आचार्य प्रशांत

 एक नवीन "बाबा" आणि एक नवा "कल्ट" उदयास येत आहे.

हा आचार्य प्रशांत (त्रिपाठी ).
६-७ वर्षांपूर्वी हा नुकताच बाबागिरी व्यवसायात आलेला होता. तेव्हा मी ऋषिकेश ला गेलेलो असताना हा कित्येकदा गंगेकाठी फिरताना किंवा त्याच्या दोन चार पिटठू शिष्यांना घेऊन बसलेला दिसायचा.
आता हा चांगलाच नावारूपास आला आहे. तरुण वर्ग ह्याला मोठ्या प्रमाणात फॉलो करतो. कारण ह्याची विद्रोही व्याख्यान शैली. आजच्या युवा वर्गाच्या मनात चाललेली करिअर आणि रिलेशनशिप बद्दलची घालमेल - घुसमट ह्यानं चांगली हेरली आहे आणि त्यावर भाष्य करण्याची एक प्रभावी पद्धत विकसित केली आहे.
तर हा IIT IIM चा विद्यार्थी असून खाजगी कंपन्यात मोठमोठ्या पोस्ट वर काम केलेला अधिकारी होता. काही अफवा अश्या आहेत की हा प्रशासकीय अधिकारी सुद्धा राहिलेला आहे ( पण ह्याची पुष्टी करण्यासाठी पुरावे मला सापडले नाहीत ) ह्याचे आई वडील दोघेहि प्रशासकीय अधिकारी होते. ह्यानं सुद्धा आयएएस अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
ह्याला "अध्यात्मिक गुरु" म्हणून डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांनी थोडं डोकं ठिकाणावर ठेऊन विचार करणं आवश्यक आहे की हा "बाबा" गेम कोणता खेळत आहे. अन्यथा ह्याच्या नादी लागून तुम्ही स्वतः च्या करिअर कडे दुर्लक्ष कराल आणि ह्यांचं करिअर घडवण्यात आपली ऊर्जा गमवून बसाल.
IIT, IIM केल्यानंतर करिअर चं रॉकेट सुसाट वेगाने आकाशात भरारी घेतं ह्या गोष्टीची जवळपास खात्रीच असते. क्वचितच एखादा विद्यार्थी असा निपजतो ज्याचं असं काही खास कर्तृत्व नाही. पण जवळपास ९५ टक्के विद्यार्थी मोठमोठ्या पोस्ट्स वर जातात हे वास्तव आहे. विदेशी कंपन्यांना हेच विद्यार्थी हवे असतात. प्रशासकीय सेवेतही हेच विद्यार्थी पुढं असतात. ह्याचं कारण म्हणजे ह्या संस्थांमध्ये निवडच अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांची होत असते.
ह्या क्षेत्रात भरपूर पैसा मिळतो पण कामाचं ओव्हरलोड भयंकर असतं. टार्गेट्स पुर्ण करायची असतात. स्ट्रेस भरपूर असतो. बरेच जण त्या कामात घुसल्यावर जाळ्यात फसल्यासारखं फील करतात, गुदमरतात, परंतु कितीही गुदमरलं तरी तुम्हाला त्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. कारण भयंकर मेहनत आणि पैसा खर्च करून मिळवलेली ती पोस्ट असते. शिवाय सोशल स्टेटस बनलेलं असतं, नातेवाईकांमध्ये तुम्ही एक प्रेस्टिज घेऊन मिरवत असता. दणकेबाज इन्कम असतं. हे सगळं कसं सोडणार?
पण हे विद्यार्थी नुसते अभ्यासातच हुशार असतात असं नाही तर ते प्रतिभावान सुद्धा असतात. त्या प्रतिभेच्या बळावरच मग काही विद्यार्थी अश्या मोठमोठ्या पोस्ट्स ला लाथ मारून बाहेर पडतात आणि स्वतःचं स्टार्टप किंवा कम्पनी सुरु करतात, कुणी चेतन भगत सारखा लेखक बनतो, कुणी सामाजिक क्षेत्रात, कुणी कृषी विज्ञान क्षेत्रात नाव कमावतो. म्हणजे एकंदरीत हे विद्यार्थी बनलेलेच अश्या धातूचे असतात की जिथंही जातील तिथं ते यशस्वीच होतील.
हा प्रशांत त्रिपाठी सुद्धा असाच बुद्धिवान विद्यार्थी होता. पण "नोकरी" करण्यासाठी जी मानसिकता किंवा पात्रता हवी असते ती आपल्यात नाहीये हे त्याला कळलं. असतात काही लोकं ज्यांना इतरांच्या हाताखाली काम करणं जमत नाही. "इतरांच्या हाताखाली काम करायला न जमणं" हा जरी तुम्हाला स्वाभिमान वगैरे वाटत असला तरी तुम्ही तसे आहात अर्थात तुम्ही त्या जॉब्स साठी "अनफिट" आहात असाच त्याचा अर्थ होतो.
तर हा "अनफिट" प्रशांत जॉब सोडतो आणि स्वतंत्र "व्यवसाय" करायचं ठरवतो. पण आता काय करायचं? IIM च्या विद्यार्थ्याला हे ठरवताना जास्त मेंदू खपवावा लागत नाही. कारण ते त्याच क्षेत्रातले मास्टर्स असतात. कोणताही बिजनेस किंवा स्टार्टअप करायचा तर तुमच्यापाशी कौशल्य (स्किल ) काय आहे, भांडवल काय आहे, तसेच मार्केट मधे डिमांड कशाची आहे, ती डिमांड पुर्ण करण्यासाठी मार्केट मधे ते प्रॉडक्ट किंवा ती सर्व्हिस कोण कोण पुरवत आहे, मग त्या प्रस्थापित पुरवठादारांशी तुम्ही कशी स्पर्धा करणार आहात ह्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो.
बस! ह्याच गोष्टी लक्षात घेऊन प्रशांत त्रिपाठी हा अध्यात्माचा व्यवसाय सुरु करतो.
भारतात सध्या तरुण वर्ग करिअर आणि रिलेशनशिप ला घेऊन भयंकर अस्वस्थ आहे आणि पुढील काही वर्षात हि अवस्था अजून गंभीर होणार आहे हे प्रशांत हेरतो. अर्थातच भय चिंता असुरक्षा हे "व्हायरस" बळावणार आहेत आणि त्यावर उपाय म्हणून लोकं अध्यात्माकडे भरपूर प्रमाणात वळणार आहेत हि "मार्केट" ची स्थिती तो लक्षात घेतो.
मग आता उरला प्रश्न ह्या मार्केटमधे आपलं प्रॉडक्ट लाँच करायचा. "त्रिपाठीच" असल्यामुळे धर्म आणि अध्यात्म हे रक्तातच असल्याने त्या क्षेत्रातलं ज्ञान आणि अधिकार दोन्ही गोष्टी भांडवल म्हणून त्याच्यापाशी ऑलरेडी उपलब्ध होत्या. ग्राहकांच्या उफाळत्या भावनांवर फुंकर घालून दोन्ही गोष्टी साध्य होतात - भावनांना तात्पुरता गारवा मिळतो आणि विद्रोहाची ठिणगी आग पकडते. विद्रोह कुणाशी? तर सफलतेच्या प्रस्थापित व्याख्येशी. चांगल्या ठिकाणी रग्गड पॅकेज ची नोकरी, आलिशान गाडी, राजेशाही घर आणि चकाचक लाईफस्टाईल हे असं विशिष्ट जगणं म्हणजेच "यश" अशी जी व्याख्या केली जाते ती व्याख्या तरुणांना भुरळ तर पाडते पण चैन पडू देत नाही. भारतासारख्या देशात हे सगळं मिळवण्यासाठी ज्या स्पर्धेतून जावं लागतं ती स्पर्धा आणि ती गधा मेहनत frustrating आहे. शर्यतीत हजार जण धावतात तेव्हा एखादा तिथं पोचतो, हे दृश्य बघून तरुणांच्या मनात चिडचिड घुसमट निर्माण होते. हि घुसमट शमवण्यासाठी मग अध्यात्म कामी येतं. कारण अध्यात्म हे एक असं रसायन आहे जे तुमच्या भौतिक अपयशात मिसळलं कि तुमचं अपयश जस्टीफाय करता येतं. "भौतिक यश म्हणजेच सगळं नाही, अध्यात्मिक उन्नती हि भौतिक प्राप्तीपेक्षा श्रेष्ठ असते " ह्या टाईप च्या भपार-गाथा गाऊन तुम्ही तुमच्या अपयशावर पांघरून घालण्याची कला अध्यात्म शिकवतं. भौतिक जगात जर तुम्ही काही तीर मारू शकले नाही तर अध्यात्म तुम्हाला एक "पळवाट" उपलब्ध करून देते.
हि पळवाट जरी असली तरी हिला आपल्या देशात खुप ग्लोरिफाय करण्यात आलेलं असल्यामुळे बरेच जण हि पळवाट निवडतात.
दी लल्लनटॉप ह्या चॅनल न आचार्य प्रशांत चा इंटरव्यू घेतला. इंटरव्यू घेणारे तरुण पत्रकार म्हणजे शेवटी तिच ह्या मटेरियल जगात survive करण्यासाठी स्ट्रगल करणारी मध्यमवर्गीय जमात. ह्यांनी विचारलेले प्रश्न तुम्हा आम्हा सारख्या मध्यमवर्गीय लोकांचे प्रतिनिधीक प्रश्न आहेत. आणि उत्तरांच्या रूपात तेच ते घिसेपीटे गोलमटोल गुळगुळीत मिळमीळीत वेदांती आश्वासनं !
पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासोबतच थोडीफार luxury प्रत्येकालाच पाहिजे असते. पण ती मिळवताना किती घासावी लागते तेही प्रत्येकाला कळत असतं. ती लग्जरी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर मनाला समजूत घालण्यासाठी अध्यात्म तुम्हाला पळवाट प्रोवाईड करतं. हि "पळवाट" म्हणजेच ह्या धंद्यातलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आहे. ह्या प्रॉडक्ट चं प्रमोशन करण्यासाठीच हा आचार्य प्रशांत नावाचा बाबा ह्या इंटरव्यू मधे आला आहे आणि ह्या माध्यमातून लाखो ग्राहक जुळवण्यात तो यशस्वी झाला आहे.
खरंच IIT IIM वाले विद्यार्थी ब्रिलियंट असतात!
~डॉ विजय रणदिवे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.