ध्यान
पलट! तेरा ध्यान किधर हैं?
"ध्यान" ह्या विषयावर मी लिहावं असं माझ्या काही फेसबुक मित्रांनी सुचवलं होतं. ह्या विषयावर इंटरनेट वर भरपूर सामग्री उपलब्ध असल्याने ध्यान म्हणजे काय हे मी परत सांगायची गरज मला वाटत नव्हती.
"ध्यान" शिकवणाऱ्या अनेक संस्था आणि योगगुरू मार्केट मधे उपलब्ध आहेत. ज्याला जे पटतं किंवा ज्याला जे सोयीचं वाटतं तो ते ध्यान शिकतो आणि त्याची प्रॅक्टिस करतो.
ध्यानाचा सरळ सोपा अर्थ होतो एखाद्या वस्तुवर मन एकाग्र करणे. एकाग्रता म्हणजे ध्यान अशी वरवर व्याख्या करता येईल. पण ध्यानाला केवळ "एकाग्रता" म्हटलं कि लगेच काहीजण त्यावर आक्षेप घेतात व म्हणतात कि ध्यान म्हणजे नुसती एकाग्रता नसून ती मनाची त्याहीपेक्षा प्रगाढ अवस्था होय. "अवस्था" ह्या शब्दावरही काहीजण आक्षेप घेऊन म्हणतात कि ध्यान ही अवस्था नसून ती प्रक्रिया (process ) आहॆ.
अष्टांग योगा मधे यमनियमादी आठ अंगामध्ये सातव्या क्रमांकावर म्हणजे धारणे नंतर आणि समाधीच्या आधी ध्यान सांगितल्या गेलं आहॆ. त्यातही तिला अवस्था न म्हणता प्रक्रियाच म्हटलं आहॆ.
एकंदरीत एखाद्या वस्तु/विचार / संवेदना / कल्पना किंवा एखादया देवतेवर एकाग्रता साधने म्हणजे ध्यान.
पतंजली किंवा शंकराचार्याचे अनुयायी आणि बुद्धांचे अनुयायी ह्या दोघांमध्ये ध्यान ह्या विषयाला घेऊन मतभेद होतात.
शंकराचार्य हे वेदांना प्रमाण मानतात, आत्मा आणि परमात्म्याचं अस्तित्व मान्य करतात म्हणून त्यांचा समावेश आपण आस्तिक दर्शनात करतो. तर भगवान बुद्ध हे आत्मा परमात्मा मानत नाहीत म्हणून त्यांच्या शिकवणींचा समावेश आपण नास्तिक दर्शनात करतो. (बुद्ध वेदांना प्रमाण मानत नाहीत असं म्हणणं मी इथे यासाठी टाळत आहॆ कारण कि भगवान बुद्धांच्या आधी वेद उपस्थित होते हे archeological evidences आणि भाषा लिपिंच्या इतिहासाच्या आधारावर सिद्ध झालेलं नाही. तो संशोधनाचा आणि वादाचा विषय आहॆ.)
ध्यानाच्या तात्विक विवेचनात खोलात न जाता मी ह्या लेखात फक्त ध्यानाची ढोबळ व्याख्या करुन त्याची आजच्या दैनंदिन जीवनातली उपयुक्तता काय आहॆ ह्यावर बोलायचं ठरवलं आहॆ.
ध्यान म्हणजे अध्यात्मिक "अवस्था" मानणारा एक वर्ग आहॆ. तर..
ध्यान म्हणजे अध्यात्मिक "प्रक्रिया" मानणारा एक वर्ग आहॆ.
"अवस्था" म्हटलं तर मग ती कशाची तरी निष्पत्ती (outcome) आहॆ असं मानावं लागतं. आणि जर ध्यानाला "प्रक्रिया" म्हटलं तर तिची काहीतरी निष्पत्ती असावी असं गृहीत धरावं लागतं.
म्हणजे निष्पत्ती (परिणाम /फल /outcome ) हेच प्रत्येक क्रियेचा उद्देश असतो. उद्देशाविना कुणीही क्रिया करत नाही हे प्रत्येकजण मान्य करेल.
ध्यानाला जर अवस्था म्हणून मान्य केलं तर मग ती अवस्था वर्णन करावी लागेल. ती वर्णन करताना काहीजण म्हणतात कि ती मनाची निर्विचार अवस्था आहॆ. काहीजण म्हणतात कि विचारशून्य अवस्था नसून ती विचारासहित पण तरीही विचारांपासून अलिप्त अशी अवस्था होय. पण दोन्हीमध्ये अलिप्तता अंतर्भुत आहेच. म्हणजे विचार हे दुःखाचं कारण होय आणि त्यापासून अलिप्तता म्हणजे सुख होय असं म्हटलं जातं. म्हणजे अप्रत्यक्षपणे सुख हा outcome (निष्पत्ती) झाला.
ह्यावरून ध्यान = सुख असा अर्थ निघतो.
काहीजण ह्यावरही आक्षेप घेतात आणि म्हणतात कि ध्यान ही सुख आणि दुःख दोघांच्याही पलीकडची अवस्था होय. ध्यानाबद्दल संभ्रम तयार करणारे हे तेच "पलीकडवादी" लांडगे होय. "पलीकडे काहीतरी अद्भुत असतं" आणि आपण ते प्राप्त केलं पाहिजे असा रोमांचकारी विचार हा मुळात माणसाला भ्रमिष्ट बनवण्याकडे नेतो.
पलीकडे ईश्वर आहॆ, पलीकडे अद्वैत आहॆ, पलीकडे आनंद आहॆ, पलीकडे मुक्ती आहॆ पलीकडे कांदा आहॆ न पलीकडे लसूण आहॆ अश्या थापा मारून ह्या पलीकडवादी लोकांनी सामान्य लोकांना भ्रमित करुन सोडलं आहॆ.
ह्यांच्यामुळेच सरळ सोप्या गोष्टी गूढ रहस्यमय आणि अगम्य अप्राप्य अश्या होऊन गेल्या आहेत. ह्या लबाड लोकांनी ध्यानासारख्या सोप्या आणि साध्या प्रक्रियेला अतीरहस्यमय करुन ठेवलं आहॆ.
"पलीकडे काहीतरी आहॆ" हा विचार माणसाच्या जीवनात थ्रील पैदा करतो. सस्पेन्स आणि रोमांच पैदा करतो. मानवी मनाची जडणघडण ही नैसर्गिकरित्याच जिज्ञासू आणि चिकित्सक वृत्तीची असल्याने असे सस्पेन्स निर्माण करणारे विचार त्याच्या मनाला आकर्षित करतात. जिथं सस्पेन्स आहॆ तिथं थ्रील आणि ऍडव्हेंचर आहॆ. थ्रील आणि ऍडव्हेंचर मानवी मेंदूला "कीक" देतात. कीक बसली कि मस्त वाटतं नाही का?
ह्या कीक साठीच मग आपला मेंदू अश्या अवास्तविक ध्येयाच्या (unrealistic goals ) मागे धावतो. बरं ही ध्येये कुणाला प्राप्त होतात का? तुम्ही म्हणाल, ती ध्येयेच अवास्तविक unreal आहेत तर ती प्राप्त कशी होतील? तर तुम्ही चुकता आहात, ती ध्येये unreal जरी असली तरी ती प्राप्त करता येतात. ते कसं?
Virtual reality माहित आहॆ ना? म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींचं आभासी अस्तित्व निर्माण करणे. हे अस्तित्व खरंखुरं नसून तो फक्त त्या व्यक्तीसाठी निर्माण केला गेलेला आभास /भ्रम असतो. तो त्याचा वैयक्तिक अनुभव असल्यामुळे आपण त्याला सब्जेक्टिव्ह एक्सपेरियन्स म्हणतो. जसं भांग पिलेल्या माणसाला आकाशात घोडे उडताना दिसतात, उघड्या डोळ्यांनी दिसतात. पण त्याच्या शेजारी बसलेल्या लोकांना आकाशात काहीच दिसत नाही, कारण त्यांनी भांग घेतली नाही.
तर असे आभासी भ्रम सत्य मानून घेतलेल्या लोकांनी त्यांचे व्यक्तिगत अनुभव ग्रंथामध्यें लिहून ठेवलेत. आपण ते वाचतो, आपल्याला वाटतं जे लिहिलं आहॆ ते कदाचित सत्य असेल. मग आपणही आकाशात घोडे शोधत फिरतो. पण आपण भांग घेतलेली नसल्याने आपल्याला घोडे दिसत नाहीत. आपल्याला का बरं घोडे दिसत नाहीयेत म्हणून आपण वैतागतो, हताश होतो व आपण घोडे बघण्यासाठी पात्र नाही आहोत असं मानून स्वतःच स्वतःला घोडे लावून घेतो.
ध्यान करताना काही लोकांना असेच अनुभव होतात. कुणाला दिव्य ध्वनी ऐकु येतात, कुणाला मनोरम दृश्य दिसतात, कुणाला अद्भुत सुगंध येतात. कुणाला आपण कुणीतरी दिव्य आत्मा असल्याचा भास व्हायला लागतो. त्याहूनही पुढं मजल मारून काही जणांना वाटायला लागतं "साला अपुनिच भगवान हैं ".
तर ध्यानाचा हा गोरखधंदा इतका बेक्कार आहॆ. अतीप्रमाणात ध्यान करणाऱ्या लोकांची विक्षिप्तता, विकृत मानसिकता मी जवळून बघितली आहॆ. वर्षानुवर्षे ध्यान करत आलेल्या ओशो सन्यास्यांची विक्षिप्त अवस्था मी बघितली आहॆ. अहंकार कमी करण्यासाठी म्हणून ह्या लोकांनी ध्यानास सुरवात केलेली असते पण अहंकार कमी होण्याऐवजी तो उलट शिखरावर जाऊन पोचलेला असतो. प्रचंड घमंडी आणि आत्मप्रौढी मिरवणारे लोक हे खुप वर्षांपासून आणि खुप जास्त प्रमाणात ध्यान करणारे असतात हा माझा अनुभव आहॆ.
बरं मग ध्यानाचे काही फायदे नाहीत का?
निश्चितच आहेत. ध्यान केल्याने एकाग्रता वाढते. मन आणि शरीर शिथिल होऊन तणाव कमी होण्यास मदत होते. ध्यानाने प्रसन्नता येते, शरीरात हलकेपणा जाणवतो. मन लवकर एकाग्र होत असल्यामुळे विचारांचा गोंधळ कमी होतो. निर्णयक्षमता, स्मरणशक्ती वाढते. चिंता भय क्रोध इत्यादी विकारांची पकड कमी होऊ शकते ( हे विकार पूर्णपणे सुटत नसतात ).
ध्यान केल्याने ईश्वर प्राप्ती होते, आत्मसाक्षात्कार होतो हे दावे मला तरी थापाच वाटतात. कारण चिकित्सा करुन बघितल्यास असा एकही व्यक्ती समोर येत नाही जो सिद्ध करुन दाखवेल कि ध्यान केल्याने देवाची किंवा आत्म्याची प्राप्ती होते. हं, त्या व्यक्तीचा तो वैयक्तिक अनुभव असु शकतो पण वैयक्तिक अनुभव म्हणजे वैश्विक सत्य नसतं, तो केवळ त्या व्यक्तीपुरता एक भ्रम असतो.
~डॉ. विजय रणदिवे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा