ध्यानी-मनी


“ध्यानी-मनी” नावाचा एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकर आणि अश्विनी भावेंनी अभिनय केला आहे.
चित्रपटाचा प्लॉट असा आहे कि सदा आणि शालिनी हे नवरा बायको असतात. सदा हा एका रिसॉर्ट चा मॅनेजर असतो. त्यामुळे ते शहरापासून लांब एका शांत ठिकाणी वास्तव्यास असतात. शालिनी "स्किझोफ्रेनिया" ह्या मानसिक आजाराची पेशन्ट असते. त्यांना एक मुलगा असतो - मोहित. पण हा मुलगा खराखुरा नसून काल्पनिक असतो. शालिनीच्या मनाचा भ्रम असतो . त्या मुलाला ती टिफिन बनवून देते , त्याचं शाळेचं दफ्तर रेडी करून देते, त्याचा अभ्यास घेते आणि त्याला कधी कधी रागावते सुद्धा. मोहित अस्तित्वातच नसतो तरीदेखील तो शालिनीच्या काल्पनिक दुनियेत जिवंत असतो. मोहित खराखुरा नाही हे सदाला म्हणजे शालिनीच्या नवऱ्याला माहित असतं, पण त्याला सत्य माहित असूनही तो तिचा भ्रम तसाच राहू देतो आणि तोही ह्या लुटुपुटुच्या काल्पनिक मायलेकाच्या खेळात शामिल होतो. कारण त्याला शालिनीचा भ्रम तोडून तिच्या भावना दुखवायच्या नसतात.
ती तिच्या काल्पनिक मुलासोबत खूप आनंदी असते, तिच्या आनंदावर विरजण नको म्हणून सदा देखील तिच्या ह्या भ्रमाला खतपाणी घालतो. पण पुढे चालून त्या काल्पनिक मोहित च्या काल्पनिक उपद्व्यापांमुळे शालिनी खूप चिडचिडी व्हायला लागते. तिचं मानसिक संतुलन अधिकच बिगडायला लागतं आणि तिच्या तशा वागण्यामुळे घरातलं वातावरण बिगडत जातं.
आता मात्र सदाला आपल्या बायकोची खूप काळजी वाटायला लागते. तो स्वतः हि नर्व्हस राहायला लागतो. चारचौघात नालस्ती व्हायला लागते. म्हणून सदा एक युक्ती लढवतो. मोहित ला मारून टाकायचं. त्याला शालिनीच्या डोळ्यादेखत मारून टाकलं तर कदाचित काही दिवसांनी शालिनी मोहीतला विसरून जाईल असं सदा ला वाटतं. आणि तो तसंच करतो. शालिनीच्या डोळ्यादेखत मोहित ला चाकूने भोसकून ठार करतो, अर्थातच काल्पनिकच हत्या. पण ते करताना तो स्वतः त्या अभिनयात इतका रममाण होऊन जातो कि आता त्यालाच भ्रम व्हायला लागतात आणि त्याच्याही डोक्यात फरक पडून मोहित आता त्याचीही रिऍलिटी होऊन जातो. आता दोघेही वेडे होतात.
जे अस्तित्वातच नाही त्याला सत्य मानून त्या आभासी जगात वावरणे हा एक मानसिक आजार आहे. ह्याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. भ्रमाचं विश्व तयार करून त्या भ्रमात राहणे, अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींशी बोलणे हे ह्या आजाराचं लक्षण आहे. पण समजा १० पैकी नऊ जणांना हा आजार असेल तर ? तर त्या सर्वांची रिऍलिटी वर्चुअल जरी असली तरी तिला बहुमताने मान्यता मिळून ती वास्तविक म्हणून प्रचलित होऊन जाते. तो दहावा व्यक्ती मग कितीही ओरडून ओरडून त्या नऊ जणांना सांगू द्या कि बाबांनो तुम्ही ज्या विश्वात जगताय ते काल्पनिक जग आहे, ते खरं नाहीये, तरीसुद्धा त्या व्यक्तीचं कुणीही ऐकणार नाही, उलट त्यालाच वेडा ठरवल्या जाईल.
भक्ती किंवा श्रद्धा अश्याच अवास्तविक मान्यतांवर आधारित असते. कमकुवत आणि असुरक्षिततेच्या भावनेतून मानवी मेंदू एका आकाशस्थित काल्पनिक सर्वशक्तिमान तत्वाची कल्पना करतो, त्या कल्पनेला श्रद्धेचं खतपाणी घालून दृढ करत नेतो, मग हि दृढ झालेली कल्पना त्याला इतकी वास्तव वाटायला लागते कि त्या कल्पनेसमोर हे भौतिक जगच त्याला काल्पनिक स्वप्नवत वाटायला लागतं. त्याच्या त्या काल्पनिक परमसत्तेवर त्याचा इतका विश्वास वाढत जातो कि त्या कल्पनेला छेद देण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक विचार तो धुडकावून लावतो. अमान्य करतो. प्रत्यक्ष प्रमाण नाकारतो. असं करून तो स्वतःला सांत्वन देत असतो कि कुणीतरी आहे जो माझी काळजी वाहतोय, कुणीतरी आहे जो माझ्या हळव्या क्षणात मला धीर देतो. कुणीतरी आहे जो मला न्याय देईल.
हा जो "कुणीतरी" आहे हा आता त्याचं सर्वस्व होऊन जातो. काल्पनिक का असेना परंतु जर मनाला धीर दिलासा मिळत असेल तर हरकत काय ? असा सवाल उपस्थित होतो. असू द्या ना भ्रमात , काय प्रॉब्लम आहे ?
प्रॉब्लम हा आहे कि हा भ्रम वाढतीवर असतो. हा भ्रम तुमच्यापुरता मर्यादित असेल तर काही हरकत नाही, परंतु ह्या भ्रमाचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही समाजात अंधश्रद्धा पसरवून लोकांचे जीव, देशाची इकॉनॉमी, आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणत असाल तर मग ह्या भ्रमातून मुक्त होणं आवश्यक आहे. रुद्राक्षासाठी जीव जातात, अर्जी लावणे परची काढणे ह्यासाठी जीव जातात, तुमच्या उत्सवासाठी निष्पाप गायी मरतात, त्या काल्पनिक "उपरवाल्या" साठी काफीरांचे जीव घेतले जातात, आतंकवाद फोफावतो. हि त्या भ्रमाची चुकवलेली किंमत आहे.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रेनवॉश

माझे मृत्युपत्र.