सुखी माणसाचा सदरा
एक होता राजा, एक होती राणी. राजाचं राणी वर खुप प्रेम होतं परंतु राणी ला कधीच त्याच्या प्रेमावर विश्वास बसत नव्हता. राणी ला सतत वाटायचं कि राजा कधीही माझ्याशी दगा करून दुसरी राणी घेऊन येईल. राजा तिच्यावर खरं प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा, ती खुश राहावी यासाठी गाणी म्हणायचा, जोक्स ऐकवायचा, नाचून दाखवायचा. पण राणी काही केल्या खुश होईना.
काही केलं तरी राणी खुश होत नसल्याचं बघुन राजा खिन्न व्हायचा, उदास व्हायचा. त्याला उदास बघुन मंत्री दुःखी व्हायचे. एका मंत्र्यानं राजाला सल्ला दिला, दूर पहाडावर एक महाराज आहेत ते सुखाचा मार्ग दाखवतात. राजा निघाला त्या महाराजाची भेट घ्यायला. महाराज म्हणाले, " मी तुला सुखाचा उपाय सांगु शकतो पण तुला एक काम करावं लागेल."
राजा पराक्रमी होता, त्याच्यासाठी बायको ला खुश ठेवण्या व्यतिरिक्त कोणतंच काम अशक्य नव्हतं.
राजा नं विचारलं, "कोणतं काम करावं लागेल महाराज?"
"जा आणि एखाद्या सुखी माणसाचा सदरा (शर्ट )घेऊन ये "
राजा निघाला वेषांतर करून. गावात गेला, ज्याला त्याला विचारत होता "तुम्ही सुखी आहात का? आणि जर असाल तर मला तुमचा सदरा द्याल का?"
सदरा द्यायला तर प्रत्येक जण तयार होता, पण मी सुखी आहे असं कुणालाच वाटत नव्हतं.
राजा हताश झाला. शेवटी एका जणानं त्याला सांगितलं, " नदीकाठी जा तिथे तुला एक सुखी माणूस भेटेल".
राजा नदीकाठी गेला, तिथं काठावर बसून एक माणूस सुंदर बासुरी वाजवत होता. ती बासुरी ऐकून राजा मंत्रमुग्ध झाला. त्या माणसाचा चेहरा प्रसन्न होता. राजाची खात्री झाली कि हा नक्कीच सुखी माणूस आहे.
राजा त्याला विचारतो, "तु खुप खुश दिसतोस, तु खरंच सुखी आहेस का?"
त्यावर माणूस बोलला, हो मी खुप खुश आहे आणि सुखी आहे. 
राजा बोलला, मला पण सुख हवंय पण त्यासाठी मला एका सुखी माणसाचा सदरा हवाय. तु देशील का मला तुझा सदरा?
त्यावर स्मित हास्य करत तो माणूस उत्तरला,
"मित्रा, माझ्याकडे सदराच नाही आहे, म्हणजे सदरा घेण्याइतके पैसेच नाहीये, मला क्षमा कर
"
राजा एका क्षणासाठी हताश झाला, पुढल्याच क्षणी राजा आनंद आणि सुखाने भारावून गेला. कारण त्याला काहीतरी उमगलं होतं. 
-डॉ विजय रणदिवे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा