागात लिहिणार आहे मी.
~डॉ विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा