आपण_सारे_असुर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
#रिव्हर्स_स्पिरिचुअलिटी
"असुर" वेब सिरीज छान आहे. ह्या सायकोलॉजिकल थ्रीलर मधे मानवी स्वभावाचे सर्व पैलु उलगडून दाखवण्यात आले आहेत.
नैतिकता, धर्म, क्षमाशिलता, प्रेम, करुणा, परोपकार, सहिष्णूता ही पवित्र आणि धार्मिक मानली जाणारी मूल्ये खरंतर आपणा सर्वांच्या आत खोलवर दडून बसलेल्या राक्षसी चेहऱ्याला लपवण्यासाठी वरून लावलेले मुखोटे आहेत आणि जेव्हा तुमच्या ह्या खोट्या मूल्यांच्या अहंकाराला डिवचलं जातं तेव्हा हे सगळे मुखोटे गळून पडतात आणि तुमचा राक्षसी चेहरा प्रकट होतो, ही या वेबसिरीजची theme आहे.
अध्यात्म म्हणतं की तुमचं मूळ अस्तित्व हे ईश्वरीय असून तुम्ही निर्मळ पवित्र प्रेममय आत्मस्वरूप आहात. आणि अहंकारवश तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडून तुम्ही अपवित्र आचरण करत असता.
आणि असुरचं रिव्हर्स अध्यात्म असं म्हणतं की तुमचं मूळ अस्तित्व हे राक्षसी असून तुम्ही हिंसक अपवित्र आणि द्वेषमूलक आहात. पण हे तुमचं असली स्वरूप लपवण्यासाठी तुम्ही पवित्रता आणि चांगुलपणाचा आव आणत असता.
अध्यात्माच्या सर्वमान्य विधानांना उलटं टांगून त्यांची चिरफाड करण्यात आली आहे. आणि सत्य नेमकं ह्याच्या विपरीत आहे हे अनेक प्रसंगांच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्यात आलं आहे. ह्या पवित्र भासणाऱ्या मूल्यांचे मुखवटे जितके अधिक रंगवलेले असतील तितकाच त्याचा आतला असली चेहरा भेसूर असतो अशी फिलॉसॉफी अगदी मार्मिक पद्धतीने दाखवली आहे. ही फिलॉसॉफी तुम्हाला तुमच्या आतमधे दडून बसलेल्या राक्षसाचे दर्शन करुन देते. पण तरीही तुम्हाला तुमचा पवित्र मुखोटा हे वास्तव स्विकारू देत नाही, कारण हे जर तुम्ही स्विकारलं तर पवित्रतेचे जे नकली मुखोटे तुम्ही लावलेले आहेत त्यात तुमचा जीव गुदमरायला लागतो.
मानवी अस्तित्व हे जितकं पवित्र तितकंच अपवित्र आहे.
जितकं क्षमाशील तितकंच बदलेखोर आहे.
जितकं प्रेमळ तितकंच द्वेषपूर्ण आहे.
जितकं मैत्रीपूर्ण तितकंच शत्रूतापूर्ण आहे.
जितकं अहिंसक तितकंच हिंसक आहे.
आपण परस्परविरुद्ध अश्या अनेक सद्गुण दुर्गुणांनी भरलेले आहोत. पण अध्यात्म तुम्हाला फक्त अर्धसत्य सांगून तुमचं हे सर्वसंपन्न अस्तित्व खंडीत करायला सांगतं. नाण्याच्या दोन्ही बाजूशिवाय नाण्याचं अस्तित्व अशक्य आहे. एक बाजू फारतर तुम्ही लपवून ठेऊ शकता, पण ती अमान्य नाही करु शकत, ती त्यागू नाही शकत.
असुर म्हणजे रिवर्स अध्यात्म. ऐकायला सुंदर लोभस परंतु अव्यवहार्य अश्या अध्यात्मिक मूल्यांना आव्हान देतो असुर.
निश्चितच हिंसेपेक्षा अहिंसा, द्वेषापेक्षा प्रेम आणि शत्रूते पेक्षा मैत्री ही मूल्ये सुंदर आहेत. नुसतीच सुंदर नाहीत तर मानवी अस्तित्वाला पोषक आहेत. परंतु ही अहिंसा मैत्री आणि प्रेम स्वयंस्फूर्त असेल तरच त्याचं महत्व आहे. ती धर्मांनी थोपवली असतील तर त्यातून विपरीत प्रकटीकरण होण्याचीच संभावना अधिक.
व्यवहारातही बघाल तर भावना आहत होणे, स्वाभिमान दुखावणे, त्यातून सूड म्हणून हल्ले करणे, ट्रोल करणे, विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्यांवर केसेस दाखल करुन धडा शिकवणे, हत्या करणे हे प्रकार करणारे लोकं तेच असतात जे समाजात स्वतःला नैतिक, धार्मिक म्हणून मिरवत असतात.
आपलं अस्तित्व निसर्गाने परस्परविरुद्ध अश्या दोन्ही गुणांनी अगदी सुंदर रित्या गुंफलेलं आहे. प्रसंगानुसार ते गुण वापरता येणे ह्यालाच विवेक म्हणतात.
डॉ. विजय रणदिवे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा