ओशो
ओशो सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काय लिहावं हा पेच पडतो. ओशो एका पोस्टमधे आटोपता येत नाही. त्याला एका लेखात व्यक्त करता येत नाही. तरीही फेसबुकवर लिहितांना जास्त पाल्हाळ लावून चालत नाही. मोजक्या शब्दांत व्यक्त होणं ही इथली अपरिहार्यता असते.
मी ओशो हे नाव फार उशीरा म्हणजे दहावीत असताना वगैरे ऐकलं. पण त्याआधी रजनीश हे नाव माहित होतं. 1990 मधे रजनीश चा मृत्यु झाला. तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. म्हणजे तिसरीत असणार. आमच्या घरासमोर गावातल्या डॉक्टरचं घर होतं. त्या डॉक्टरची बायको रजनीशची निकट शिष्या होती. लग्नापूर्वी रजनीश च्या नादी लागून तीनं संन्यास घेतला होता म्हणे, त्याचा नाद सुटावा म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न मुद्दाम एका छोट्याश्या खेड्यात एका डॉक्टरशी लावून दिलं होतं, अशी गावात चर्चा होती. विशेष म्हणजे ती बाई मनोरुग्ण म्हणून गावात विख्यात होती. तिचा स्वभाव फारच मूडी होता. ती कधी फारच प्रेमळ वागायची तर लगेच मूड बदलला कि भयानक भांडण करायची. त्या दोघा नवरा बायकोची भांडणं आम्ही मुलं बरेचदा मनोरंजन म्हणून बघायला जायचो.
90-91 चा काळ असेल. रजनीश चा मृत्यु झाल्याची बातमी आमच्या गावापर्यंत पोचली होती. तेवढ्यातच आमच्या गावातल्या त्या डॉक्टरच्या घरी इंग्रज आले इंग्रज आले अशी बातमी गावभर पसरली. आमच्या घरासमोरच घर होतं त्यामुळे आम्हाला थेट त्यांच्या अंगणातलं दिसायचं. भगव्या कफन्या नेसलेले तीन चार गोरेपान इंग्रज त्यांच्या घरी आलेले आम्ही बघितले. इंग्रज कसे दिसतात हे बघण्यासाठी गावभरातले लोक आमच्या घरासमोर गर्दी करु लागले. पण डॉक्टरच्या बायकोचा स्वभाव सर्वांना माहित होता त्यामुळे लोक लांबूनच लपून छपून बघत होते. झालं, बाईचा पारा चढला आणि तिनं खुप घाण घाण शिव्या देऊन बघ्यांना हाकलून लावलं.
इंग्रज कसे दिसतात ते आम्ही पहिल्यांदाच बघितलं.
गावात चर्चेला ऊत आला. ज्याला जे वाटेल ते मोठ्या आत्मविश्वासाने फेकत होता. अफवा फार झपाट्याने पसरतात आपल्या देशात. रजनीश खुप घाणेरडा महाराज आहे, तो संमोहित करतो, त्याचे संन्यासी खुप घाणेरडे असतात, ते नशा करतात आणि चरित्रहीन असतात, अश्या अफवा आम्ही ऐकल्या. सेक्स वगैरे कळत नसलं तरी रजनीशवाले वाईट माणसं असतात हे आमच्या बालमनावर रुजलं.
नंतर दहावीत असताना जेव्हा केबल टीव्ही गावात आली तेव्हा कुठल्यातरी चॅनलवर पहिल्यांदा रजनीशला बोलताना बघितलं. तेव्हा माहित झालं कि रजनीशलाच ओशो सुद्धा म्हणतात. त्यावेळी तो काय बोलला ते आठवत जरी नाही तरी मात्र त्याचं बोलणं खुपच मनमोहक वाटलं होतं.
पुढं इंटर्नशिप सुरु असताना अध्यात्माचं भूत डोक्यावर चढलं. पण ज्या गुरुची दिक्षा घेतली (सरश्री त्याचं नाव ) त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं हे व्रत असल्यामुळे ओशो किंवा इतर गुरूंना ऐकणं टाळायचो.
जेव्हा माझ्या गुरुचा पाखंडीपणा माझ्या लक्षात यायला लागला, जेव्हा मला त्याच्यावर शंका यायला लागली तेव्हा मी ओशो ऐकायला सुरवात केली. आणि ऐकून थक्क झालो. मी इतकी वर्षे ह्या माणसाला का बरं टाळलं, मी कसा काय ह्या माणसापासून लांब राहिलो ह्याचं मला आश्चर्य वाटलं. स्वतःच्या चुतियागिरीची जाणीव मला ओशोमुळे झाली. मी जवळपास दोन वर्षे ओशो भरपूर ऐकला, भरपूर वाचला. पण आता मला आधी केलेली चुक परत करायची नव्हती. एकनिष्ठता ही एक सद्गुणविकृती आहे हे मला ओशोकडून कळल्यावर मी ओशोसोबत-सोबत रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज, विनोबा, मूजी, पापाजी, रमेश बाळसेकर, एखार्ट टोल, रुपर्ट स्पीरा, आद्याशांती, विवेकानंद, श्री एम, परमहंस योगानंद, गीताप्रेस चे रामसुखदास महाराज, जे. कृष्णमूर्ती आणि इतर बरंच काही वाचलं ऐकलं. उपनिशद वाचले. झेन साहित्य वाचलं. लाओत्से, रुमी आणि इतर सुफी साहित्य वाचलं.
पण ह्या सर्वांमध्ये ओशोचा जबरदस्त प्रभाव विचारांवर झाला. कुणातही अडकून राहायचं नाही आणि आपला गुरु आपण स्वयं व्हायचं हे ओशोचं (मुळात बुद्धांचं ) सूत्र मनाला पटलं आणि ते अंगीकारलं. ओशो आणि जे. कृष्णमूर्ती मुळे माझा मूळ विद्रोही स्वभाव जो मी इतकी वर्षे आज्ञाकारी बनण्याच्या नादात दाबून ठेवला होता तो उफाळून वर आला. मला खुप मोकळं मोकळं वाटायला लागलं.
आधीच खुप लांब प्रवास घडल्यामुळे वैतागलेलो मी आता शॉर्ट कट शोधू लागलो. ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी शॉर्टकटही उपलब्ध असतात हे ह्याच अध्यात्मिक गुरूंनी सांगितलं तर होतं परंतु कधी ते शॉर्टकट्स शोधले नव्हते. आता शोधू लागलो.
ओशो विवेक आणि तर्काला विशेष महत्व देतो. म्हणून आता कुणी काहीही सांगु दे पण जोपर्यंत ते आपल्या तर्क आणि विवेकाच्या कसोटीवर सत्य सिद्ध होत नाही तोपर्यंत ते स्वीकारायचं नाही हे ठाम पक्क केलं.
ओशो समग्र भासत असला तरी त्याच्याकडे समग्र दृष्टीने बघता येत नाही, त्याला खंडीत करूनच बघावं लागतं. ओशोचे दोन खंड आहेत. ओशोची एक बाजू म्हणजे तो अध्यात्मिक गुरु आहे आणि दुसरी बाजू म्हणजे तो एक दार्शनिक (फिलोसॉफर ) आहे. तुम्ही ओशो समोर उभे असता अर्थात एका फाट्यावर उभे असता. एक रस्ता डावीकडे जातो तर दुसरा रस्ता उजवीकडे जातो. उजवीकडे अध्यात्म आहे तर डावीकडे तत्वज्ञान (फिलॉसॉफी ) आहे.
दर्शनशास्त्रेही दोन प्रकारची आहेत. एक आस्तिक दर्शन आणि दुसरं नास्तिक दर्शन.
आस्तिक दर्शन मान्यतेवर आधारित आहे. नास्तिकदर्शन
विवेक तर्क आणि पुराव्यावर आधारित आहे. मी आस्तिकवादाचा पोकळ आधार बघून चुकलो होतो. आस्तिकवाद म्हणतो श्रद्धा ठेवा. प्रश्न विचारू नका. देवाच्या अस्तित्वाला तर्काने नाही तर श्रद्धेने मान्य करा.
एकंदरीत अध्यात्माचा प्रवास आंधळा आहे जो तुम्हाला आस्तिक बनवून सतत तहाणलेलं ठेवतो.
विवेकवादाचा प्रवास डोळस आहे जो तुम्हाला नास्तिकतेपर्यंत पोचवतो.
मी नास्तिक दर्शनाकडे जाण्याचं ठरवलं. कारण नास्तिक दर्शन तुम्हाला एका निष्कर्षापर्यंत पोचवतं. आस्तिकदर्शन कुठंच पोचवत नाही. ज्यांनी ज्यांनी ओशोला एक दार्शनिक किंवा फक्त एक मार्गदर्शक म्हणून स्विकार केलं ते मजेत आहेत. आणि ज्यांनी त्याला गुरु किंवा ईश्वराचा अवतार म्हणून निवडलं ते ध्यान करुन "एनलाईटनमेन्ट" पर्यंत पोचण्याच्या गोरखधंद्यात गुंतले आहेत. ध्यान करुन करुन एक दिवस ती "परम घटना" म्हणजे एनलाईटनमेन्ट होईल ह्या आशेने वाट बघत असतात.
ओशो ला माहित होतं कि नास्तिक बनणं सर्वांच्या औकातची गोष्ट नाहीये. त्यासाठी प्रचंड तर्कबुद्धि आणि साहस हवं असतं. ते सर्वांमध्ये नसतं. मग अश्या कमकुवत लोकांसाठी काहीतरी व्यवस्था करायची होती. त्यांचा ईश्वराचा आधार काढून घेतला तर ते कोसळून जातील उध्वस्त होतील, हे लक्षात घेऊन ओशोने त्या लोकांसाठी परमात्मा नावाचा खुळखुळा सोपवला. ध्यान करुन हा खुळखुळा वाजवत राहा, आणि एक दिवस तो परमात्मा नक्की भेटेल ह्या सुखद आशेवर मृत्यु येईपर्यंत जीवनाचा आस्वाद घेत राहा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा